१६. ‘भाषेशी संबंधित अध्यात्म’ आणि भाषेतील काही शब्द लिहिण्याची पद्धत

१. भाषेचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून अभ्यास करणे आवश्यक असणे : एक लहानसा प्रयोग करून पाहूया. पुढे दोन वाक्ये दिली आहेत. त्यांपैकी प्रथम ‘अ’ हे वाक्य चार-पाच वेळा उच्चारा. त्यानंतर ‘आ’ हे वाक्य चार-पाच वेळा उच्चारा. ‘दोन्हींपैकी कोणते वाक्य उच्चारल्यावर चांगले वाटते ?’, हे अभ्यासा आणि मग त्यापुढील लिखाण वाचा.

अ. मी हे करेन.

आ. मी हे करीन. 

पहिल्या वाक्यापेक्षा दुसरे वाक्य उच्चारल्यावर अधिक चांगले वाटते. याचे कारण, ‘पहिल्या वाक्यातील ‘करेन’ या शब्दाच्या उच्चारणामध्ये अहंभाव जाणवतो. ‘करेन’च्या तुलनेत दुसर्‍या वाक्यातील ‘करीन’ या शब्दाचा उच्चार सौम्य वाटतो.’ यानुसार अहंभावाचे प्रकटीकरण टाळण्यासाठी ‘करीन’ हा सौम्य शब्द वापरावा. याचप्रमाणे ‘तो हे करेल’, असे न म्हणता ‘तो हे करील’, असे म्हणावे. याचे आणखी एक उदाहरण पुढे दिले आहे

१ अ. ‘कोठे’ या शब्दाऐवजी ‘कुठे’ हा शब्द वापरणे अधिक योग्य असणे : मराठीमध्ये ‘कोठे’ आणि ‘कुठे’ हे दोन्ही शब्द वापरात आहेत. या शब्दांच्या संदर्भातही वरीलप्रमाणे प्रयोग करू शकतो. असा प्रयोग केल्यावर ‘कोठे’ हा शब्द उच्चारल्यानंतर अहंभाव जाणवतो, तर ‘कुठे’ या शब्दाच्या उच्चारात सौम्यता जाणवते. त्यामुळे ‘कोठे’ हा शब्द न वापरता ‘कुठे’ हा शब्द वापरणे अधिक योग्य आहे. याच धर्तीवर ‘कोठेही’, ‘कोठेतरी’, ‘कोठेच’ इत्यादी शब्दांच्या ऐवजी ‘कुठेही’, ‘कुठेतरी’, ‘कुठेच’ इत्यादी शब्द वापरावेत

. काही विशिष्ट शब्द लिहिण्याची पद्धत  

२ अ. ‘तांदूळ’ या शब्दाचे सामान्यरूप ‘तांदळाचे’, ‘तांदळाला’ या प्रकारे न लिहिता ‘तांदुळाचे’, ‘तांदुळाला’ या प्रकारे लिहिणे : हे सूत्र पहाण्यापूर्वी आपण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पूर्वी प्रसिद्ध केलेल्या ‘सामान्यरूप म्हणजे काय ?’ या सूत्राची थोडक्यात उजळणी करू. कोणत्याही शब्दास ‘स’, ‘ला’, ‘ना’, ‘ने’ इत्यादी विभक्तीचे प्रत्यय लागल्यास किंवा ‘वर’, ‘बाहेर’, ‘ही’, ‘कडे’ इत्यादी ‘शब्दयोगी अव्यये’ लागल्यास मूळ शब्दाचे जे नवे रूप सिद्ध होते, त्याला ‘सामान्यरूप’ असे म्हणतात. ‘अण्णा शहाळ्याचे पाणी पीत होते’, या वाक्यातील ‘शहाळ्याचे’ या शब्दामधील मूळ शब्द ‘शहाळे’ असा आहे. त्याला ‘चे’ हा विभक्तीचा प्रत्यय लागल्यावर त्याचे रूप ‘शहाळ्या’ असे झाले. या रूपाला ‘सामान्यरूप’ म्हणतात.

