६. समास : शब्दांची बचत करणारी व्यवस्था !

१. शब्दांची बचत करण्याच्या मनुष्यस्वभावाला पूरक अशी व्याकरणातील व्यवस्था म्हणजे ‘समास’ ! : मनुष्याचा बोलतांना सोपे आणि सहजपणे उच्चारता येतील, असे शब्द वापरण्याकडे कल असतो. मनातील विचार व्यक्त करण्यासाठी जेवढे अल्प शब्द वापरता येतील, तेवढे तो वापरतो. एरव्ही अन्य विषयांत कदाचित् काटकसर न करणार्‍या व्यक्तीही बोलतांना किंवा लिहितांना मात्र शब्दांची काटकसर अवश्य करतांना दिसतात. या प्रयत्नात एखादा विचार व्यक्त करतांना काही शब्द गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवले जातात आणि कालांतराने ते शब्द भाषेशी एकजीव होऊन जातात. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. कांदेपोहे : ‘कांदे घालून सिद्ध केलेले पोहे’, एवढे सगळे म्हणण्याऐवजी ‘कांदेपोहे’ असे म्हटले जाते. यात ‘घालून, सिद्ध आणि केलेले’ हे तीन शब्द गाळले जातात.

आ. देवघर : ‘देवासाठी घर’ या शब्दांतील ‘साठी’ हा शब्द वगळून ‘देवघर’ असा जोडशब्द सिद्ध केला जातो.

इ. पोळपाट : ‘पोळी लाटण्यासाठी पाट’ यांतील ‘लाटण्यासाठी’ हा शब्द काढून ‘पोळपाट’ हा सुटसुटीत शब्द बनवला जातो.  

ई. सप्तर्षी : ‘सप्त (सात) ऋषींचा समूह’ यांतील ‘समूह’ हा शब्द गाळून ‘सप्तर्षी’ हा एक शब्द वापरण्यात येतो.

        वरीलप्रमाणे ‘बोलतांना किंवा लिहितांना अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे दोन शब्द एकत्र करून त्यांचा जोडशब्द सिद्ध करणे आणि तो सिद्ध करतांना त्यातील दोन्ही शब्दांचा परस्परसंबंध दाखवणारे अन्य सर्व शब्द गाळून टाकणे, या प्रक्रियेला ‘समास’ असे म्हणतात.’ अशा प्रकारे सिद्ध झालेल्या जोडशब्दाला ‘सामासिक शब्द’ असे म्हणतात.

२. सामासिक शब्दाचा ‘विग्रह’ : ‘सामासिक शब्दात कोणते दोन शब्द एकत्र आले आहेत आणि त्यांच्या एकत्र येण्यामुळे त्या जोडशब्दाचा अर्थ काय होतो ?’, हे सांगण्यासाठी आपण त्या शब्दाची फोड करतो; उदा. ‘गावजेवण’ या सामासिक शब्दात ‘गाव’ आणि ‘जेवण’ हे दोन शब्द एकत्र आले आहेत. या पूर्ण शब्दाची फोड ‘गावाला दिलेले जेवण’, अशी होते. या फोड करण्याला ‘सामासिक शब्दाचा ‘विग्रह’ करणे’, असे म्हणतात.

३. समासाचे प्रकार : ‘समासात एकत्र आलेल्या दोन शब्दांपैकी कोणत्या शब्दाला त्या सामासिक शब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने अधिक महत्त्व आहे ? कोणत्या शब्दावर त्या जोडशब्दाचा अर्थ अवलंबून आहे ?’, यावरून त्या समासाचा प्रकार निश्चित होतो. हे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

अ. सामासिक शब्दातील पहिला शब्द महत्त्वाचा असणे

आ. सामासिक शब्दातील दुसरा शब्द महत्त्वाचा असणे

इ. सामासिक शब्दातील दोन्ही शब्द महत्त्वाचे असणे

ई. सामासिक शब्दातील दोन्ही शब्द महत्त्वाचे नसणे आणि त्या दोन शब्दांवरून तिसर्‍याच अर्थाचा बोध होणे

