७. शब्दांना सांधून (जोडून) त्यांचे जोडशब्द बनवणारा ‘संधी’ !

१. ‘संधी’ म्हणजे ‘सांधणे’ किंवा ‘जोडणे’ : ‘व्यक्ती बोलतांना बर्‍याचदा शेजारी शेजारी येणारे दोन शब्द एकमेकांना जोडून त्यांचा जोडशब्द सिद्ध करतात, उदा. ‘सूर्य अस्त झाला’, असे म्हणण्याऐवजी ‘सूर्यास्त झाला’, असे म्हणतात. ‘सूर्यास्त’ या जोडशब्दामध्ये ‘सूर्य’ या पहिल्या शब्दातील शेवटचे अक्षर आणि ‘अस्त’ या दुसर्‍या शब्दातील पहिले अक्षर एकमेकांमध्ये मिसळले आहेत. या मिसळण्यातून ‘र्या’ हे अक्षर सिद्ध झाले आहे. या पूर्ण प्रक्रियेला ‘संधी’ असे म्हणतात. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

        पुढील सारणीच्या तिसर्‍या स्तंभामधील वाक्यांतील ठळक केलेले शब्द हे संधी आहेत.

 अनु.

संधी नसलेली वाक्ये

संधी असलेली वाक्ये

१.

चंद्र उदय झाला.

चंद्रोदय झाला.

२.

काकांचे भोजन आलय आहे.

काकांचे भोजनालय आहे.

३.

गुरु सत् मार्ग दाखवतात. 

गुरु सन्मार्ग दाखवतात.

४.

हा बालक आश्रम आहे. 

हा बालकाश्रम आहे.

५.

जे घडेल, ती ईश्वर इच्छा मानावी. 

जे घडेल, ती ईश्वरेच्छा मानावी.

२. शब्दांचा संधी करण्याची एक नियमबद्ध पद्धत असणे : दोन शब्दांचा संधी करतांना एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी की, ‘व्याकरणात कोणतेही शब्द कशाही प्रकारे परस्परांशी जोडले जात नाहीत. ते जोडण्याचे अत्यंत पद्धतशीर असे नियम आहेत. त्या नियमांना अनुसरूनच प्रत्येक संधी केला जातो.’ 

३. ‘संधी’ची व्याख्या : जोडशब्दातील पहिल्या शब्दाचे शेवटचे अक्षर आणि दुसर्‍या शब्दाचे पहिले अक्षर नियमबद्धरित्या परस्परांमध्ये मिसळणे अन् त्याद्वारे त्या दोन अक्षरांच्या जागी एक अक्षर सिद्ध होणे, याला ‘संधी’ असे म्हणतात.

४. संधीचे प्रकार : संधीचे ‘स्वरसंधी’, ‘व्यंजनसंधी’ आणि ‘विसर्गसंधी’ असे तीन प्रकार आहेत. या प्रकारांची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

४ अ. स्वरसंधी

४ अ १. जोडशब्दातील एकमेकांमध्ये मिसळणारी अक्षरे जर स्वर असतील, तर त्या संधीस ‘स्वरसंधी’ असे म्हणत असणे : मराठीमध्ये ‘अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ आणि औ’ हे बारा स्वर आहेत. हे स्वर ‘क’पासून ‘ळ’पर्यंतच्या अक्षरांमध्ये मिसळतात आणि विविध शब्द सिद्ध होतात. याखेरीज आपल्याला ठाऊकच आहे की, मराठी भाषेतील ‘क’पासून ‘ळ’पर्यंतची सर्व अक्षरे ही मुळात ‘क्, ख्.....ह्, ळ्’ अशी अपूर्ण उच्चार असलेली, म्हणजे पाय मोडलेली आहेत. त्यांच्यात ‘अ’ हा स्वर मिसळल्याशिवाय ती पूर्ण उच्चार असलेली अक्षरे होत नाहीत, उदा. ‘ग् + अ = ग’. सर्व पूर्णाेच्चारित अक्षरे अशीच सिद्ध होतात. त्यामुळे या अक्षरांना स्वरयुक्त अक्षरेच मानले जाते. विविध शब्द सिद्ध होतांना या अक्षरांमध्ये ‘अ’च्या ऐवजी अन्य स्वर मिसळले जातात, उदा. ‘गायन’ या शब्दात ‘ग्’मध्ये ‘आ’ हा स्वर मिसळला आहे.