प्रचलित मराठीमध्ये ‘तांदूळ’ या शब्दाचे सामान्यरूप ‘तांदळाचे’, ‘तांदळाला’, ‘तांदळात’ असे केले जाते. यात मूळ ‘तांदूळ’ या शब्दातील ‘दू’ या अक्षराचा ‘द’ होतो; मात्र ‘तांदळा’ या नावाचा एक विशिष्ट प्रकारचा दगडही असतो. या दगडाला शेंदूर लेपून त्याची देव किंवा देवी म्हणून पूजा केली जाते. त्याला ‘देवाचा तांदळा’ किंवा ‘देवीचा तांदळा’ असे म्हणतात. त्यामुळे ‘तांदूळ’ या शब्दाचे सामान्यरूप ‘तांदळा’ असे न करता ‘तांदुळा’ असे करावे आणि त्याला विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यये लावावीत,उदा. तांदुळाचे, तांदुळाला, तांदुळात इत्यादी

२ आ. ‘दुप्पट’, ‘तिप्पट’, ‘दोन पट’, ‘तीन पट’ इत्यादी शब्दांची सामान्यरूपे लिहिण्याची पद्धत : ही पहाण्यापूर्वी एक सूत्र लक्षात घेणे आवश्यक आहे. ते म्हणजे, ‘तीन अक्षरी शब्दांमधील मधले अक्षर ‘क’चे किंवा ‘प’चे द्वित्व (तेच अक्षर दोनदा उच्चारणे) असेल, म्हणजे ‘क्क’ किंवा ‘प्प’ असे असेल, तर सामान्यरूप होतांना ते द्वित्व नाहीसे होते, उदा. टक्कर - टकरीत.’

आता ‘दुप्पट’, ‘तिप्पट’, ‘चौपट’, ‘दोन पट’, ‘तीन पट’ इत्यादी ‘पटीं’शी संबंधित शब्दांची सामान्यरूपे कशी लिहावीत ?’, हे पाहू. दुप्पट’ या शब्दाला ‘ने’ हा विभक्तीचा प्रत्यय लागल्यास ‘दुपटीने’ असा शब्द सिद्ध होतो. ‘दुपटींनी’ असा होत नाही. अशाच प्रकारे ‘तिप्पट’ या शब्दाचे ‘तिपटीने’ असे, तर ‘चौपट’ या शब्दाचे ‘चौपटीने’ असे रूप सिद्ध होते. ‘तिपटींनी’ किंवा ‘चौपटींनी’ अशी रूपे सिद्ध होत नाहीत; मात्र ‘दोन पट’, ‘तीन पट’, ‘चार पट’ असे दोन सुटे शब्द असतील आणि त्यांना विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यये लागली, तर ‘दोन पटींनी’, ‘तीन पटींनी’, ‘चार पटींनी’ अशी रूपे सिद्ध होतात. या ठिकाणी ‘दोन पटीने’, ‘तीन पटीने’, ‘चार पटीने’ अशी रूपे सिद्ध होत नाहीत.  

२ इ. ‘बदाम, पिस्ते इत्यादी’ या अर्थाने वापरला जाणारा ‘सुकामेवा’ हा शब्द जोडशब्द असणे :सुका खाऊ’ हे शब्द सुटे लिहिले जातात. ‘ओला खाऊ’ हे शब्दही सुटे शब्द आहेत; पण ‘सुकामेवा’ या शब्दातील ‘सुका’ आणि ‘मेवा’ हे शब्द एकत्र लिहिल्यास ‘बदाम, पिस्ते, काजू, अक्रोड इत्यादी अगदी विशिष्ट प्रकारचे पदार्थ’, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ‘सुकामेवा’ हा शब्द जोडशब्द लिहावा.’

२ ई. ‘सोयरसुतक’ नव्हे, तर ‘सुवेरसुतक’ असे लिहिणे : हे सूत्र समजून घेण्यासाठी प्रथम आपण या दोन शब्दांचे अर्थ पाहू. ‘सोयरसुतक’ या शब्दामध्ये ‘सोयर’ आणि ‘सुतक’ हे दोन शब्द समाविष्ट आहेत. यांपैकी ‘सोयर’ या शब्दाला कोणताही अर्थ नाही. ‘सुतक’ म्हणजे, ‘एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांनी तेरा दिवस काही विशिष्ट नियम पाळायचे असतात. या तेरा दिवसांच्या कालावधीला ‘सुतक’ असे म्हणतात. सुवेरसुतक’ या शब्दामध्ये ‘सुवेर’ आणि ‘सुतक’ असे दोन शब्द समाविष्ट आहेत. त्यांपैकी ‘सुवेर’ म्हणजे, ‘एखाद्या घरात मूल जन्माला आल्यास त्या घरातील व्यक्तींनी बारा दिवस काही विशिष्ट नियम पाळायचे असतात. या बारा दिवसांच्या कालावधीला ‘सुवेर’ असे म्हणतात.’

