१. नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी वापरल्या जाणार्या शब्दाला ‘सर्वनाम’ असे म्हणत असणे : एखाद्या परिच्छेदामध्ये एकच नाम प्रत्येक वाक्यात पुन्हा पुन्हा आले, तर वाचणार्याचा रसभंग होतो. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.
‘प्रशांत घाईघाईने घरात शिरला. प्रशांतच्या हातात एक जाडजूड भाषाशास्त्राचे पुस्तक होते. ते प्रशांतने घरात अगदी व्यवस्थित ठेवले. प्रशांतला त्याच्या मामाने ते टपालाद्वारे पाठवले होते. प्रशांतसाठी ते पुस्तक अत्यंत अमूल्य होते. प्रशांतच्या काही मित्रांकडेही असेच भाषाशास्त्राचे पुस्तक होते.’
वरील परिच्छेदातील प्रत्येक वाक्यात ‘प्रशांत’ हे नाम आले आहे. ते वाचावयास बरे वाटत नाही. त्याऐवजी हा परिच्छेद पुढीलप्रमाणे लिहिला, तर अधिक वाचनीय होतो.
‘प्रशांत घाईघाईने घरात शिरला. त्याच्या हातात एक जाडजूड भाषाशास्त्राचे पुस्तक होते. ते त्याने घरात अगदी व्यवस्थित ठेवले. त्याला त्याच्या मामाने ते टपालाद्वारे पाठवले होते. त्याच्यासाठी ते पुस्तक अत्यंत अमूल्य होते. त्याच्या काही मित्रांकडेही असेच भाषाशास्त्राचे पुस्तक होते.’
वरील परिच्छेदामध्ये केवळ पहिल्या वाक्यात ‘प्रशांत’ हे नाम आले आहे. पुढे या नामाच्या जागी ‘त्याच्या, त्याने, त्याला’ हे शब्द आले आहेत. अशा प्रकारे सतत येणार्या एकाच नामाच्या जागी वापरल्या जाणार्या यांसारख्या शब्दांना ‘सर्वनामे’ असे म्हणतात. सर्वनामांची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
मी, तू, आम्ही, तुम्ही, ते, ती, त्या, हा, कुणी, काय इत्यादी.
२. सर्वनामांची वैशिष्ट्ये
२ अ. सर्वनामांना भाषेतील अन्य शब्दांप्रमाणे स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसणे : भाषेतील विविधशब्दांना स्वतःचे स्वतंत्र अर्थ असतात. ते शब्द उच्चारले की, त्या गोष्टी, तसेच त्यांच्याशी संबंधित गोष्टी क्षणार्धात आपल्या दृष्टीसमोर येतात, उदा. बांगड्या, शेत, आंदोलन, इयत्ता, उदबत्ती इत्यादी. सर्वनामांचे मात्र तसे नसते. ‘तो’ हे सर्वनाम उच्चारले, तर लगेच ‘कोण तो ?’, हा प्रश्न पडतो. फारतर ‘बोलणारा कुठल्यातरी पुल्लिंगी गोष्टीविषयी बोलत आहे’, एवढेच ऐकणार्याला समजते. सर्वनामांना स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसतो. ज्या नामाच्या ऐवजी ही सर्वनामे वापरली जातात, ते नाम हाच त्यांचा अर्थ असतो. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. अक्षय सकाळी लवकर उठून शाळेत गेला. आज तो फार आनंदात होता. - यातील ‘तो’ हे सर्वनाम ‘अक्षय’ला उद्देशून वापरले आहे. त्यामुळे ‘अक्षय’ हा त्या सर्वनामाचा अर्थ आहे.
२. मांजर स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत आले. त्याने दुधाच्या पातेल्याच्या झाकणाला पाय लावला. - यातील ‘त्याने’ या सर्वनामाचा अर्थ ‘मांजराने’ असा आहे.
३. समुद्र खवळला होता. त्याचे रौद्र रूप पाहून सारेच घाबरले. - यातील ‘त्याचे’ या सर्वनामाचा अर्थ ‘समुद्राचे’ असा आहे.
