१. वाक्यातील शब्दांना ‘विभक्ती प्रत्यय’, तसेच ‘शब्दयोगी अव्यये’ लागल्यास शब्दांची ‘सामान्यरूपे’ सिद्ध होणे : मराठी भाषेत शब्दांना विविध प्रकारचे प्रत्यय लागतात; पण ‘विभक्ती प्रत्यय’ किंवा ‘शब्दयोगी अव्यये’ लागल्यासच शब्दांची ‘सामान्यरूपे’ सिद्ध होतात. यासाठी ‘विभक्ती प्रत्यय’ आणि ‘शब्दयोगी अव्यये’ म्हणजे काय ?’ हे जाणून घेणे आवश्यक आहे.
२. विभक्ती, विभक्ती प्रत्यय आणि सामान्यरूपे यांच्यातील परस्परसंबंध : शब्द वाक्यात वापरले जातांना बर्याचदा त्यांच्या मूळ रूपांत पालट होतो, उदा. ‘पुण्याच्या तुळशीबागेत तांब्याची भांडी मिळतात’, या वाक्यामध्ये ‘पुणे’, ‘तुळशीबाग’ आणि ‘तांबे’ हे शब्द वाक्यामध्ये जसेच्या तसे आलेले नाहीत. त्यांत ‘पुणे’चे ‘पुण्याच्या’, ‘तुळशीबाग’चे ‘तुळशीबागेत’ आणि ‘तांबे’चे ‘तांब्याची’ असे पालट झाले आहेत. या पालटलेल्या रूपांना ‘विभक्ती’ असे म्हणतात. या रूपांतील ‘च्या’, ‘ना’ आणि ‘त’ या अक्षरांना ‘विभक्तीचे प्रत्यय’ म्हणतात आणि ‘पुण्या’, ‘तुळशीबागे’ अन् ‘तांब्या’ या रूपांना ‘सामान्यरूपे’ म्हणतात.
२ अ. विभक्तींचे प्रत्यय आणि त्यांतील सध्याच्या गद्य भाषेत अधिक प्रचलित असलेल्या प्रत्ययांनुसार ‘बालक’ या शब्दाची होणारी विविध रूपे
| विभक्ती | एकवचन | अनेकवचन | ||
| प्रत्यय | उदाहरणे | प्रत्यय | उदाहरणे | |
| प्रथमा | - | बालक | - | बालके |
| द्वितीया | स
ला
ते | बालकास
बालकाला | स
ला
ना
ते | बालकांस
बालकांना |
| तृतीया | ने
ए
शी | बालकाने
बालकाशी | नी
शी
ई
ही | बालकांनी
बालकांशी |
| चतुर्थी | स
ला
ते | बालकास
बालकाला | स
ला
ना
ते | बालकांस
बालकांना |
| पंचमी | ऊन
हून |
बालकाहून | ऊन
हून |
बालकांहून |
| षष्ठी | चा
ची
चे
च्या | बालकाचा
बालकाची
बालकाचे
बालकाच्या | चा
ची
चे
च्या | बालकांचा
बालकांची
बालकांचे
बालकांच्या |
| सप्तमी | त
ई
आ | बालकात | त
ई
आ | बालकांत |
| संबोधन (हाक मारणे) | - | बालका | नो | बालकांनो |
३. शब्दयोगी अव्यये : वाक्यात जे शब्द नेहमी अन्य शब्दांना जोडूनच येतात आणि ते जोडल्यामुळे त्या त्या शब्दाचा वाक्यातील अन्य शब्दांशी संबंध जोडला जातो, अशा शब्दांना ‘शब्दयोगी अव्यये’ म्हणतात.याचे एक उदाहरण पुढे सविस्तर दिले आहे.