समाजात काही व्यक्ती अशा असतात ज्यांना जगात किंवा विशिष्ट लोकांच्या संदर्भात काहीही घडले, तरी त्याचे काहीच वाटत नाही. अशा व्यक्तींविषयी बोलतांना ‘त्यांना कशाचे काहीच सुवेरसुतक (सुख-दुःख) नाही’, असे म्हटले जाते. अशा वाक्यांत बर्‍याचदा ‘सोयरसुतक’ हा चुकीचा शब्द वापरला जातो. त्याच्या जागी वरील परिच्छेदात दिलेले अर्थ लक्षात घेऊन ‘सुवेरसुतक’ हा योग्य शब्द वापरावा

२ उ. ‘वास्तुदेवता’ या शब्दातील ‘स्तु’ र्‍हस्व, तर ‘वास्तूशास्त्र’ या शब्दातील ‘स्तू’ दीर्घ लिहिणे : वास्तुदेवता’ या शब्दातील ‘वास्तु’ ही देवता आहे. ‘देवतांच्या नावांतील चैतन्य लिहिणार्‍यास आणि वाचणार्‍यास मिळावे, यासाठी ती नावे मूळ संस्कृतनुसार लिहावीत’, असे आपले धोरण आहे. त्यामुळे ‘वास्तुदेवता’ या शब्दातील ‘स्तु’ मूळ संस्कृतप्रमाणे र्‍हस्व लिहावा. ‘वास्तूशास्त्र’ या शब्दाचा अर्थ ‘वास्तूविषयी, म्हणजे एखाद्या घराविषयी किंवा इमारतीविषयी बोध देणारे शास्त्र’, असा आहे. येथे ‘वास्तू’ हा शब्द देवता या अर्थाने नव्हे, तर ‘घर किंवा इमारत’ या अर्थाने वापरण्यात आला आहे. त्यामुळे या शब्दातील ‘स्तू’ दीर्घ लिहावा.

२ ऊ. लेखन करणार्‍या व्यक्तीने लेखनाच्या शेवटी स्वतःचे नाव लिहितांना नावापूर्वी ‘श्री.’ लिहिणे :सध्या समाजात प्रचलित असलेल्या नियमानुसार एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःचे स्वतंत्र लेखन करते, तेव्हा त्या लिखाणाच्या शेवटी स्वतःचे नाव लिहितांना ती नावापूर्वी ‘श्री.’ ही उपाधी लिहीत नाही. ही प्रथा इंग्रजीतून मराठी भाषेत आली आहे. आपल्या संस्कृतीमध्ये मात्र ‘स्वतःला आदराने संबोधणे, म्हणजे स्वतःतील ईश्वराला आदराने संबोधणे’, ही विचारसरणी रूढ आहे. त्यामुळे आपण लिखाणाच्या शेवटी स्वतःचे नाव लिहितांना नावापूर्वी ‘श्री.’ (श्रीयुत) लिहावे

२ ए. पती-पत्नी यांच्या नावांचा एकत्रित उल्लेख करतांना प्रथम पतीचे आणि नंतर पत्नीचे नाव लिहिणे : हल्ली बरेच जण पती आणि पत्नी यांच्या नावांचा एकत्र उल्लेख करतांना प्रथम पत्नीचे अन् नंतर पतीचे नाव लिहितात, उदा. सौ. रेणू आणि श्री. अथर्व करंदीकर. ही पद्धत अयोग्य आहे. प्रथम पतीचे आणि नंतर त्याच्या पत्नीचे नाव लिहावे, उदा. श्री. अथर्व आणि सौ. रेणू करंदीकर.

२ ऐ. ‘अंधःकार’ याऐवजी अंधकार’ असे लिहिणे योग्य असणे : संस्कृतमध्ये ‘अंधः’ (मूळ शब्द ‘अंधस्’) म्हणजे ‘जेवण’, तर अंध’ म्हणजे ‘काळोख’. ‘अंधकार’ या शब्दाचा अर्थ ‘काळोख होणे’, असा आहे. असा अर्थ असलेला शब्द लिहितांना त्यात ‘जेवण’ या अर्थाने वापरण्यात येणारा ‘अंधः’ हा शब्द लिहिणे अयोग्य आहे. त्या जागी ‘अंधकार’ हा शब्द लिहावा.