२ आ. परिपूर्ण अर्थ सांगणारे वाक्य लिहितांना त्यात प्रथम एखादे नाम आल्याशिवाय सर्वनाम न येणे : ‘मानसीने घर आवरले आणि तिला हरवलेली कागदपत्रे सापडली’, या वाक्यात प्रथम ‘मानसी’ हे नाम आले आहे अन् त्यापुढे ‘तिला’ हे सर्वनाम आले आहे. त्यामुळे ‘तिला’ म्हणजे ‘मानसीला’ हे वाचकाला लगेच कळते. अशा प्रकारे परिपूर्ण अर्थ सांगणारे वाक्य लिहितांना त्या वाक्यात सर्वनाम येण्यापूर्वी नाम येऊन गेले असणे आवश्यक आहे. वाक्य अथवा परिच्छेद यांत केवळ सर्वनामे लिहीत गेलो, तर ‘कुणी, काय, केव्हा केले ?’, याविषयी वाचकाच्या मनात संभ्रम निर्माण होतो.
२ इ. एकच सर्वनाम अनेक नामांसाठी वापरले जात असणे : ‘ते’ हे एकच सर्वनाम ‘बाळ, झाड, उपकरण, चूर्ण, माध्यम, विमानतळ, वाद्य, मन’, अशा सर्व नामांसाठी वापरता येते. अशा प्रकारे सर्व सर्वनामे अनेक नामांसाठी वापरली जातात.’
३. सर्वनामांचे प्रकार : सर्वनामांचे पुढीलप्रमाणे एकूण सहा प्रकार आहेत. त्यांच्या नावांचे अर्थ आणि त्या प्रकारांची माहिती पुढे सविस्तर देण्यात आली आहे.
३ अ. पुरुषवाचक सर्वनामे
३ आ. दर्शक सर्वनामे
३ इ. संबंधी सर्वनामे
३ ई. प्रश्नार्थक सर्वनामे
३ उ. अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे
३ ऊ. आत्मवाचक सर्वनामे
आता सर्वनामांचा एकेक प्रकार विस्ताराने पाहू.
३ अ. पुरुषवाचक सर्वनामे : दैनंदिन जीवनात आपण अनेकांशी अनेक गोष्टींविषयी बोलत असतो. या बोलण्याच्या क्रियेमध्ये पुढील तीन घटक समाविष्ट असतात.
१. बोलणारी व्यक्ती
२. ज्यांच्याशी आपण बोलतो, त्या व्यक्ती
३. ज्यांच्याविषयी आपण बोलतो, त्या व्यक्ती, वस्तू अथवा अन्य गोष्टी
वरील तिन्ही घटकांना व्याकरणात ‘पुरुष’ असे म्हणतात. ‘बोलणारी व्यक्ती’ या घटकाला ‘प्रथमपुरुष’ ‘ज्यांच्याशी आपण बोलतो, त्या व्यक्ती’ या घटकाला ‘द्वितीयपुरुष’ आणि ‘ज्यांच्याविषयी आपण बोलतो, त्या व्यक्ती, वस्तू अथवा अन्य गोष्टी’ या घटकाला ‘तृतीयपुरुष’ असे म्हणतात. या तिन्ही पुरुषांमध्ये विविध नामे असतात. त्यामुळे अर्थातच त्यांमध्ये सर्वनामेही असतात. या सर्वनामांना ‘पुरुषवाचक सर्वनामे’ असे म्हणतात. तिन्ही पुरुषांमधील ‘पुरुषवाचक सर्वनामां’ची माहिती पुढे दिली आहे.
३ अ १. प्रथमपुरुषवाचक सर्वनामे : बर्याचदा दोन-अडीच वर्षांची लहान मुले स्वतःचा उल्लेख स्वतःच्या नावाने करतात, उदा. छोटा आशीष म्हणतो, ‘‘आशीषला आईकडे जायचं आहे.’’ येथे तो ‘मला’ हे सर्वनाम वापरत नाही. मूल मोठे झाले की, बोलतांना स्वतःच्या नावाच्या जागी सर्वनाम वापरावयास शिकते. बोलणारी व्यक्ती स्वतःचा उल्लेख करतांना जी सर्वनामे वापरते, त्यांना ‘प्रथमपुरुषवाचक सर्वनामे’ असे म्हणतात, उदा. मी, माझे, आम्ही, आमच्या, आपण, स्वतः इत्यादी.
३ अ २. द्वितीयपुरुषवाचक सर्वनामे : आपण ज्यांच्याशी बोलतो, त्यांना उद्देशून जी सर्वनामे वापरतो, त्यांना ‘द्वितीयपुरुषवाचक सर्वनामे’ असे म्हणतात, उदा. तू, तुला, तुम्ही, तुम्हाला, आपण इत्यादी. एखाद्या आदरणीय व्यक्तीशी बोलतांना तिला उद्देशून ‘आपण’ हे सर्वनाम वापरले जाते. हे सर्वनाम असलेले वाक्य पुढे दिले आहे.
