१. भाषिक अस्मितेचा अंत ही राष्ट्रीयत्वाच्या अंताची पहिली पायरी ! : भाषा हा मानवी संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे. मनुष्याचे विचार आणि संस्कार त्याच्या भाषेद्वारेच व्यक्त होत असतात. ‘एखादी संस्कृती किती प्रगत आहे ? हे तिची भाषा किती प्रगल्भ आहे ?’, यावरून ठरते. एवढेच नव्हे, तर ‘एखादी संस्कृती किती काळ टिकणार ?’, हेही ‘तिची भाषा किती काळ टिकते ?’, यावर अवलंबून असते. भाषा पालटली की, संस्कृती पालटते; संस्कृती पालटली की, राष्ट्रीयत्व पालटते आणि राष्ट्रीयत्व पालटले की, स्वराष्ट्र लयास जायला वेळ लागत नाही.
२. स्वभाषेची उपेक्षा करणे, हे मानसिक स्तरावरील धर्मांतर ! : भाषेचे मनुष्यजीवनातील अनन्यसाधारण महत्त्व जाणून जगाच्या इतिहासातील प्रत्येक महत्त्वाकांक्षी राज्यकर्त्याने स्वतः जिंकलेल्या प्रदेशावर स्वतःची भाषा लादण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषाही यातून वाचलेली नाही. अनुमाने १००० वर्षांपूर्वीपासून भारतावर परकीय आक्रमणे चालू झाली. पुढे ते आक्रमक राज्यकर्ते बनल्यानंतर त्यांच्या भाषांचा फार मोठा पगडा मराठीसारख्या देशी भाषांवर निर्माण झाला. असंख्य उर्दू, फारसी इत्यादी शब्द मराठीत शिरले. पुढे ब्रिटिशांनी तर अत्यंत पद्धतशीरपणे भारताची मूळ भाषा असलेल्या संस्कृतला संपवण्यास आणि मराठीसारख्या संस्कृतोद्भव भाषांचे खच्चीकरण करण्यास आरंभ केला. हे कार्य त्यांनी एवढ्या धूर्तपणे आणि दूरगामी परिणाम करील, अशा रीतीने केले की, आज त्यांना भारतातून हाकलवून ७५ वर्षे झाली, तरी भारतियांवरील इंग्रजीचा प्रभाव उत्तरोत्तर वाढतांनाच दिसत आहे. आता येथे दिवाळीएवढ्याच, किंबहुना तिच्याहून थोड्या अधिक उत्साहाने नाताळ साजरा होऊ लागला आहे. ‘स्वभाषा अस्ताला जाऊ लागली की, धर्मही अस्ताला जाऊ लागतो’, याची ही दुर्दैवी प्रचीती आहे.
३. भारताला पुन्हा वैभवशाली बनवण्यासाठी मातृभाषेचा पुरस्कार करणे आवश्यक ! : आजच्या काळातील जगामधील एकही देश प्राचीन भारताएवढा ज्ञानसंपन्न, प्रतिभावंतांची विपुलता असलेला, समृद्ध, सुखी आणि समाधानी नाही, हे सत्य कुणीही मान्य करील. भारताला हे वैभव श्रुतिस्मृती, उपनिषदे, पुराणे इत्यादी संस्कृत धर्मग्रंथांचे अध्ययन आणि आचरण यांच्यामुळे प्राप्त झाले होते. ते पुन्हा प्राप्त होण्यासाठी संस्कृत धर्मग्रंथ आणि त्याकरता संस्कृत भाषा यांचे पुनरुज्जीवन व्हायला हवे. त्यातील पहिला टप्पा ‘संस्कृत भाषेपासून उगम पावलेल्या स्वदेशी भाषांचे पुनरुज्जीवन करणे’, हा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या द्रष्ट्या राष्ट्रपुरुषांनी स्वभाषेचे हे महत्त्व ओळखले होते. त्यांनी राज्यव्यवहार आणि लोकव्यवहार यांमध्ये मातृभाषा मराठीचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तर परभाषेतील शब्दांसाठी नवे स्वकीय शब्द निर्माण केले. ‘स्वतःचे विचार स्वभाषेत व्यक्त करता न येणे’, ही एक प्रकारची मानसिक गुलामगिरी आहे. ती नष्ट होण्याकरता आपल्या भाषेतील परकीय शब्दांचा वापर टाळून स्वकीय शब्द वापरण्यास आरंभ करणे आवश्यक आहे.