२ ओ. ‘घनःश्याम’ याऐवजी ‘घनश्याम’ असे लिहिणे : घनश्याम’ हा संस्कृत शब्द आहे. या शब्दात ‘घन’ आणि ‘श्याम’ असे दोन शब्द आहेत. संस्कृत व्याकरणानुसार ‘जेव्हा दोन शब्द जोडले जातात, तेव्हा त्यांतील पहिला शब्द त्याच्या मूळ रूपात जसाच्या तसा रहातो.’ ‘घनश्याम’ या शब्दातील पहिला शब्द ‘घन’ हा आहे आणि तेच त्याचे मूळ रूप आहे. ‘घनः’ हे त्याचे मूळ रूप नाही. त्यामुळे ‘घन’ हा शब्द ‘श्याम’ या शब्दाच्या आरंभी जोडल्यावर ‘घनश्याम’ असा शब्द सिद्ध होतो. ‘घनःश्याम’ असा होत नाही. यानुसार ‘घनःश्याम’ असे न लिहिता ‘घनश्याम’ असे लिहावे.

२ औ. ‘ऋषिकेश’ असे नव्हे, तर ‘हृषीकेश’ असे लिहिणे : बरेच जण व्यक्तीचे नाव ‘ऋषिकेश’ असे लिहितात; परंतु वास्तविक ते ‘हृषीकेश’ असे आहे. ‘हृषीकेश’ या संस्कृत शब्दातील ‘हृषीक’ म्हणजे इंद्रिये. त्यांचा ईश किंवा स्वामी तो ‘हृषीकेश’ होय. श्रीविष्णूच्या २४ नावांपैकी हे एक नाव आहे.’

२ अं. सप्तलोकांची नावे आणि त्यांचे व्याकरण : सप्तलोकांची नावे ही संस्कृत व्याकरणानुसार लिहिली जातात. पुढील सारणीत ही नावे आणि त्यांतील ‘लोक’ हा शब्द काढून त्या नावांत असलेले मूळ शब्द दिले आहेत

 

सप्तलोकांची नावे

सप्तलोकांच्या नावांतील मूळ शब्द

.

भूलोक किंवा भूर्लाेक

भू किंवा भूर्

.

भुवर्लाेक

भुवर्

.

स्वर्गलोक किंवा स्वर्लाेक

स्वर्ग किंवा स्वर्

.

महर्लाेक

महर्

.

जनलोक

जन

.

तपोलोक

तपस्

.

सत्यलोक

सत्य

२ अं १. सप्तलोकांच्या नावांमधील व्याकरण 

२ अं १ अ. ‘रेफांत’ शब्द आणि त्यांचा नियम : सूत्र क्र. ‘२ अं’मधील सारणीत दिल्याप्रमाणे २, ३ आणि ४ क्रमांकाच्या ‘लोकां’च्या नावांतील मूळ शब्द ‘भुवर्’, ‘स्वर्’ अन् ‘महर्’ हे आहेत. या सर्व शब्दांच्या शेवटी ‘र्’ हे अक्षर आले आहे. अशा शब्दांना ‘रेफांत’ शब्द असे म्हणतात.संस्कृत व्याकरणानुसार या शब्दांचा ‘रेफ (र्)’ काढून त्यांची ‘भुव’, ‘स्व’ आणि ‘मह’ अशी रूपे लिहिणे अयोग्य आहे. ती ‘भुवर्’, ‘स्वर्’ आणि ‘महर्’ अशीच लिहायला हवीत. या रूपांना ‘लोक’ हा शब्द जोडतांना त्यांतील ‘र्’ हे अक्षर ‘लोक’ या शब्दातील ‘लो’ या अक्षरात सामावले जाते आणि ‘र्लाेक’ हे रूप सिद्ध होते. यानुसार ‘भुवर्लाेक’, ‘स्वर्लाेक’ आणि ‘महर्लाेक’ याप्रमाणे नावे लिहिणे योग्य आहे.

२ अं १ आ. ‘भूर्लाेक’ला पर्यायी ‘भूलोक’ आणि ‘स्वर्लाेक’ला पर्यायी ‘स्वर्गलोक’ हे शब्दही वापरू शकत असणे : सारणीमध्ये प्रथम क्रमांकावर असलेला ‘भूर्’ हादेखील ‘रेफांत’ शब्दच आहे; परंतु त्याला ‘भू’ हा ‘रेफांत’ नसलेला पर्यायी शब्द संस्कृतमध्येच देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या ‘स्वर्’ या ‘रेफांत’ शब्दाला ‘स्वर्ग’ हा पर्यायी शब्द देण्यात आला आहे. त्यामुळे या शब्दांना ‘लोक’ हा शब्द जोडल्यावर ‘भूर्लाेक’सह ‘भूलोक’ आणि ‘स्वर्लाेक’सह ‘स्वर्गलोक’ हे शब्दही आपण वापरू शकतो.