‘आनंद खुर्चीवर बसला. त्याने सहज खिडकीबाहेर पाहिले. समोरच्या घरात त्याचा मित्रही अभ्यासाला बसत होता. मित्राचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि दोघे एकमेकांकडे पाहून हसले. गेल्या काही दिवसांपासून परीक्षेमुळे त्यांना एकत्र खेळायला मिळाले नव्हते.’ या वाक्यांमध्ये ‘वर’, ‘बाहेर’, ‘ही’, ‘कडे’, ‘पासून’ आणि ‘मुळे’ हे शब्द अन्य शब्दांना जोडून आले आहेत. त्याचबरोबर या शब्दांमुळे ते ज्या शब्दांना जोडून आले आहेत, त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंधही जोडला जात आहे, उदा. ‘वरील वाक्यांमध्ये ‘वर’ हा शब्द ‘खुर्ची’ या शब्दाला जोडून आला आहे, तसेच हा शब्द ‘खुर्ची’ आणि ‘बसला’ या शब्दांचा संबंध जोडण्याचे कार्य करतो.’ अशा शब्दांना ‘शब्दयोगी अव्यये’ असे म्हणतात. मराठी भाषेत अनेक ‘शब्दयोगी अव्यये’ आहेत. त्यांपैकी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
खाली, मधून, मागे, पुढे, समोर, नंतर, साठी, पूर्वी, पर्यंत, पेक्षा, सुद्धा इत्यादी.
४. पुल्लिंगी (पुरुषवाचक) शब्दांची सामान्यरूपे
४ अ. अ-कारांत (शेवटच्या अक्षरात ‘अ’ हा स्वर मिसळलेला शब्द) पुल्लिंगी (पुरुषवाचक) शब्दाचे सामान्यरूप आ-कारांत होणे : ‘अंक’ हा अ-कारांत शब्द आहे. त्याच्या ‘क’ या शेवटच्या अक्षरात ‘क् + अ = क’ याप्रमाणे ‘अ’ हा स्वर मिसळलेला आहे. त्याचबरोबर हा शब्द पुल्लिंगीही (पुरुषवाचकही) आहे; कारण आपण ‘तो अंक’, असे म्हणतो. या शब्दाला ‘स’ हा विभक्तीचा प्रत्यय लागल्यावर हा शब्द ‘अंकास’ असा होतो, म्हणजे ‘अंक’चे ‘अंका’ असे सामान्यरूप होते. या रूपात ‘क’ या अक्षराचा ‘क् + आ = का’ याप्रमाणे ‘आ’कार झाला आहे. अशा प्रकारे सामान्यरूप होतांना ‘आ’कारयुक्त होणारे आणखी काही पुल्लिंगी शब्द पुढे दिले आहेत.
जप - जपाला, प्रदेश - प्रदेशाशी, आकार - आकारास, अभिषेक - अभिषेकासाठी, ढीग - ढिगाखाली इत्यादी.
४ आ. व्यक्तींची अ-कारांत पुल्लिंगी नावे आ-कारांत उच्चारल्यास उच्चारतांना सोपी आणि ऐकतांना चांगली वाटत असतील, तर आ-कारांतच लिहावीत ! :‘दशरथाचा पुत्र’ यामध्ये ‘दशरथ’ या अ-कारांत पुल्लिंगी नावाचे ‘दशरथा’ असे सामान्यरूप झाले आहे. ते उच्चारायला सोपे आहे आणि ऐकायलाही चांगले वाटते. अशा अ-कारांत पुल्लिंगी नावांची सामान्यरूपे आ-कारांत लिहावीत. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
राम - रामाला, गोविंद - गोविंदाची, वसंत - वसंतास, अर्जुन - अर्जुनाने, भरत - भरतासाठी इत्यादी.
काही नावांची मात्र या प्रकारे सामान्यरूपे होत नाहीत. ‘नितीन’ या नावाचे सामान्यरूप ‘नितिनासमोर’ असे होत नाही. येथे ‘नितीनसमोर’ असेच म्हणावे लागते. अशी काही नावे पुढे दिली आहेत.
सचिन - सचिनला, राहुल - राहुलपेक्षा, रोहित - रोहितमुळे, शेखर - शेखरनंतर, अमित - अमितपर्यंत इत्यादी.
४ इ. आ-कारांत पुल्लिंगी शब्दाचे सामान्यरूप ‘या-कारांत’ होणे : ‘आकडा’ हा आ-कारांत शब्द आहे, म्हणजे त्याच्या शेवटच्या अक्षरामध्ये ‘ड् + आ = डा’ याप्रमाणे ‘आ’ स्वर मिसळला आहे. त्याचबरोबर हा पुल्लिंगी शब्दही आहे.या शब्दाचे सामान्यरूप ‘आकड्याला’ असे होते. यात ‘डा’ या अक्षरात ‘ड्या’ असा पालट होतो. अशा प्रकारे सामान्यरूप होतांना ‘या-कारांत’ होणारे काही पुल्लिंगी शब्द पुढे दिले आहेत.
उंबरठा - उंबरठ्यावर, ओटा - ओट्याचा, (पाठीचा) कणा - कण्याचे, डोळा - डोळ्याला, दिवा - दिव्याने इत्यादी.