४. समासाच्या प्रकारांची नावे संस्कृत व्याकरणातील असून त्या नावांचे अर्थ थोडे क्लिष्ट आणि आपल्या दैनंदिन वापराच्या दृष्टीने आवश्यक नसल्यामुळे या लेखात ते अर्थ दिलेले नसणे : या लेखामध्ये समासाचे प्रकार देतांना त्यांची जी नावे दिली आहेत, ती केवळ माहितीसाठी आहेत. त्या नावांना संस्कृत व्याकरणात विशिष्ट अर्थ आहेत; परंतु काही वाचकांना तो भाग थोडा क्लिष्ट वाटण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे, दैनंदिन लेखन-व्यवहारात सामासिक शब्द लिहितांना समासांच्या नावांचा आणि त्या नावांच्या अर्थाचा आपल्याला कुठेही उल्लेख करावा लागत नाही. त्यामुळे या नावांचे अर्थ लेखामध्ये देण्यात आलेले नाहीत. भविष्यात व्याकरणाचा अधिक सखोल अभ्यास मांडतांना हा सर्व भाग देण्यात येईल.

        आता समासांचे प्रकार आणि त्यांची उदाहरणे यांविषयीची माहिती पाहू.

५. सामासिक शब्दातील पहिला शब्द पूर्ण जोडशब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा असेल, तर त्या समासास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणत असणे : ‘आजन्म’ या सामासिक शब्दात ‘आ’ आणि ‘जन्म’ असे दोन शब्द एकत्र आले आहेत. यांतील ‘आ’ या पहिल्या शब्दामुळे ‘आजन्म’ या शब्दाचा ‘जन्मभर’ हा अर्थ स्पष्ट होतो. केवळ ‘जन्म’ म्हटले, तर हा अर्थ लक्षात येत नाही. त्यामुळे या जोडशब्दात अर्थाच्या दृष्टीने ‘आ’ हा पहिला शब्द अधिक महत्त्वाचा आहे. अशा समासास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात. या समासाची काही उदाहरणे आणि ती सुलभतेने लक्षात यावीत, यासाठी त्यांचे विग्रह पुढे दिले आहेत.

अनु.

सामासिक शब्द

विग्रह (अर्थ/शब्दाची फोड)

१.

आकंठ

कंठाशी येईपर्यंत

२.

यथाबुद्धी

बुद्धीप्रमाणे

३.

यथाशक्ती

शक्तीनुसार

४.

प्रतिवर्षी

प्रत्येक वर्षी

५.

दिवसेंदिवस

जसजसे दिवस पुढे सरकत आहेत, तसतसे (उत्तरोत्तर)


६. सामासिक शब्दातील दुसरा शब्द पूर्ण जोडशब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा असेल, तर त्या समासास ‘तत्पुरुष समास’ असे म्हणत असणे :
‘राजपुत्र’ या सामासिक शब्दामध्ये ‘राज’ आणि ‘पुत्र’ असे दोन शब्द आहेत. त्यांपैकी ‘पुत्र’ हा दुसर्‍या क्रमांकाचा शब्द पूर्ण जोडशब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे; कारण निवळ ‘राज’ म्हटले, तर त्याचा अर्थ ‘राजा’ असा होतो. ‘राजपुत्र’ या शब्दाद्वारे आपल्याला राजाविषयी बोलावयाचे नसते, तर राजाच्या पुत्राविषयी बोलावयाचे असते. अशा प्रकारे ज्या सामासिक शब्दात त्याच्या अर्थाच्या दृष्टीने दुसरा शब्द अधिक महत्त्वाचा असतो, त्या प्रकारच्या समासास ‘तत्पुरुष समास’, असे म्हणतात. या समासाची काही उदाहरणे आणि ती सुलभतेने लक्षात यावीत, यासाठी त्यांचे विग्रह पुढे दिले आहेत. 

अनु.

सामासिक शब्द

विग्रह (अर्थ/शब्दाची फोड)

१.

अकुशल

नाही कुशल तो

२.

महापुरुष

महान असा पुरुष

३.

आडनावबंधू

आडनावापुरता बंधू

४.

रामभक्त

रामाचा भक्त

५.