२ अं १ इ. ‘तपस्’ या मूळ शब्दापासून ‘तपोलोक’ हा शब्द सिद्ध होण्याची प्रक्रिया :सूत्र क्र. ‘२ अं’ मधील सारणीतील ‘तपस्’ या शब्दाच्या अंती ‘स्’ आला आहे. या शब्दाला ‘सकारांत’ शब्द असे म्हणतात. हा शब्द भाषेत वापरला जातांना त्यातील ‘स्’ या अक्षराचे विसर्गात (:: त) रूपांतर होते आणि तो ‘तपः’ असा लिहिला जातो. ‘तपः’ या शब्दाला ‘लोक’ हा शब्द जोडल्यास ‘तपः + लोक = तपोलोक’ असा संधी सिद्ध होतो. याचा नियम असा आहे की, ‘पहिल्या शब्दातील विसर्गाच्या (::  च्या) आधी ‘अ’युक्त अक्षर असेल, जसे ‘तपः’मध्ये ‘प’ आहे आणि दुसर्‍या शब्दातील पहिले अक्षर ‘ल’सारखे मृदू व्यंजन असेल, तर विसर्गाचे (:: चे) रूपांतर ‘उ’ या स्वरामध्ये होते. ‘प’मधील ‘अ’ आणि विसर्गाचा ‘उ’ एकत्र येऊन ‘ओ’ हा स्वर सिद्ध होतो. त्यामुळे ‘प’चा ‘पो’ होतो. अशा प्रकारे ‘तपोलोक’ हा शब्द सिद्ध होतो. आपण यापूर्वी पाहिलेच आहे की, मराठी वर्णमालेत व्यंजनांच्या ‘क्’, ‘च्’, ‘ट्’, ‘त्’ आणि ‘प्’ या पाच गटांपैकी प्रत्येक गटातील शेवटची तीन व्यंजने, म्हणजे ‘ग्, घ्, ङ्’; ‘ज्, झ्, ञ्’; ‘ड्, ढ्, ण्’; ‘द्, ध्, न्’ आणि ‘ब्, भ्, म्’ अन् अन्य व्यंजनांपैकी ‘य्, र्, ल्, व्, ह्, ळ्’ ही व्यंजने मृदू व्यंजने आहेत.

२ क. ‘वहाणे’, ‘पहाणे’ आणि ‘रहाणे’ हे शब्द लिहिण्याविषयी नियम : प्रचलित मराठी लिखित भाषेत ‘वाहणे’, ‘पाहणे’ आणि ‘राहणे’ अशी रूपे वापरली जातात; परंतु ही रूपे उच्चारांनुसार अयोग्य आहेत. बहुतांश मराठी भाषिक लोक बोलतांना ‘वहाणे’, ‘पहाणे’ आणि ‘रहाणे’ असे उच्चार करतांना आढळतात. यांतील ‘वहाणे’ हा शब्द संस्कृत भाषेतील त्याच अर्थाच्या ‘वह्’ या धातूच्या रूपाशी मिळताजुळता आहे. त्यामुळे आपण या शब्दांच्या प्रचलित व्याकरणात पालट केला असून हे शब्द ‘वहाणे’, ‘पहाणे’ आणि ‘रहाणे’याप्रमाणे लिहिण्याचे धोरण स्वीकारले आहे. या शब्दांच्या वाक्यांप्रमाणे पालटणार्‍या निरनिराळ्या रूपांची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

२ क १. ‘वहाणे’ या शब्दाची वाक्यांतील विविध रूपे

२ क १ अ. ‘प्रवाहदर्शक (प्रवाह दर्शवणार्‍या)’ वाक्यांतील रूपे

. पाणी वहाते.

. पाटाचे पाणी सर्व झाडांमधून वहावे, यासाठी त्याने दिवसभर राबून पाण्याचा मार्ग मोकळा केला.

. वहात्या पाण्यावर शेवाळे जमत नाही.

. वारा वहातो.

. वारा वहाता रहावा, यासाठी आकांक्षाने दोन्ही खिडक्या उघडल्या.

२ क १ आ. ‘अर्पण करणे’ या अर्थाच्या वाक्यांमधील रूपे

. शिवाला बेल वहातात.

. देवाला वहाण्यासाठी पत्री आणली.