        जेव्हा जोडशब्दातील पहिल्या शब्दाचे शेवटचे अक्षर स्वरयुक्त असते आणि दुसर्‍या शब्दाचे पहिले अक्षर स्वर असते, तेव्हा ‘स्वरसंधी’ सिद्ध होतो, उदा. ‘मुनीश्वर’ हा संधी आहे. याची फोड ‘मुनि + ईश्वर = मुनीश्वर’ अशी होते. यातील ‘मुनि’ या शब्दातील ‘नि’ हा ‘इ’ स्वरयुक्त आहे आणि ‘ईश्वर’ या शब्दातील ‘ई’ हा स्वर आहे. ‘इ’ आणि ‘ई’ हे दोन स्वर एकत्र आल्यामुळे या संधीस ‘स्वरसंधी’ असे म्हणतात. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनु.

जवळ आलेले सुटे शब्द

जवळ येणारे स्वर

जोडशब्द (संधी)

१.

उप + आहार

अ + आ

उपाहार

२.

धान्य + उत्पादन

अ + उ

धान्योत्पादन

३.

महा + ईश

आ + ई

महेश

४.

टीका + अस्त्र

आ + अ

टीकास्त्र

५.

गण + अधीश

अ + अ

गणाधीश

४ अ २. स्वरसंधीचे प्रकार

४ अ २ अ. कोणत्याही स्वरापुढे तोच स्वर र्‍हस्व अथवा दीर्घ स्वरूपात येणे : ‘कोणत्याही स्वरापुढे तोच स्वर र्‍हस्व अथवा दीर्घ स्वरूपात आल्यास ते दोन स्वर परस्परांमध्ये मिसळतात आणि त्यांच्याऐवजी एकच दीर्घ स्वर लिहिला जातो. याचे उदाहरण पुढे दिले आहे.

        ‘वर्तुळ + आकार = वर्तुळाकार’ या संधीमध्ये ‘वर्तुळ’ या शब्दाच्या शेवटच्या अक्षरात ‘अ’ हा स्वर समाविष्ट आहे आणि ‘आकार’ या शब्दाच्या पहिल्या अक्षरात ‘आ’ हा स्वर आहे. ‘अ’ आणि ‘आ’ हे एकाच जातीचे (सजातीय) स्वर आहेत. या स्वरांमधील ‘अ’ हा र्‍हस्व स्वर आहे, तर ‘आ’ हा दीर्घ स्वर आहे. हे स्वर एकमेकांमध्ये मिसळले की, त्यांच्या ऐवजी ‘आ’ हा एकच दीर्घ स्वर सिद्ध होतो. त्यामुळे ‘वर्तुळाकार’ या शब्दामध्ये ‘ळा’ हे ‘आ’ स्वर समाविष्ट असलेले अक्षर निर्माण झाले आहे. याची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अनु.

जवळ आलेले सुटे शब्द

जवळ येणारे स्वर आणि त्यांचे संधी

जोडशब्द

१.

अधिक + अधिक

अ + अ = आ

अधिकाधिक

२.

वृक्ष + आरोपण

अ + आ = आ

वृक्षारोपण

३.

निद्रा + अवस्था

आ + अ = आ

निद्रावस्था

४.

विद्या + आलय

आ + आ = आ

विद्यालय

५.

मुनि + इच्छा

इ + इ = ई

मुनीच्छा

६.

हरि + ईश

इ + ई = ई

हरीश

७.

पार्वती + ईश

ई + ई = ई

पार्वतीश (शिव)

८.