बालमित्र

बालपणापासूनचा मित्र

७. ‘कृतज्ञताभाव’ हा शब्द मोठा होत असला, तरी जोडून लिहिण्याचे कारण : या शब्दात ‘कृतज्ञता’ आणि ‘भाव’ असे दोन शब्द आहेत. या पूर्ण शब्दाची फोड ‘कृतज्ञतेचा भाव’ अशी होते. यांतील ‘भाव’ हा शब्द पूर्ण जोडशब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे; कारण ‘कृतज्ञताभाव’ या शब्दाद्वारे आपण केवळ कृतज्ञतेविषयी बोलत नाही, तर कृतज्ञतेच्या भावाविषयी बोलतो, उदा. ‘नंदनमध्ये कृतज्ञता आहे’, हे वाक्य अर्थाच्या दृष्टीने अपूर्ण आणि अयोग्य आहे. ‘नंदनमध्ये कशाविषयी किंवा कुणाविषयी कृतज्ञता आहे ?’, हे या वाक्यावरून कळत नाही. त्या जागी ‘नंदनमध्ये कृतज्ञताभाव आहे’, असे म्हटल्यास वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. पूर्ण जोडशब्दातील दुसरा शब्द महत्त्वाचा असल्यामुळे हा ‘तत्पुरुष समास’ आहे. त्यामुळे हा शब्द थोडा लांबलचक होत असला, तरी ‘सामासिक शब्द’ या नात्याने जोडून लिहावा. अशा प्रकारची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

         शरणागतभाव, बालकभाव, वात्सल्यभाव, सेवकभाव, भोळाभाव इत्यादी.

८. सामासिक शब्दातील दोन्ही शब्द पूर्ण जोडशब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने समान महत्त्वाचे असतील, तर त्या समासास ‘द्वंद्व समास’ असे म्हणत असणे : ‘ऋद्धिसिद्धि’ या सामासिक शब्दात ‘ऋद्धि’ आणि ‘सिद्धि’ असे दोन शब्द आहेत. केवळ ‘ऋद्धि’ म्हटले किंवा केवळ ‘सिद्धि’ म्हटले, तर ‘ऋद्धि आणि सिद्धि’ या पूर्ण अर्थाचा बोध आपल्याला होऊ शकत नाही. याचा अर्थ, ‘हे दोन्ही शब्द पूर्ण जोडशब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने समान महत्त्वाचे आहेत.’ अशा प्रकारच्या समासाला ‘द्वंद्व समास’ असे म्हणतात. या सामासिक शब्दाची फोड करतांना ‘आणि, अथवा, किंवा, अन्’ आदी शब्द वापरून जोडशब्दातील दोन शब्द परस्परांशी जोडले जातात. या समासाची काही उदाहरणे आणि ती सुलभतेने लक्षात यावीत, यासाठी त्यांचे विग्रह पुढे दिले आहेत.

अनु.

सामासिक शब्द

विग्रह (अर्थ/शब्दाची फोड)

१.

हरिहर

हरि (श्रीविष्णु) आणि हर (शंकर)

२.

कवचकुंडले

कवच आणि कुंडले

३.

एकतीस

एक आणि तीस

४.

सत्यासत्य

सत्य किंवा असत्य

५.

धर्माधर्म

धर्म किंवा अधर्म


८ अ. या नियमाला अपवाद असणारे काही शब्द

८ अ १. राम-लक्ष्मण : हा शब्द प्रचलित मराठी व्याकरणामध्ये ‘द्वंद्व समास’ या नात्याने ‘रामलक्ष्मण’ असा एकत्र लिहिला जातो; परंतु सनातनच्या व्याकरणानुसार आपण तो ‘राम-लक्ष्मण’ असा मध्ये संयोगचिन्ह (-) देऊन लिहितो. याचे कारण असे की, वाचतांना ‘रामलक्ष्मण’ या शब्दापेक्षा ‘राम-लक्ष्मण’ या शब्दावर निवळ दृष्टी टाकली, तरी त्याचा अर्थ झटकन लक्षात येतो. सध्याच्या गतीमान जगामध्ये वाचकाला शब्दावर दृष्टी टाकताच त्याचा अर्थ समजणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे काळानुसार आपण हा पालट केला आहे. पुढे हिंदु राष्ट्रात मात्र ‘रामलक्ष्मण’ हा शब्द आपण मूळ संस्कृत व्याकरणानुसार जोडूनच लिहिणार आहोत. याप्रमाणे अपवाद केलेले आणखी काही शब्द पुढीलप्रमाणे आहेत.

        पाप-पुण्य, आई-वडील, मामा-मामी, ने-आण, दोन-तीन, खरे-खोटे इत्यादी.

८ आ. ‘द्वंद्व समासा’चा स्त्रीदेवता आणि पुरुषदेव यांच्याशी संबंधित नियम : स्त्रीदेवता आणि पुरुषदेव यांची नावे एकत्र लिहितांना ती जोडूनच लिहावीत. त्यांच्यामध्ये संयोगचिन्ह (-) देऊ नये. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनु.

सामासिक शब्द

विग्रह (अर्थ/शब्दाची फोड)

१.