४ ई. काही आ-कारांत पुल्लिंगी शब्दांची सामान्यरूपे होतांना मात्र त्या शब्दांच्या मूळ रूपांत कोणताही पालट होत नसणे : असे शब्द पुढीलप्रमाणे आहेत.
दादा - दादाशी, काका - काकास, अण्णा - अण्णाला, अप्पा - अप्पाहून, मामा - मामाचा इत्यादी.
४ उ. इ-कारांत आणि उ-कारांत तत्सम (संस्कृतमधून जशाच्या तशा आलेल्या) पुल्लिंगी शब्दांची सामान्यरूपे होतांना त्यांचे ‘इ’कार अन् ‘उ’कार दीर्घ होणे : ‘मारुति’ हा तत्सम (संस्कृतमधून जसाच्या तसा आलेला) शब्द आहे. यातील शेवटचे अक्षर ‘ति’ हे र्हस्व ‘इ’कार मिसळलेले आहे. या शब्दाचे ‘मारुतीत’ हे सामान्यरूप होतांना मूळ शब्दात र्हस्व असलेला ‘ति’ दीर्घ ई-कारांत, म्हणजे ‘ती’ असा होतो. अशीच प्रक्रिया उ-कारांत तत्सम शब्दांच्या संदर्भातही घडते. अशा प्रकारचे पालट होणारे काही शब्द पुढे दिले आहेत.
गणपति - गणपतीने, वाल्मीकि - वाल्मीकींचे, मरीचि (एका ऋषींचे नाव) - मरीचींना, गुरु - गुरूंस, श्रीविष्णु - श्रीविष्णूची, भृगु (एका ऋषींचे नाव) - भृगूंचा इत्यादी.
४ ऊ. ई-कारांत (शेवटच्या अक्षरात ‘ई’ मिसळलेल्या) पुल्लिंगी शब्दाचे सामान्यरूप ‘या-कारांत’ होते, उदा. योगी - योग्यांचे, मणी - मण्याला, राजकारणी - राजकारण्याने, प्राणी - प्राण्याचा, धोबी - धोब्याकडून इत्यादी.
४ ए. काही ई-कारांत पुल्लिंगी शब्दांचे सामान्यरूप होतांना मात्र मूळ शब्दामध्ये कोणताही पालट होत नसणे : या नियमाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
कालावधी - कालावधीने, गुरुजी - गुरुजींना, पती - पतीचे, विधी - विधीत, अतिथी - अतिथीला इत्यादी.
४ ऐ. ऊ-कारांत पुल्लिंगी शब्दाचे सामान्यरूप होतांना शब्दामध्ये कोणताही पालट होत नाही, उदा. खाऊ - खाऊत, राजू - राजूने, चेंडू - चेंडूला, बिंदू - बिंदूत, बंधू - बंधूसाठी इत्यादी.
४ ओ. काही ऊ-कारांत पुल्लिंगी नामांची सामान्यरूपे मात्र ‘वा-कारांत’ होत असणे : ‘भाऊ’ हे ऊ-कारांत पुल्लिंगी नामआहे. ‘भावाचा’ या शब्दातील ‘भावा’ हे त्याचे सामान्यरूप आहे. यात ‘भाऊ’ शब्दातील ‘ऊ’ अक्षराच्या जागी ‘वा’कार आला आहे. या पद्धतीने सामान्यरूप होणारी उदाहरणे पुढे दिली आहेत.
विंचू - विंचवात, नातू - नातवास इत्यादी.