अमितने विचारले, ‘‘आपण थोडा वेळ विश्रांती घेता का ?’’
३ अ ३. तृतीयपुरुषवाचक सर्वनामे : आपण ज्यांच्याविषयी बोलतो, त्या व्यक्ती अथवा वस्तू यांना उद्देशून जी सर्वनामे वापरतो, त्यांना ‘तृतीयपुरुषवाचक सर्वनामे’ असे म्हणतात, उदा. तो, ती, ते, त्या, त्यांना, त्यास इत्यादी.
३ आ. दर्शक सर्वनामे : जवळची किंवा दूरची व्यक्ती, वस्तू अथवा अन्य एखादी गोष्ट दाखवण्यासाठी वापरल्या जाणार्या सर्वनामांना ‘दर्शक सर्वनामे’ असे म्हणतात.
जवळची गोष्ट दाखवण्यासाठी हा, ही, हे, यांना, यांची इत्यादी सर्वनामे वापरतात. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. हा वर्तकांचा वाडा आहे.
२. या माझ्या मोठ्या वहिनी आहेत.
३. हे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज आहेत.
दूरची गोष्ट दाखवण्यासाठी तो, ती, ते, त्यांना, त्यांची इत्यादी सर्वनामे वापरतात. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. ती दूरवर दिसत आहे, ती शहरातील सर्वांत उंच इमारत आहे.
२. तो धृवतारा आहे.
३. ते पलीकडच्या टेकडीवरील मंदिर आमच्या आजोबांनी बांधले आहे.’
३ इ. संबंधी सर्वनामे : ‘जो नियमित व्यायाम करतो, तो निरोगी रहातो’, या वाक्यात ‘जो’ आणि ‘तो’ ही दोन सर्वनामे आली आहेत. ही सर्वनामे एकाच ‘व्यायाम करणार्या’ व्यक्तीला उद्देशून वापरली आहेत. त्यामुळे ‘जो’ या सर्वनामाचा पुढे आलेल्या ‘तो’ या सर्वनामाशी एकरूपत्वाचा संबंध आहे.
दुसरे असे की, ‘तो’ हे ‘दर्शक सर्वनाम’ आहे. जवळची अथवा दूरची गोष्ट दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरतात, त्याला ‘दर्शक सर्वनाम’ असे म्हणतात.
अशा प्रकारे ‘वाक्यात पुढे येणार्या दर्शक सर्वनामाशी एकरूपत्वाचा संबंध असणार्या पहिल्या सर्वनामाला ‘संबंधी सर्वनाम’ असे म्हणतात.’ वरील उदाहरणात ‘जो’ हे संबंधी सर्वनाम आहे. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. जे चकाकते, ते सर्वच सोने नसते.
२. जी मनुष्याला मायेतून मुक्त करते, ती खरी विद्या होय !
३. ज्याला साधना करायचीच आहे, तो ती कुठेही राहून करू शकतो.
वरील वाक्यांमधील ‘जे’, ‘जी’, ‘ज्याला’ ही ‘संबंधी सर्वनामे’ आहेत.
३ ई. प्रश्नार्थक सर्वनामे : ज्या सर्वनामांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला जातो, त्या सर्वनामांना ‘प्रश्नार्थक सर्वनामे’ असे म्हणतात. ‘कोण, कोणी, कोणाला, कुठे, काय इत्यादी’ ही प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. यांत अट अशी आहे की, प्रश्नार्थक सर्वनामे असलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एखादे नामच असावयास हवे, उदा. ‘तू काय आणले आहेस ?’ या प्रश्नातील ‘काय’ या सर्वनामाचे उत्तर ‘मिठाई, कपडे, खेळणे, वही, लेखणी इत्यादी’ असे एखादे नामच असावयास हवे. सरसकट सर्व प्रश्नार्थक शब्दांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणता येत नाही, उदा. ‘तू काय सांगत होतास ?’, या प्रश्नातील ‘काय’ या शब्दाचे उत्तर पुष्कळ वेगळे आणि लहान-मोठे असू शकते आणि ते नाम नसू शकते. त्यामुळे या वाक्यातील ‘काय’ हा शब्द प्रश्नार्थक सर्वनाम नाही. प्रश्नार्थक सर्वनामे समाविष्ट असलेली काही वाक्ये उदाहरणादाखल पुढे दिली आहेत.