. आई ही फुले देवीला वहाणार आहे.

. श्री गणपतीला दूर्वा वहाव्यात.

. श्रद्धा श्रीकृष्णाच्या चरणी तुळशीपत्रे वहात होती.

थोडक्यात, ‘प्रवाह दर्शवणे’ आणि ‘अर्पण करणे’ या दोन्ही अर्थांनी लिहितांना ‘वहाणे’ हाच शब्द वापरावा अन् त्याची वाक्यांतील रूपेही सारख्याच पद्धतीने लिहावीत.

२ क २. ‘पहाणे’ या शब्दाची वाक्यांतील विविध रूपे

. मी आणि मामा जत्रा पहाण्यासाठी गेलो.

. तुम्ही एकदा तरी जाऊन तिची चित्रे पहायला हवीत.

. तो चकित होऊन पहात राहिला.

. आम्ही प्रदर्शन पहाणार आहोत.

. तानाजी मालुसरे यांनी आक्रमण करण्यापूर्वी गडाची पहाणी केली.

२ क ३. ‘रहाणे’ या शब्दाची वाक्यांतील विविध रूपे

. आता आम्ही गावी जाऊन रहाणार आहोत.

. श्री. कानडे पूर्वी दत्तमंदिराच्या मागे रहात.

. त्याने घरात रहावे, यासाठी आई-वडिलांनी पुष्कळ प्रयत्न केले.

. त्यांचे रहाणीमान आता उंचावले आहे.

. त्याची रहाणी साधी आहे.

२ क ४. ‘वहाणे’, ‘पहाणे’ आणि ‘रहाणे’ या शब्दांच्या रूपांत होणारे पालट : काही वाक्यांमध्ये ‘वहा’चे ‘वाह’, ‘पहा’चे ‘पाह’ आणि ‘रहा’चे ‘राह’ अशी रूपे होतात. त्यानंतर त्यांतील ‘ह’ला र्‍हस्व अथवा दीर्घ ‘उ-कार’ किंवा ‘इ-कार’ लागतो आणि एखादा प्रत्यय लागून नवीन शब्द सिद्ध होतात. काही वेळा प्रत्यय न लागताही शब्द सिद्ध होतात. ‘वारे वहाणे’ हा मूळ शब्दप्रयोग आहे; मात्र त्याचा ‘सूर्यास्त झाला आणि गार वारे वाहू लागले’, या वाक्यात उपयोग होतांना ‘वहाणे’ या शब्दातील पहिल्या दोन अक्षरांत पालट होऊन ती ‘वाह’ अशी झाली. त्यानंतर ‘ह’ या अक्षरामध्ये ‘ऊ-कार’ समाविष्ट होऊन ‘वाहू’ असे रूप सिद्ध झाले. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

. मागील वर्षीच्या पुरामध्ये तो बांध वाहिला.

. आत्या म्हणाली, ‘‘भाऊ, देवाला शिळी फुले वाहू नयेत.’’ 

. दादा चिंटूला म्हणाला, ‘‘पाहू बरं किती लागलं आहे ते.’’

. आम्ही श्री भवानीदेवीची नवीन मूर्ती पाहून आलो.

. मी चार दिवस मावशीकडे राहून आलो.

२ ख. ‘हत्या’ या शब्दातील ‘त्या’ हे जोडाक्षर उच्चारानुसार ‘त्त्या’ याप्रमाणे न लिहिण्याची कारणे

२ ख १. हत्या’ हा तत्सम (संस्कृतमधून जसाच्या तसा मराठीत आलेला) शब्द आहे.

२ ख २. संस्कृत व्याकरणामध्ये जोडाक्षरांच्या उच्चारांच्या संदर्भात सांगितलेला नियम : जेव्हा एखाद्या शब्दातील जोडाक्षराच्या आधीचे अक्षर ‘अ’, ‘इ’, ‘उ’, ‘ऋ’ किंवा ‘लृ’हे र्‍हस्व स्वर अंतर्भूत असलेले असते, तेव्हा त्या शब्दाचा उच्चार करतांना ते अक्षर आपण नेहमीची र्‍हस्व अक्षरे उच्चारतांना जेवढ्या वेळात उच्चारतो, त्यापेक्षा अल्प वेळात उच्चारावे. ‘शक्य’ या शब्दामध्ये ‘क्य’ या जोडाक्षराच्या आधीचे ‘श’ हे अक्षर ‘अ’ स्वरयुक्त आहे. ‘अ’ हा र्‍हस्व स्वर आहे. त्यामुळे ‘शक्य’ या शब्दाचा उच्चार करतांना आपण एरव्ही ‘श’ हे अक्षर जेवढ्या वेळात उच्चारतो, त्यापेक्षा अल्प वेळात उच्चारावे.