४ औ. पुल्लिंगी शब्दाचे शेवटचे अक्षर ‘सा’ असल्यास सामान्यरूप होतांना होणारे पालट : एकवचनी पुल्लिंगी शब्दाचे शेवटचे अक्षर ‘सा’ असल्यास सामान्यरूप होतांना त्याचे ‘शा’ होते. ‘श्या’ होत नाही. हा पुल्लिंगी शब्द अनेकवचनी झाल्यावर त्याचे शेवटचे अक्षर ‘से’ होते आणि सामान्यरूप होतांना ‘से’चे ‘शां’ होते. ‘श्यां’ होत नाही. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
| अनु. | शब्द | एकवचन | अनेकवचन |
| १. | घसा | घशाला | घशांना |
| २. | ससा | सशाची | सशांची |
| ३. | मासा | माशासाठी | माशांसाठी |
| ४. | ठोसा | ठोशाने | ठोशांनी |
४ अं. पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी ‘जा’ हे अक्षर असल्यास सामान्यरूप होतांना होणारे पालट : एकवचनी पुल्लिंगी शब्दाचे शेवटचे अक्षर ‘जा’ असल्यास सामान्यरूप होतांना ते तसेच रहाते. त्याचा ‘ज्या’ होत नाही. हा पुल्लिंगी शब्द अनेकवचनी झाल्यावर त्याचे शेवटचे अक्षर ‘जे’ होते आणि सामान्यरूप होतांना ‘जे’चे ‘जां’ होते. ‘ज्यां’ होत नाही. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
| अनु. | शब्द | एकवचन | अनेकवचन |
| १. | राजा | राजासाठी | राजांसाठी |
| २. | बाजा (वाद्य) | बाजावर | बाजांवर |
| ३. | दरवाजा | दरवाजाबाहेर | दरवाजांबाहेर |
| ४. | मोजा | मोजात | मोजांत |
५. स्त्रीलिंगी (स्त्रीवाचक) शब्दांची सामान्यरूपे
५ अ. अ-कारांत स्त्रीलिंगी शब्द एकवचनी असेल, तर त्याचे सामान्यरूप ए-कारांत होते आणि अनेकवचनी असेल, तर त्याचे सामान्यरूप आ-कारांत होणे : ‘अटक’ हा अ-कारांत स्त्रीलिंगी (स्त्रीवाचक) शब्द आहे. आपण ‘ती अटक’, असे म्हणतो. ‘अटक’ हा शब्द एकवचनी आहे. या शब्दाचे ‘अटकेपूर्वी’ असे सामान्यरूप होतांना ‘क’ या ‘अ’कार असलेल्या अक्षराचे ‘के’ हे ‘ए’कार असलेले रूप होते.
‘अटक’ या शब्दाचे अनेकवचन ‘अटका’ असे ‘आ’कार असलेले आहे. त्याचे सामान्यरूप ‘अटकांपूर्वी’ असे ‘आ’कारांत होते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
| अनु. | शब्द | एकवचन | अनेकवचन |
| १. | रांग | रांगेत | रांगांत |
| २. | काच | काचेपुढे | काचांपुढे |
| ३. | चिंच | चिंचेवर | चिंचांवर |
| ४. | दाढ | दाढेपर्यंत | दाढांपर्यंत |
| ५. | वीट | विटेला | विटांना |
५ आ. काही अ-कारांत स्त्रीलिंगी शब्दांचे सामान्यरूप ई-कारांत होते, उदा. गुंतवणूक - गुंतवणुकीत, चूक - चुकीनंतर, बैठक - बैठकीपूर्वी, नेमणूक - नेमणुकीपासून, ओळख - ओळखीचा इत्यादी.
५ इ. आ-कारांत स्त्रीलिंगी शब्दांचे सामान्यरूप ए-कारांत होणे : याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
राधा - राधेसमोर, गंगा - गंगेत, शाखा - शाखेबाहेर, त्वचा - त्वचेवर, इच्छा - इच्छेपुढे, पूजा - पूजेमध्ये इत्यादी.
५ ई. ई-कारांत स्त्रीलिंगी शब्द एकवचनी असल्यास त्याचे सामान्यरूप ई-कारांतच रहाणे आणि अनेकवचनी असल्यास त्याचे सामान्यरूप ई-कारांत किंवा या-कारांत होणे : ‘स्त्री’ हे ई-कारांत स्त्रीलिंगी नाम आहे. ते ‘एक स्त्री’ असे एकवचनी असेल, तर त्याच्या ‘स्त्रीचे’ या सामान्यरूपात ‘स्त्री’ या जोडाक्षरात कोणताही पालट होत नाही. ते उच्चारानुसार दीर्घच रहाते. ‘स्त्री’ या शब्दाचे अनेकवचन ‘स्त्रिया’ असे होते. या अनेकवचनाचे सामान्यरूप ‘या-कारांत’ होते, उदा. स्त्रियांनी.
भाषेमध्ये अक्षराचा उच्चार फार महत्त्वाचा असतो. उच्चारानुसार शब्दाचे रूप पालटते. ‘स्त्री’ हा शब्द दीर्घ उच्चारला जातो, तर ‘स्त्रिया’ या शब्दातील ‘स्त्रि’ र्हस्व उच्चारला जातो. या उच्चारांनुसार हे शब्द लिहिले जातात.