नादबिंदु + उपनिषद्

उ + उ = ऊ

नादबिंदूपनिषद् (एका उपनिषदाचे नाव)

९.

मृत्यू + उत्तर

ऊ + उ = ऊ

मृत्यूत्तर (मृत्यूनंतर)

४ अ २ आ. ‘अ’ किंवा ‘आ’ या स्वरांपुढे ‘इ’ किंवा ‘ई’ हे स्वर येणे : ‘अ’ किंवा ‘आ’ या स्वरांपुढे ‘इ’ किंवा ‘ई’ हे स्वर आल्यास त्यांचा संधी होतांना त्या दोहोंऐवजी ‘ए’ हा एकच स्वर येतो, उदा. ‘शिक्षक + इतर = शिक्षकेतर’ या संधीमध्ये ‘शिक्षक’ या शब्दाच्या शेवटच्या अक्षरात ‘अ’ हा स्वर समाविष्ट आहे आणि ‘इतर’ या शब्दातील पहिले अक्षर ‘इ’ हा स्वर आहे. ‘अ + इ’ यांचा संधी झाल्यावर ‘ए’ हा स्वर सिद्ध होतो. या नियमानुसार ‘शिक्षकेतर’ या शब्दातील ‘के’ हे अक्षर सिद्ध झाले आहे. या नियमाची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनु.

जवळ आलेले सुटे शब्द

जवळ येणारे स्वर आणि त्यांचे संधी

जोडशब्द

१.

शुभ + इच्छा 

अ + इ = ए

शुभेच्छा

२.

पर + इच्छा

अ + इ = ए

परेच्छा

३.

ज्ञान + ईश्वर

अ + ई = ए

ज्ञानेश्वर

४.

सुर (देव) + ईश

अ + ई = ए

सुरेश

५.

रमा + ईश

आ + ई = ए

रमेश

  ४ अ २ इ. ‘अ’ किंवा ‘आ’ या स्वरांपुढे ‘उ’ किंवा ‘ऊ’ हे स्वर येणे : ‘अ’ किंवा ‘आ’ या स्वरांपुढे ‘उ’ किंवा ‘ऊ’ हे स्वर आल्यास त्यांचा संधी होतांना त्या दोहोंऐवजी ‘ओ’ हा एकच स्वर येतो. या नियमाची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनु.

जवळ आलेले सुटे शब्द

जवळ येणारे स्वर आणि त्यांचे संधी

जोडशब्द

१.

सूर्य + उदय

अ + उ = ओ

सूर्याेदय

२.

लोक + उद्धार

अ + उ = ओ

लोकोद्धार

३.

हित + उपदेश

अ + उ = ओ

हितोपदेश

४.

बल + उपासना

अ + उ = ओ

बलोपासना

५.

महा + उत्सव

आ + उ = ओ

महोत्सव

४ अ २ ई. ‘अ’ किंवा ‘आ’ या स्वरांपुढे ‘ऋ’ हा स्वर येणे : ‘अ’ किंवा ‘आ’ या स्वरांपुढे ‘ऋ’ हा स्वर आल्यास त्यांचा संधी होतांना त्या दोहोंऐवजी ‘अर्’ हे एकच अक्षर येते, उदा. ‘देव + ऋषि = देवर्षि’ या संधीमध्ये ‘देव’ या शब्दाच्या शेवटच्या अक्षरात ‘अ’ हा स्वर समाविष्ट आहे आणि ‘ऋषि’ या शब्दाचे पहिले अक्षर ‘ऋ’ हा स्वर आहे. ‘अ + ऋ’ यांचा संधी झाल्यावर ‘अर्’ हे अक्षर सिद्ध होते’, या नियमानुसार ‘देवर्षि’ या शब्दातील ‘र्षि’ हे अक्षर सिद्ध झाले आहे. या नियमाची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनु.

जवळ आलेले सुटे शब्द

जवळ येणारे स्वर आणि त्यांचे संधी

जोडशब्द

१.