लक्ष्मीनृसिंह

लक्ष्मी आणि नृसिंह

२.

शिवपार्वती

शिव आणि पार्वती

३.

उमाशंकर

उमा (पार्वती) आणि शंकर

४.

सीताराम

सीता आणि राम

५.

छायामार्तंड

छाया (सूर्यदेवाची पत्नी) आणि मार्तंड (सूर्यदेव)

८ आ १. एका गाभार्‍यात एकत्र मूर्ती नसलेल्या देवदेवतांची नावे या नियमाला अपवाद असणे : ‘विठ्ठल-रुक्मिणी’, ‘लक्ष्मी-व्यंकटेश’ यांसारख्या देवदेवतांच्या मूर्ती काही पौराणिक कारणांमुळे त्यांच्या प्रमुख मंदिरांत एका गाभार्‍यात स्थित नाहीत. अशा देवदेवतांची नावे लिहितांना मध्ये संयोगचिन्ह (-) द्यावे.

 ८ इ. समाहार द्वंद्व : यातील सामासिक शब्दाची फोड केल्यास तिच्यातून मूळ जोडशब्दात असलेल्या शब्दांशिवाय त्या शब्दांच्या अर्थाला शोभतील, अशा इतर शब्दांचाही बोध होतो, उदा. ‘चहापाणी’ या शब्दाची फोड केवळ ‘चहा आणि पाणी’, अशी होत नाही, तर ती ‘चहा, पाणी आणि अल्पाहाराचे इतर पदार्थ’, अशी होते; कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला, ‘‘आमच्याकडे चहापाण्याला या’’, असे म्हणतो, तेव्हा आपण तिला केवळ चहा आणि पाणी देत नाही, तर बिस्किटे, चिवडा, लाडू, कचोरी किंवा पोहे असे अल्पाहाराचे अन्य पदार्थही देतो. अशा प्रकारच्या समासाला ‘समाहार द्वंद्व’ असे म्हणतात. याची आणखी काही उदाहरणे आणि ती सुलभतेने समजण्यासाठी त्यांचे विग्रह पुढे दिले आहेत.

अनु.

सामासिक शब्द

विग्रह (अर्थ/शब्दाची फोड)

१.

हळदीकुंकू

हळद, कुंकू, अत्तर, फूल आणि त्यांसारख्या इतर वस्तू देण्याचा समारंभ

२.

मीठभाकरी

मीठ, भाकरी आणि इतर साधे अन्नपदार्थ

३.

भाजीपाला

भाज्या, पालेभाज्या, कोथिंबीर, आले, मिरच्या आणि त्यांसारख्या अन्य गोष्टी

४.

पालापाचोळा

पाला, पाचोळा, झाडांच्या काड्या, सुकलेली फुले-फळे आणि त्यांसारख्या अन्य गोष्टी

५.

घरदार

घर, दार, अंगण, तसेच घरातील विविध वस्तू


९.
सामासिक शब्दातील दोन्ही शब्द महत्त्वाचे नसतील आणि त्या दोन शब्दांवरून तिसर्‍याच अर्थाचा बोध होत असेल, तर त्यास ‘बहुव्रिही समास’ असे म्हणत असणे ! : ‘भालचंद्र’ या सामासिक शब्दामध्ये ‘भाल’ (मराठीमध्ये ‘भाळ’), म्हणजे कपाळ आणि ‘चंद्र’ हे दोन शब्द आहेत; परंतु हा जोडशब्द उच्चारतांना आपल्याला ‘भाळा’विषयी (कपाळाविषयी) बोलायचे नसते, तसेच ‘चंद्रा’विषयीही बोलायचे नसते, तर ‘ज्याच्या भाळावर चंद्र आहे, अशा शंकरा’विषयी आपण बोलत असतो. याचा अर्थ, ‘या शब्दामध्ये ‘भाल’ आणि ‘चंद्र’ या दोन्ही शब्दांना महत्त्व नसून या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून ‘शंकर’ या तिसर्‍याच अर्थाचा बोध होतो.’ अशा प्रकारच्या समासाला ‘बहुव्रिही समास’ असे म्हणतात. याची आणखी काही उदाहरणे आणि ती सुलभतेने कळावीत, यासाठी त्यांचे विग्रह पुढे दिले आहेत.

अनु.

सामासिक शब्द

विग्रह (अर्थ/शब्दाची फोड)

१.

