१. अनुस्वार

. व्युत्पत्ती आणि अर्थ : ‘अनुस्वार’ हा शब्द ‘अनु’ + ‘स्वार’ अशा दोन पदांनी (शब्दांनी) बनलेला आहे. ‘अनु’ म्हणजे मागाहून किंवा पाठीमागून आणि ‘स्वार’ म्हणजे आरूढ होणे. ‘एखाद्या अक्षराच्या मागाहून स्पष्टपणे उच्चारल्या जाणार्‍या, म्हणजेच त्या अक्षरावर मागाहून स्पष्टपणे स्वार होणार्‍या अनुनासिकाला (नाकातून होणार्‍या उच्चाराला) ‘अनुस्वार’ असे म्हणतात, उदा. चं, टं, पं.’

. चिन्ह :अक्षरावर टिंब देऊन अनुस्वार दाखवण्यात येतो, उदा. रं, आं, सं इत्यादी.

. अनुस्वाराचा वापर

३ अ. मराठी लेखनात अनुस्वार संस्कृतप्रमाणे जोडाक्षरांनी न लिहिता केवळ अक्षरांवर टिंब देऊन लिहिणे योग्य असणे : मराठी भाषेची जननी असलेल्या संस्कृत भाषेमध्ये बर्‍याच ठिकाणी अक्षरांवर अनुस्वार न देता ‘शङ्ख, दण्ड, चन्द्र, अम्बर’, असे लिहिण्याची पद्धत आहे. या प्रकारे शब्द लिहितांना ‘अनुस्वाराच्या ऐवजी ङ्/ण्/न्/म् इत्यादी अक्षरे लिहिली जातात. ‘या अक्षरांपैकी नेमकी कोणती अक्षरे केव्हा लिहावीत ?’ याचे सुस्पष्ट नियम संस्कृत व्याकरणात आहेत; मात्र हे नियम मराठी भाषेत वापरले जात नाहीत. मराठीत अक्षराच्या मागाहून स्पष्टपणे उच्चारले जाणारे अनुनासिक अनुस्वार देऊनच लिहिले जाते, उदा. शंख, दंड, चंद्र, अंबर इत्यादी.

३ आ. इंग्रजी शब्द देवनागरी लिपीत लिहितांना अनुस्वार देऊन लिहावेत : प्रचलित मराठीत काही ठिकाणी इंग्रजी शब्द देवनागरी लिपीत लिहितांना संस्कृत व्याकरणानुसार लिहिले जातात, उदा. बॉम्बे, ॲण्ड, चॅम्पियन, अपार्टमेण्ट इत्यादी. हे शब्द जर असे लिहावयाचे असतील, तर त्यासाठी संस्कृत व्याकरणाचे ज्ञान असणे आवश्यक आहे, अन्यथा ते शब्द योग्य प्रकारे लिहिले जाणार नाहीत. हे टाळण्यासाठी आपण मराठीत हे शब्द लिहितांना संस्कृतचे नियम न वापरता सरळ मराठीनुसार अनुस्वार देऊन लिहावेत, उदा. बाँबे, अँड, चँपियन, अपार्टमेंट इत्यादी.

३ इ. संस्कृत श्लोक संस्कृतच्या व्याकरणानुसार लिहिल्यामुळे लिहिणारा आणि वाचणारा यांना त्यातून चैतन्य प्राप्त होत असल्याने ते संस्कृतप्रमाणे लिहिणे उचित असणे : लिखाणामध्ये संस्कृत श्लोक लिहिण्याची वेळ आली, तर ते मात्र आपण संस्कृत भाषेच्याच नियमानुसार लिहिणे आवश्यक आहे. याचे कारण असे की, बहुतांश संस्कृत श्लोक हे धर्मग्रंथांतून घेण्यात आले असतात, तर कित्येक श्लोक हे वेळोवेळी द्रष्टे ऋषिमुनी, सिद्धपुरुष, संत आदींनी लिहिले असतात. या श्लोकांमध्ये त्यांचे चैतन्य असते. त्यामुळे हे श्लोक शुद्ध स्वरूपात लिहिले गेले, तर त्यांतून व्यक्तीला अधिकाधिक चैतन्य प्राप्त होते. संस्कृत श्लोकांतील केवळ अनुस्वारच नव्हेत, तर र्‍हस्व-दीर्घादी व्याकरणही कधी पालटू नये; कारण त्यात आध्यात्मिकदृष्ट्या आपलीच हानी आहे.

३ उ. असतांना, करतांना, खेळतांना, जेवतांना इत्यादी वर्तमानकाळवाचक धातूसाधित विशेषणांमधील ‘ता’ या अक्षरावर अनुस्वार द्यावा. या शब्दांत अस, कर, खेळ आणि जेव हे धातू आहेत अन् त्यांच्यापासून असतांना, करतांना, खेळतांना आणि जेवतांना ही धातूसाधिते सिद्ध झाली आहेत. धातूसाधितांविषयीची अधिक माहिती पुढील लेखांत देण्यात येणार आहे.

३ ऊ. एखाद्याला आदरार्थी संबोधतांना अनुस्वार द्यावा, उदा. महाराजांचे, संतांना, आजोबांसाठी, मुख्यमंत्र्यांविषयी इत्यादी.

३ ए. लेखनात संवाद लिहितांना किंवा काही वेळा कथा, कादंबरी आदी वाङ्मयप्रकारांत बोली भाषा लिहावी लागते. अशा वेळी बोलण्यातील शब्दोच्चारांप्रमाणे मात्रेच्या जागी अनुस्वार द्यावा, उदा. तिने अवाक् होऊन विचारले, ‘‘एवढं सगळं कसं आवरायचं ?’’

- सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.७.२०२१)