ई-कारांत स्त्रीलिंगी शब्दांच्या सामान्यरूपांची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
| अनु. | शब्द | एकवचन | अनेकवचन |
| १. | कीर्ती | कीर्तीस | - |
| २. | गृहिणी | गृहिणीने | गृहिणींनी |
| ३. | ठिणगी | ठिणगीला | ठिणग्यांना |
| ४. | काठी | काठीला | काठ्यांना |
| ५. | उडी | उडीत | उड्यांत |
| ६. | बी | बीचे | बियांचे |
५ उ. ऊ-कारांत स्त्रीलिंगी शब्दाचे सामान्यरूप होत नाही, उदा. वेणू - वेणूमुळे, वधू - वधूसाठी, वास्तू - वास्तूला, वस्तू - वस्तूवर, काकू - काकूस इत्यादी.
५ ऊ. ऊ-कारांत स्त्रीलिंगी शब्दाचे अनेकवचन आणि त्याचे सामान्यरूप क्वचित् प्रसंगी वा-कारांत होते, उदा. सासू - सासवा - सासवांसंबंधी, जाऊ (पतीची भावजय) - जावा - जावांपैकी इत्यादी.
५ ए. ओ-कारांत स्त्रीलिंगी शब्दाचे सामान्यरूप एकवचनात होत नाही; परंतु अनेकवचनात आ-कारांत होते. याचे उदाहरण पुढे दिले आहे.
| अनु. | वचन | शब्द | सामान्यरूप |
| १. | एकवचन | बायको | बायकोविषयी |
| २. | अनेकवचन | बायका | बायकांविषयी |
५ ऐ. पहिल्या अक्षरावर अनुस्वार आणि दुसरे अक्षर ‘म’ असलेल्या तीन अक्षरी स्त्रीलिंगी शब्दाचे सामान्यरूप : तीन अक्षरी स्त्रीलिंगी शब्दाच्या पहिल्या अक्षरावर अनुस्वार असेल आणि दुसरे अक्षर ‘म’ असेल, तर सामान्यरूप होतांना पहिल्या अक्षरावरील अनुस्वार जातो, उदा. गंमत - गमतीने, अंमल - अमलात, किंमत - किमतीला इत्यादी.
अपवाद : संमत - संमतीने
६. नपुंसकलिंगी शब्दांचे सामान्यरूप
अ. अ-कारांत नपुंसकलिंगी शब्दाचे सामान्यरूप आ-कारांत होणे : ‘लाकूड’ हा अ-कारांत नपुंसकलिंगी शब्द आहे. आपण ‘ते लाकूड’ असे म्हणतो. त्याचे ‘लाकडाला’ हे सामान्यरूप होतांना त्यातील ‘ड’ या अक्षराचा ‘डा’ होतो, म्हणजे ते रूप आ-कारयुक्त होते. अशा प्रकारे रूप होणारे काही शब्द पुढे दिले आहेत.
गणित - गणिताचा, कौतुक - कौतुकाने, कीर्तन - कीर्तनात, अंतर - अंतरावर, कूळ - कुळातील, तूप - तुपाची इत्यादी.
आ. ई-कारांत नपुंसकलिंगी शब्दाचे सामान्यरूप या-कारांत होते, उदा. पाणी - पाण्याची, दही - दह्याचे, लोणी - लोण्याचा इत्यादी.
इ. ऊ-कारांत नपुंसकलिंगी शब्दाचे सामान्यरूप आ-कारांत होते, उदा. लिंबू - लिंबाचा, वासरू - वासराने, पिल्लू - पिल्लासमोर इत्यादी.
ई. काही वेळा ऊ-कारांत नपुंसकलिंगी शब्दाचे सामान्यरूप वा-कारांत होते, उदा. कुंकू - कुंकवाचा, गळू - गळवाला, अळू - अळवावरचे इत्यादी.
उ. ए-कारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप या-कारांत होते, उदा. डोके - डोक्याभोवती, वांगे - वांग्याचे, ओझे - ओझ्याचा, भांडे - भांड्याला, मडके - मडक्यात इत्यादी.