पद्मनाभ

ज्याच्या नाभीतून कमळ उत्पन्न झाले आहे, असा तो (श्रीविष्णु)

२.

उमाकांत

उमेचा (पार्वतीचा) कांत (पती) असलेला असा तो (शंकर)

३.

गजमुख

गजाप्रमाणे आहे मुख ज्याचे असा तो (श्री गणपति)

४.

जितेंद्रिय

जित (जिंकली) आहेत इंद्रिये ज्याने असा तो (हनुमंत)

५.

निःस्वार्थी

निघून गेला आहे स्वार्थ ज्याच्यामधून असा तो


१०. सामासिक शब्द लिहिण्याची पद्धत :
आतापर्यंत आपण समासाच्या प्रकारांची अगदी अल्पशी ओळख करून घेतली. आता ‘सामासिक शब्द व्याकरणदृष्ट्या कसे लिहावेत ?’, हे जाणून घेऊ.

१० अ. लक्ष्मीपुत्र : या सामासिक शब्दात ‘लक्ष्मी’ आणि ‘पुत्र’ असे दोन शब्द आहेत. या शब्दांतील पहिला शब्द ‘लक्ष्मी’ हा मुळात तत्सम (संस्कृतमधून जसाच्या तसा मराठीत आलेला) आणि दीर्घ ई-कारांत आहे, म्हणजे या शब्दाच्या शेवटच्या ‘क्ष्मी’ या अक्षरामध्ये दीर्घ ‘ई’ अंतर्भूत आहे. असा शब्द सामासिक शब्दातील पहिला शब्द म्हणून लिहितांना त्याचे शेवटचे अक्षर मुळात जसे आहे, त्याप्रमाणे दीर्घच लिहावे.

१० अ १. नियम - सामासिक शब्दातील पहिला शब्द तत्सम आणि दीर्घ ई-कारांत किंवा ऊ-कारांत असेल, तर समास होतांना त्या पहिल्या शब्दाचे शेवटचे अक्षर दीर्घच लिहावे !

१० अ २. या नियमाची आणखी काही उदाहरणे आणि ती सुलभतेने कळण्यासाठी त्यांचे विग्रह पुढे दिले आहेत.

अनु.

सामासिक शब्द

विग्रह (अर्थ/शब्दाची फोड)

१.

पृथ्वीतल

पृथ्वीचा तल (पृष्ठभाग)

२.

गौरीहर

गौरी (पार्वती) आणि हर (शिव)

३.

वधूप्रवेश

वधूचा (विवाहानंतरचा सासरच्या घरातील पहिला) प्रवेश

४.

भूगोल

अ. भूचा गोल, म्हणजे पृथ्वीचा गोल

 

आ. भूच्या गोलाविषयी, म्हणजे पृथ्वीच्या गोलाविषयी माहिती देणारा विषय


१० आ. कवीराज
: या सामासिक शब्दात ‘कवी’ आणि ‘राज’ असे दोन शब्द आहेत. यांतील ‘कवी’ हा तत्सम शब्द आहे. संस्कृतमध्ये हा शब्द ‘कवि’ असा र्‍हस्वांत (ज्या शब्दाचे शेवटचे अक्षर र्‍हस्व असते, असा) लिहिला जातो; परंतु मराठीत आपण हा शब्द ‘कवी’ असा दीर्घांत (ज्या शब्दाचे शेवटचे अक्षर दीर्घ असते, असा) लिहितो. त्यामुळे ‘कवीराज’ असा सामासिक शब्द लिहितांना त्यातील ‘वी’ दीर्घ लिहावा.

१० आ १. नियम - सामासिक शब्दातील पहिला शब्द तत्सम (संस्कृतमधून जसाच्या तसा मराठीत आलेला) आणि र्‍हस्व इ-कारांत किंवा उ-कारांत असेल, तर समास होतांना त्यातील शेवटचे ई-कार किंवा ऊ-कार दीर्घ लिहावेत !