४. नित्य वापरातील काही परकीय शब्द आणि त्यांचे मराठी प्रतिशब्द
४ अ. ‘कमी’ या फारसी भाषेतील शब्दासाठी मराठीत असलेले ‘न्यून’, ‘अल्प’ इत्यादी शब्द आणि त्यांचा वापर करण्याची पद्धत : ‘कमी’ या फारसी शब्दासाठी सनातनच्या वाङ्मयात ‘न्यून’ आणि ‘अल्प’ हे दोन शब्द अधिक प्रमाणात वापरले जातात. त्यामुळे ‘या दोन शब्दांचा वापर कसा करावा ?’, हे पुढे दिले आहे.
४ अ १. न्यून : ‘त्यांच्याकडे एक किलो साखर होती. तिच्यातील १०० ग्रॅम ‘कमी’ झाली’, या वाक्यांमधील ‘कमी’ या शब्दाच्या जागी ‘न्यून’ हा शब्द वापरावा. एखाद्या गोष्टीच्या मुळात असलेल्या प्रमाणापैकी काही भाग ‘कमी’ झाला, तर तो ‘न्यून’ झाला, असे म्हणावे. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
अ. दहा फुलांमधील दोन फुले न्यून झाली.
आ. दुखापतींमुळे आमच्या गटातील चार खेळाडू न्यून झाले.
इ. आता सीमेलगतच्या भागातील हिंदू न्यून झाले आहेत.
४ अ २. अल्प : एखादी गोष्ट मुळातच ‘कमी’ असेल, तर ती ‘अल्प’ आहे, असे म्हणावे, उदा. घरात दूध अल्प होते. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
अ. आमच्या परिसरात अन्य भाषिक लोक अल्प आहेत.
आ. ते फारच अल्प वेतन देतात.
इ. त्याने अल्प काळात पुष्कळ प्रगती केली.
४ अ ३. ‘कमी’ या परकीय शब्दासाठी वापरायचे आणखी काही मराठी प्रतिशब्द : ‘न्यून’ आणि ‘अल्प’ दोन शब्दांखेरीज ‘कमी’ या परकीय शब्दासाठी नेहमी सहजपणे वापरू शकतो, असे आणखीही काही शब्द मराठीत आहेत. हे शब्द वाक्यात उपयोग करून पुढे दिले आहेत आणि ते ठळकही केले आहेत.
अ. चहात दूध थोडे घाल.
आ. माझे प्रयत्न अपुरे पडले.
इ. काकांची शारीरिक क्षमता आता उणावली आहे.
ई. हलक्या प्रतीच्या वस्तू फारशा टिकत नाहीत.
उ. हिंदुविरोधी वक्तव्यांमुळे अभिनेत्याची लोकप्रियता पुष्कळ घटली.’
४ आ. ‘म्हणजे’ या अर्थाने ‘अर्थात्’ हा शब्द वापरल्यामुळे मराठी भाषा हिंदी वळणाची होत असणे : ‘म्हणजे’ हा मराठी शब्द आहे. त्याचा अर्थ ‘अन्य शब्दांत सांगायचे तर...’ किंवा ‘याचा अर्थ...’ असा आहे. ‘अर्थात्’ हा संस्कृत शब्द आहे. त्याचा एक अर्थ ‘म्हणजे’ असा असला, तरी पूर्वीपासून मराठी भाषेमध्ये हा शब्द ‘म्हणजे’ या अर्थाने प्रचलित नव्हता. ‘गुरुजी म्हणाले, ‘‘बळी तो कान पिळी’, म्हणजे ‘जो बलवान असतो, तो दुबळ्या लोकांवर वर्चस्व गाजवतो’’, अशा वाक्यांत ‘म्हणजे’च्या जागी ‘अर्थात्’ वापरला जात नसे.