२ ख . वरील नियमानुसार उच्चार करतांना जोडाक्षरातील पहिल्या अक्षराचे ‘द्वित्व (एकच अक्षर दोन वेळा आणि जोडून लिहिणे, उदा. क्क, च्च, प्प इत्यादी)’ झाल्याप्रमाणे वाटणे; परंतु ते तसे नसणे : हत्या’ या शब्दामध्ये ‘त्या’ या जोडाक्षराच्या आधी ‘ह’ हे ‘अ’ हा र्‍हस्व स्वर अंतर्भूत असलेले अक्षर आले आहे. त्यामुळे सूत्र क्र. ‘२ ख २’मध्ये दिलेल्या नियमानुसार ते उच्चारतांना नेहमीपेक्षा अल्प वेळेत उच्चारले जाते. परिणामी पुढील ‘त्या’ या जोडाक्षरावर जोर येतो आणि ‘हत्या’ हा शब्द ‘हत्त्या’ असा उच्चारला जात आहे कि काय ?’, असा प्रश्न पडतो; परंतु तो केवळ आभास आहे. ‘हत्या’ या शब्दातील ‘ह’ र्‍हस्व स्वरांत असल्यामुळे तो निर्माण झालेला आहे. त्यामुळे या शब्दातील ‘त्’ हा ‘त्त्’ असा न लिहिता ‘त्’ असा एकेरी लिहिणे योग्य आहे. यानुसार हा शब्द ‘हत्या’ असा सिद्ध होतो. या नियमाची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अगत्य, एक्याऐंशी, सत्य, नित्य, पुण्य, कृत्य, मृत्यू इत्यादी.

२ ग. ‘पिंडी’ आणि ‘पिंड’ या शब्दांचे अर्थ लक्षात घेऊन त्यांचा वापर करणे आवश्यक असणे : ‘पिंडी’ हा शब्द ‘शिवलिंगा’शी संबंधित आहे. शिवलिंगाला ‘शिवाची पिंडी’ असे म्हणतात, तर श्राद्धविधीच्या वेळी भातापासून जे बनवले जातात, त्यांना ‘पिंड’ असे संबोधतात. सध्या ‘पिंडी’ आणि ‘पिंड’ हे शब्द बर्‍याच जणांकडून अयोग्य ठिकाणी वापरले जातात. यासाठी हे अर्थ लक्षात घेऊन ते वापरणे सयुक्तिक ठरेल

२ घ. ‘अध्यक्ष’ या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ‘अध्यक्षा’ असे होणे; मात्र ‘डॉक्टर’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ‘डॉक्टरा’ असे न होता ‘डॉक्टरीण’ असे होत असणे : अध्यक्ष’ या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ‘अध्यक्षा’, ‘नेता’ याचे स्त्रीलिंगी रूप ‘नेत्या’, ‘शिक्षक’चे ‘शिक्षिका’, तर ‘वक्ता’चे ‘वक्त्या’ असे होते. मात्र ‘डॉक्टर’चे स्त्रीलिंगी रूप ‘डॉक्टरा’ किंवा ‘वकील’चे ‘वकिला’ असे होत नाही. ही रूपे अनुक्रमे ‘डॉक्टरीण’ आणि ‘वकिलीण’ अशी होतात. याचे कारण असे की, ‘अध्यक्ष’, ‘शिक्षक’, ‘नेता’ आणि ‘वक्ता’ हे शब्द संस्कृतमधून मराठी भाषेत आले आहेत. संस्कृत भाषेमध्ये ‘कोणत्या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कसे असावे ?’ यासंबंधी अत्यंत काटेकोर नियम आहेत. त्यांच्यानुसार या शब्दांची रूपे ठरली आहेत; परंतु ‘डॉक्टर’ किंवा ‘वकील’ हे शब्द परभाषांतून मराठीत आले आहेत. त्यामुळे त्यांना संस्कृत भाषेतील व्याकरणाचे नियम लागत नाहीत. त्याऐवजी मराठी भाषेतील नियम लागतात. मराठी भाषेत ‘शिंपी’, ‘सुतार’, ‘लोहार’ असे संबंधित व्यक्तींचा व्यवसाय दर्शवणारे जे शब्द आहेत, त्यांची स्त्रीलिंगी रूपे अनुक्रमे ‘शिंपीण’, ‘सुतारीण’, ‘लोहारीण’ अशी होतात. येथे मूळ शब्दांना ‘ईण’ हा प्रत्यय लागतो. ‘डॉक्टर’ आणि ‘वकील’ हेदेखील व्यवसाय दर्शवणारे शब्द आहेत. त्यामुळे त्यांची स्त्रीलिंगी रूपेही ‘डॉक्टरीण’ आणि ‘वकिलीण’ अशी होतात. याची आणखी उदाहरणे पुढे दिली आहेत.