१० आ २. मराठी व्याकरण सुलभ होण्यासाठी या नियमात संस्कृत-मराठी भेद काढून टाकण्यात आला असणे : या नियमाच्या वापरामुळे सनातनचे व्याकरण प्रचलित मराठी व्याकरणापेक्षा वेगळे होते. प्रचलित मराठीत संस्कृत व्याकरणाप्रमाणे ‘कविराज’ असे लिहिले जाते आणि त्यातील ‘वि’ मूळ संस्कृतमध्ये र्‍हस्व असल्यामुळे र्‍हस्व लिहिला जातो; मात्र असे केल्यामुळे मराठीत सामासिक शब्द लिहितांना लिहिणार्‍याला प्रत्येक वेळी ‘त्यातील पहिला शब्द संस्कृत आहे कि मराठी ?’, याचा विचार करावा लागेल. त्याअनुषंगाने आधी ‘मराठीतील संस्कृत शब्द कोणते ?’, याचा अभ्यास करावा लागेल. ही गोष्ट बर्‍याच जणांना किचकट वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण सामासिक शब्दातील पहिला शब्द संस्कृत भाषेत र्‍हस्व असला, तरी मराठीच्या व्याकरणाप्रमाणे दीर्घ लिहिण्याचे निश्चित केले आहे.

१० आ ३. या नियमाची आणखी काही उदाहरणे आणि ती सुलभतेने कळण्यासाठी त्यांचे विग्रह पुढे दिले आहेत.

अनु.

सामासिक शब्द

विग्रह (अर्थ/शब्दाची फोड)

१.

सृष्टीचक्र

सृष्टीचे चक्र

२.

बुद्धीबळ

बुद्धीचे बळ 

३.

प्राणीसंग्रह

प्राण्यांचा संग्रह

४.

मृत्यूमुखी

मृत्यूच्या मुखात गेलेला असा तो

(‘असा तो’ हे लिहिण्यामागील शास्त्र 

अ. ‘असा तो’ हे लिहिल्यामुळे हा बहुव्रिही समास आहे, हे लक्षात येते.

आ. बहुव्रिही समासाचा विग्रह परंपरेने असा करण्याची रीत आहे.

इ. आजही सर्वत्र असे लिहिणे प्रचलित आहे.

ई. असे लिहिले नाही, तर समासाचा विग्रह करण्याच्या पद्धतीतील नियमबद्धता बिघडू शकते आणि लोक विग्रह स्वतःच्या मतानुसार एखादे वेळेस चुकीचाही करू शकतात.)

५.

लघूरूप

लघू (लहान) असे रूप


१० आ ४. या नियमाला अपवाद असणारे काही शब्द

१० आ ४ अ. मनुस्मृति : या सामासिक शब्दात ‘मनु’ आणि ‘स्मृति’ हे दोन शब्द आहेत. या पूर्ण शब्दाची फोड ‘मनु यांनी लिहिलेली स्मृति’, अशी होते. यातील ‘मनु’ या पहिल्या शब्दातील ‘नु’ हे अक्षर संस्कृत भाषेमध्ये र्‍हस्व आहे. मराठी व्याकरणाच्या एका नियमाप्रमाणे ते मराठीत ‘नू’ असे दीर्घ लिहावयास हवे; पण आपला एक नियम असाही आहे की, ‘मनु’ हे देवतास्वरूप असल्याने त्यांच्या चैतन्याचा लिहिणार्‍यास आणि वाचणार्‍यास लाभ व्हावा, यासाठी त्यातील ‘नु’ मूळ संस्कृतप्रमाणे र्‍हस्व लिहावा.’ या नियमानुसार या सामासिक शब्दातील ‘नु’ हे अक्षर र्‍हस्व लिहावे. या प्रकारच्या सामासिक शब्दांतील केवळ पहिला शब्दच नव्हे, तर पूर्णच शब्द संस्कृत व्याकरणानुसार लिहावा.

१० आ ४ अ १. नियम - संस्कृत धर्मग्रंथांची नावे ही लिहिणार्‍यास आणि वाचणार्‍यास चैतन्य प्रदान करत असल्यामुळे त्यांना मराठी व्याकरणाचे नियम न लावता ती मूळ संस्कृतनुसार लिहावीत !

१० आ ४ अ २. या नियमाची आणखी काही उदाहरणे आणि त्यांचे विग्रह पुढे दिले आहेत.

अनु.

सामासिक शब्द

विग्रह (अर्थ/शब्दाची फोड)

१.

विष्णुपुराण

विष्णूविषयीचे पुराण

२.

भृगुसंहिता

भृगु यांनी रचलेली संहिता

३.

नारदभक्तिसूत्र

नारद यांनी भक्तीविषयी सांगितलेले सूत्र (हा एक प्राचीन सूत्रग्रंथ आहे.)

४.

अग्निपुराण

अग्नीने (अग्निदेवाने) सांगितलेले पुराण

५.

वायुपुराण 

वायूने (वायुदेवाने) उपदेशलेले पुराण

- सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१०.२०२१)