हिंदी प्रसारमाध्यमे, विशेषतः घरोघरी सातत्याने पाहिल्या जाणार्या हिंदी वृत्तवाहिन्या यांवरील हिंदी भाषेच्या प्रभावाखाली आल्यामुळे मराठीत ‘म्हणजे’ या अर्थाने ‘अर्थात्’ हा शब्द वापरण्यास आरंभ झाला. ‘आज ६ डिसेंबर, अर्थात् बाबरी मशीद पतन दिन’, अशी वाक्यरचना मराठीत आता सर्रास वापरली जाते; परंतु ही हिंदी वळणाची भाषा आहे. हे वाक्य ‘आज ६ डिसेंबर, म्हणजे बाबरी मशीद पतन दिन’, असे लिहिणे अधिक योग्य आहे. ‘अर्थात्’ या शब्दाच्या तुलनेत ‘म्हणजे’ हा शब्द वापरायलाही सोपा आहे. या दोन शब्दांच्या संदर्भातील अयोग्य आणि योग्य वाक्यरचनेचे आणखी एक उदाहरण पुढे दिले आहे.
४ आ १. अयोग्य वाक्य : ‘मातृदेवो भव’, अर्थात् ‘आईला देव मानावे.’
४ आ २. योग्य वाक्य : ‘मातृदेवो भव’, म्हणजे ‘आईला देव मानावे.’
४ इ. ‘पोहोचणे’ या हिंदी वळणाच्या शब्दाच्या जागी ‘पोचणे’ हा मराठी शब्द वापरणे : मराठी भाषेत सध्या ‘पोहोचणे’ हा शब्द सर्वत्र वापरला जात आहे. वास्तविक ‘पोहोचणे’ हा शब्द हिंदी भाषेतील ‘पहुंचना’ या शब्दावरून मराठीत आला आहे. मूळ मराठीत ‘पोचणे’ असा शब्द आहे. त्यामुळे आपण ‘पोचणे’ हा शब्द लिहिणे योग्य ठरते.
४ ई. ‘मनावर अंकित करणे’ या शब्दप्रयोगाच्या जागी ‘मनावर बिंबवणे’ किंवा ‘मनावर कोरणे’ हा शब्दप्रयोग वापरणे : मराठी भाषेत ‘अंकित करणे’ याचा अर्थ ‘एखाद्यावर सत्ता प्रस्थापित करणे किंवा एखाद्याला वश करणे (मानसिकदृष्ट्या स्वतःच्या कह्यात घेणे)’, असा आहे. हिंदी भाषेत ‘अंकित करना’ याचा अर्थ ‘बिंबवणे’ असा आहे; पण सध्या हिंदी भाषेच्या प्रभावामुळे मराठी भाषिक ‘मनावर बिंबवणे’ या अर्थाने लिहिण्यासाठी ‘मनावर अंकित करणे’ हा चुकीचा शब्दप्रयोग वापरू लागले आहेत. तो टाळायला हवा. मराठीत ‘मनावर बिंबवणे’ या अर्थाने ‘मनावर कोरणे’ हा शब्दही उपलब्ध आहे. त्याचाही उपयोग करू शकतो. पुढे एक अयोग्य मराठी वाक्य आणि एक योग्य मराठी वाक्य उदाहरणार्थ दिले आहे.
४ ई १. अयोग्य वाक्य : ही गोष्ट तू तुझ्या मनावर अंकित करून ठेव.
४ ई २. योग्य वाक्य : ही गोष्ट तू तुझ्या मनावर बिंबव.
किंवा
ही गोष्ट तू तुझ्या मनावर कोरून ठेव.
४ उ. ‘इसवी सन’ या अरबी शब्दाच्या जागी ‘वर्ष’ हा मराठी शब्द वापरणे : ‘इसवी सन’ हा अरबी शब्द असून ही कालगणना येशू ख्रिस्ताशी संबंधित आहे. येशूच्या जन्मानंतरच्या वर्षांना ‘इसवी सन’ असे म्हटले जाते. या शब्दाऐवजी आपण मराठीत ‘वर्ष’ हा शब्द वापरावा. ‘इसवी सन २००६’ असे लिहिण्याऐवजी ‘वर्ष २००६’ असे लिहावे. यासह काही वेळा लिखाणात शतकाचा उल्लेख करावा लागतो, उदा. ‘इसवी सनाचे ६ वे शतक’. अशा ठिकाणी ‘ख्रिस्तोत्तर ६ वे शतक’ असे लिहावे. ‘इसवी सनपूर्व ५ वे शतक’ असे लिहायचे असल्यास ‘ख्रिस्तपूर्व ५ वे शतक’ असे लिहावे. ही पद्धत प्रचलितही आहे. हिंदु राष्ट्रात मात्र आपण हिंदु कालगणनेनुसार तिथी आणि कलियुग वर्ष लिहिणार आहोत.’