१. हा पुतळा कोणाचा आहे ?
२. छायाचित्रात दिसणारी स्त्री कोण आहे ?
३. तुम्ही कुठे चाललात ?
४. या वस्तू कोणासाठी आणल्या आहेत ?
३ उ. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे : ‘कोणी कोणावर टीका करू नये’, या वाक्यात ‘कोणी’ आणि ‘कोणावर’ ही दोन सर्वनामे आली आहेत; मात्र ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी आलेली नाहीत. ती नेमकी कोणत्या नामांबद्दल आली आहेत, हे निश्चितपणे सांगता येत नाही. अशा सर्वनामांना ‘सामान्य सर्वनामे’ किंवा ‘अनिश्चित सर्वनामे’, असे म्हणतात. यांची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. कोणाच्या भावना दुखावणे योग्य नव्हे.
२. कोणाला काही सुचवणे किंवा सांगणे, म्हणजे पाप झाले आहे हल्ली !
३. कोणाचे कोणावाचून अडत नसते.
३ ऊ. आत्मवाचक सर्वनामे : मराठीतील पुढील दोन सर्वनामे ही ‘आत्मवाचक सर्वनामे’ आहेत.
३ ऊ १. स्वतः : भाषेतील ‘स्वतः’ हे सर्वनाम स्वतःविषयी बोलतांना वापरले जाते. त्याचबरोबर आणखी एका प्रकारेही हे सर्वनाम वापरले जाते. ‘अभिजितने स्वतः मला सर्व माहिती दिली’, या वाक्यात ‘स्वतः’ या सर्वनामाच्या आधी ‘अभिजित’ हे नाम आले आहे. या वाक्यातील ‘स्वतः’चा अर्थ ‘अभिजित’ असा आहे. अशा प्रकारे वाक्यात प्रथम एखादे नाम किंवा सर्वनाम आले असेल आणि ते नाम अथवा सर्वनाम याचे त्याच वाक्यात पुढे ‘आत्मवाचक’ रूप लिहावयाचे असेल, तर त्या ठिकाणी ‘स्वतः’ हे सर्वनाम वापरतात. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
अ. मी स्वतः जाऊन खरे-खोटे पाहून येतो.
आ. तुम्ही स्वतः माझ्या शंकांचे निरसन कराल का ?
इ. आज तो स्वतः होऊन अभ्यासाला बसला आहे.
ई. आजोबा स्वतःच्या प्रकृतीला सांभाळून असतात.
उ. चिराग स्वतः काही करत नाही आणि इतरांना नावे ठेवतो.
३ ऊ २. आपण : एखाद्या आदरणीय व्यक्तीला संबोधतांना लोक ‘आपण’ हे सर्वनाम उच्चारतात, उदा. विशालने विनंती केली, ‘‘पंडितजी, आपण जेवून घ्या.’’ मात्र जेव्हा ‘आपण’ या सर्वनामाचा उपयोग केवळ स्वतःचा उल्लेख करण्यासाठी केला जातो, तेव्हा त्याला ‘आत्मवाचक सर्वनाम’ असे म्हणतात, उदा. रावसाहेब म्हणाले, ‘‘आपण असले नियम पाळत नाही.’’ या वाक्यात रावसाहेबांना ‘आपण’ म्हणजे ‘मी’ असे म्हणावयाचे आहे; पण त्यांनी स्वतःचा उल्लेख ‘आपण’ असा आदरार्थी केला आहे. ‘आपण’ या सर्वनामाप्रमाणेच ‘आपला’, ‘आपली’, ‘आपले’ यांसारखी सर्वनामेही आत्मवाचकच आहेत. आत्मवाचक सर्वनामे असलेली आणखी काही वाक्ये उदाहरणादाखल पुढे दिली आहेत.
अ. तात्यासाहेब म्हणाले, ‘‘आपल्याला शांतता आवडते.’’
आ. अप्पांनी सांगितले, ‘‘कुणी काही म्हणो, आपला बुवा या गोष्टींवर विश्वास आहे.’’
इ. कुलदीप रागावून म्हणाला, ‘‘आपण असली कामे करणार नाही !’’
- सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.८.२०२२)