माळी - माळीण, कुंभार - कुंभारीण, पाटील - पाटलीण, खोत - खोतीण इत्यादी.

२ च. ‘तामिळनाडू’ नव्हे, तर ‘तमिळनाडू’ हा शब्द योग्य असणे : तमिळ’ ही भाषा आहे. ‘नाडू’ या शब्दाचा अर्थ ‘प्रदेश’ असा आहे. ‘ज्या प्रदेशात तमिळ भाषा बोलली जाते, तो प्रदेश म्हणजे ‘तमिळनाडू’. त्यामुळे ‘तामिळनाडू’ असे लिहिण्याऐवजी ‘तमिळनाडू’ असे लिहावे. याप्रमाणे अन्य काही शहरांची नावे लिहिण्याची अयोग्य आणि योग्य पद्धत पुढे दिली आहे.

 

शहरांची अयोग्य नावे

शहरांची योग्य नावे

.

बेंगळूर किंवा बंगलोर

बेंगळुरू

.

मंगळूर किंवा मंगलोर

मंगळुरू

.

म्हैसूर

मैसुरू

२ छ. ‘तत्त्वन्यास विधी’ आणि ‘तत्त्वोत्तारण विधी’ :देवतेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतांना काही विधींद्वारे त्या मूर्तीमध्ये संबंधित देवतेचे तत्त्व चढवण्यात (आणण्यात) येते. या विधींना ‘तत्त्वन्यास विधी’ असे म्हणतात. काही प्रसंगी, विशेषतः श्री गणेशचतुर्थीचे व्रत पूर्ण झाल्यानंतर मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी ती हलवण्यापूर्वी काही विधी करून तिच्यात स्थापित केलेले श्री गणेशतत्त्व उतरवण्यात येते. या विधींना ‘तत्त्वोत्तारण विधी’ असे म्हणतात.लेखकांना मंदिरांचे जीर्णाेद्धार, त्यांतील जुन्या मूर्ती पालटून नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना करणे, नूतन मंदिरांची स्थापना इत्यादी विविध विषयांवर लिहावे लागते. त्यासाठी हे दोन शब्द ठाऊक असणे आवश्यक आहे

२ ज. ‘मान सरोवर’ हा प्रचलित, तर ‘मानस सरोवर’ हा योग्य शब्द असणे : अलीकडे विविध नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध होणार्‍या लेखनात तिबेटमधील कैलास पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या प्रसिद्ध ‘मानस सरोवरा’विषयी लिहितांना ‘मान सरोवर’ असा शब्द लिहिला जातो. वास्तविक ‘मान सरोवर’ हा ‘मानस सरोवर’ या शब्दाचे अपभ्रंशित रूप आहे. पुराणांमध्ये सर्वत्र ‘मानस सरोवर’ हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे आपणही ‘मानस सरोवर’ हा शब्द वापरावा

२ झ. क्रियापदांची ‘करूयात’, ‘पाहूयात’ इत्यादी अयोग्य रूपे टाळून ‘करूया’, ‘पाहूया’ इत्यादी योग्य रूपे वापरणे : सध्या मराठी बोलणारे अनेक जण ‘करूयात’, ‘पाहूयात’, ‘घेऊयात’, ‘जाऊयात’, ‘थांबूयात’ इत्यादी व्याकरणदृष्ट्या योग्य नसलेली रूपे सर्रास वापरतांना आढळतात. दूरचित्रवाहिन्यांवरील वृत्तनिवेदक, मनोरंजन मालिकांमधील कलाकार इत्यादींच्या तोंडून अशी रूपे सातत्याने ऐकायला मिळतात. ही रूपे अयोग्य आहेत. या शब्दांना ‘त’ हे अक्षर जोडण्याची आवश्यकता नाही. हे शब्द ‘करूया’, ‘पाहूया’, ‘घेऊया’, ‘जाऊया’, ‘थांबूया’ या प्रकारे लिहावेत.’ 

- सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (..२०२३)