७. ऊ-कारांत ‘विशेषनामा’चे सामान्यरूप होत नसणे : ज्या नामामुळे मनुष्य, प्राणी, वनस्पती, पदार्थ इत्यादींपैकी एखाद्या वर्गाचा नव्हे, तर एखाद्या वर्गातील विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, त्यास ‘विशेषनाम’ असे म्हणतात. विशेषनामांपैकी ऊ-कारांत नामांचे सामान्यरूप होत नाही, उदा. गणू - गणूने, विजू - विजूपेक्षा, मनू - मनूला, तेजू - तेजूकडून, भालू - भालूसाठी इत्यादी.
८. ए-कारांत आडनावाचे सामान्यरूप या-कारांत होणे : काही व्यक्तींची आडनावे ए-कारांत असतात, उदा. ‘वझे, माने, मुळ्ये, वाघमारे इत्यादी.’ या आडनावांची सामान्यरूपे अनुक्रमे ‘वझ्यांचे, मान्यांना, मुळ्यांनी, वाघमार्यांस’ अशी या-कारांत होतात.
९. धातूला ‘ऊ’ किंवा ‘ऊन’ हे प्रत्यय लागतांना त्याच्या रूपात होणारा पालट !
९ अ. क्रियापदातील मूळ शब्दाला ‘धातू’ म्हणतात ! : ‘तो समरसून गातो’, या वाक्यात ‘गातो’ हे क्रियापद आहे. या क्रियापदातील ‘तो’ हा प्रत्यय काढला, तर केवळ ‘गा’ हा शब्द उरतो. या प्रत्यय नसलेल्या ‘गा’ शब्दाला ‘धातू’ असे म्हणतात. मराठी भाषेत ‘हस’, ‘खा’, ‘बुड’, ‘मार’, ‘हो’ असे अनेक धातू आहेत.
९ आ. धातूला ‘ऊ’ किंवा ‘ऊन’ प्रत्यय लागतांना धातूच्या शेवटी ‘व’ हे अक्षर असेल, तर त्या ‘व’चे ‘वू’ किंवा ‘वून’ असे रूप होणे : ‘धाव’ हा धातू आहे. त्याच्या शेवटी ‘व’ हे अक्षर आहे. त्यामुळे या धातूला ‘ऊ’ हा प्रत्यय लागला, तर धातूचे रूप ‘धावू’ असे होते. याच धातूला ‘ऊन’ हा प्रत्यय लागला, तर धातूचे रूप ‘धावून’ असे होते. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
| अनु. | धातू | ‘ऊ’ प्रत्यय लागणे | ‘ऊन’ प्रत्यय लागणे |
| १. | पाठव | पाठवू | पाठवून |
| २. | जेव | जेवू | जेवून |
| ३. | आठव | आठवू | आठवून |
| ४. | कळव | कळवू | कळवून |
| ५. | ठेव | ठेवू | ठेवून |
९ इ. धातूला ‘ऊ’ किंवा ‘ऊन’ प्रत्यय लागतांना त्याच्या शेवटी ‘व’ हे अक्षर नसेल, तर त्या धातूची ‘ऊ’ किंवा ‘ऊन’ असलेली अथवा मिसळलेली रूपे सिद्ध होणे : ‘जा’ हा धातू आहे. त्याच्यापुढे ‘व’ हे अक्षर लागलेले नाही. त्यामुळे त्याचे ‘ऊ’ किंवा ‘ऊन’ प्रत्यय लागून सामान्यरूप होतांना ‘जाऊ’ किंवा ‘जाऊन’ अशी रूपे सिद्ध होतात. ‘जावू’ किंवा ‘जावून’ अशी रूपे सिद्ध होत नाहीत. या नियमाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
| अनु. | धातू | ‘ऊ’ प्रत्यय लागणे | ‘ऊन’ प्रत्यय लागणे |
| १. | गा | गाऊ | गाऊन |
| २. | धू | धुऊ | धुऊन |
| ३. | पी | पिऊ | पिऊन |
| ४. | खा | खाऊ | खाऊन |
| ५. | ये | येऊ | येऊन |
१०. इंग्रजी शब्दाचे सामान्यरूप लिहितांना मूळ शब्दात पालट करू नये ! : ‘पेन’ या इंग्रजी शब्दाचे सामान्यरूप ‘पेनने’ असे लिहावे. ‘पेनाने’ असे लिहू नये. इंग्रजी शब्दाच्या सामान्यरूपात मूळ इंग्रजी शब्द आहे तसाच ठेवावा. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
बस - बसने, बाइक - बाइकवरून, कूलर - कूलरचे, फोन - फोनची, फिल्टर - फिल्टरपेक्षा इत्यादी.’
- सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१०.२०२१)