४ ऊ. ‘महिना’ या फारसी शब्दाच्या जागी ‘मास’ हा स्वकीय शब्द वापरणे : ‘महिना’ हा फारसी शब्द मराठी भाषेमध्ये एवढा रुळला आहे की, तो परकीय आहे, हे बर्याच मराठी भाषिकांना ठाऊकही नाही. या शब्दाच्या जागी ‘मास’ हा स्वकीय शब्द वापरावा; मात्र ‘महिनाभर’ असा शब्द लिहायचा असल्यास ‘मासभर’ असे लिहू नये. ते वाचायला चांगले वाटत नाही. त्या ठिकाणी ‘एक मास’ असे लिहावे.
४ ए. ‘धर्मपत्नी’ हा हिंदी वळणाचा शब्द न लिहिता केवळ ‘पत्नी’ असे लिहिणे योग्य असणे : मराठी भाषेत ‘पती’ आणि ‘पत्नी’ असे शब्द आहेत. हिंदी भाषेमध्ये ‘धरमपत्नी’ असे म्हणण्याची पद्धत आहे. तिच्या प्रभावामुळे मराठी लोकही ‘धर्मपत्नी’ हा शब्द वापरू लागले आहेत. तो टाळायला हवा. ‘जी स्त्री विवाहानंतर पतीच्या संदर्भातील कौटुंबिक आणि सामाजिक धर्मकर्तव्यांचे पालन करते, तिच्यासाठी ‘पत्नी’ ही संज्ञा वापरली जाते.’ केवळ ‘पत्नी’ या शब्दातूनही हा बोध होतो. त्यामुळे ‘धर्मपत्नी’ या शब्दातील ‘धर्म’ हा शब्द अनावश्यक आहे.
४ ऐ. ‘संकेतस्थळाला भेट देणे’ नव्हे, तर ‘संकेतस्थळ पहाणे’, असे म्हणणे योग्य असणे : सध्याच्या माहिती महाजालाच्या (इंटरनेटच्या) युगात अनेक प्रकारची संकेतस्थळे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. संकेतस्थळांच्या संदर्भात इंग्रजी भाषेत ‘visit our website’ असे लिहिलेले असते. मराठी लिहिणारे लोक त्याचे जसेच्या तसे भाषांतर करत ‘आमच्या संकेतस्थळाला भेट द्या’, असे लिहितात. मराठी भाषेत ‘भेट देणे’ म्हणजे ‘एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित रहाणे’ होय. यानुसार आपण संकेतस्थळाला ‘भेट देत’ नाही, तर संकेतस्थळ ‘पहातो’. त्यामुळे संकेतस्थळाच्या संदर्भात ‘भेट देणे’ या इंग्रजाळलेल्या शब्दप्रयोगाऐवजी ‘पहाणे’ हा शब्द वापरावा, उदा. ‘शंभर जणांनी आमचे संकेतस्थळ पाहिले’, असे म्हणावे.
४ ओ. काही परकीय शब्द, त्यांच्यापुढे कंसात ते ज्या भाषांतून आले आहेत, त्यांची नावे आणि त्या शब्दांसाठी वापरायचे स्वकीय शब्द
|
| परकीय शब्द आणि पुढे कंसात त्या शब्दांच्या मूळ भाषा | पर्यायी स्वकीय शब्द |
| १. | अक्कल (अरबी) | शहाणपणा, समज, बुद्धी |
| २. | अफवा (अरबी) | कंडी, वदंता, वावडी |
| ३. | आजार (फारसी) | रोग, विकार, दुखणे, व्याधी |
| ४. | कायम (अरबी) | अढळ, दृढ, स्थिर, स्थायी |
| ५. | काँप्युटर (इंग्रजी) | संगणक |
| ६. | खुर्ची (अरबी) | आसंदी |
| ७. | तास (अरबी) | घंटा |
| ८. | मदत (अरबी) | साहाय्य, साह्य |
| ९. | रोजी (फारसी) | दिवशी |
| १०. | व (फारसी) | आणि, अन् |
परकीय आणि स्वकीय शब्दांविषयी अधिक विवेचन कै. रामदासस्वामी सोनार, जळगाव यांनी लिहिलेल्या ‘अभारतीय शब्दकोश’ या ग्रंथात दिले आहे.’
- सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२२)