ब्रह्म + ऋषि

अ + ऋ = अर्

ब्रह्मर्षि

२.

राजा + ऋषि

आ + ऋ = अर्

राजर्षि

३.

महा + ऋषि

आ + ऋ = अर्

महर्षि

४ अ २ उ. ‘अ’ किंवा ‘आ’ या स्वरांपुढे ‘ए’ किंवा ‘ऐ’ हे स्वर येणे : ‘अ’ किंवा ‘आ’ या स्वरांपुढे ‘ए’ किंवा ‘ऐ’ हे स्वर आल्यास संधी होतांना त्या दोहोंबद्दल ‘ऐ’ हा एकच स्वर येतो. या प्रकारचे संधी अधिकतर संस्कृत भाषेत होतात. या संधींची मराठी भाषेत प्रचलित असलेली काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनु.

जवळ आलेले सुटे शब्द

जवळ येणारे स्वर आणि त्यांचे संधी

जोडशब्द

१.

मत + ऐक्य

अ + ऐ = ऐ

मतैक्य (मतांचे ऐक्य)

२.

सदा + एव

आ + ए = ऐ

सदैव

४ अ २ ऊ. ‘अ’ किंवा ‘आ’ या स्वरांपुढे ‘ओ’ किंवा ‘औ’ हे स्वर येणे : ‘अ’ किंवा ‘आ’ या स्वरांपुढे ‘ओ’ किंवा ‘औ’ हे स्वर आल्यास संधी होतांना त्या दोहोंबद्दल ‘औ’ हा एकच स्वर येतो. या संधीची मराठी भाषेत प्रचलित असलेली काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनु.

जवळ आलेले सुटे शब्द

जवळ येणारे स्वर आणि त्यांचे संधी

जोडशब्द

१.

काल + ओघ

अ + ओ = औ

कालौघ

२.

जल + ओघ

अ + ओ = औ

जलौघ

४ अ २ ए. ‘इ’ किंवा ‘ई’ या स्वरांपुढे हे दोन्ही स्वर वगळून अन्य कोणताही स्वर येणे : ‘इ’ किंवा ‘ई’ या स्वरांपुढे हे दोन्ही स्वर वगळून अन्य कोणताही स्वर आल्यास त्यांचा संधी होतांना ‘इ’ किंवा ‘ई’ हे स्वर लोप पावतात आणि त्यांच्याबद्दल ‘य्’ हे अक्षर येते. असा संधी होऊन जोडशब्द सिद्ध होण्याची प्रक्रिया अन्य संधींपासून जोडशब्द सिद्ध होण्याच्या प्रक्रियेपेक्षा थोडी निराळी आहे. या प्रक्रियेचे एक उदाहरण पुढे दिले आहे.

        ‘अती + आधुनिक = अत्याधुनिक’ या संधीमध्ये ‘अती’ या शब्दाच्या शेवटच्या अक्षरात ‘ई’ हा स्वर समाविष्ट आहे आणि ‘आधुनिक’ या शब्दाचे पहिले अक्षर ‘आ’ हा स्वर आहे; मात्र ‘ई + आ = या’ अशी या संधीची फोड होत नाही. त्याऐवजी ती ‘ई + आ = य् + आ = या’ अशी होते, म्हणजे संधी होतांना पहिल्या टप्प्यावर ‘य्’ हे अक्षर सिद्ध होते. त्यानंतर त्या ‘य्’मध्ये पुढील ‘आधुनिक’ या शब्दातील ‘आ’ मिसळतो आणि ‘या’ हे पूर्ण अक्षर सिद्ध होते. अशा प्रकारे ‘अत्याधुनिक’ या शब्दातील ‘त्या’ हे अक्षर सिद्ध झाले आहे. याला संस्कृत भाषेत ‘यणादेश’ असे म्हणतात. या संधीची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.  

अनु.

जवळ आलेले सुटे शब्द

जवळ येणारे स्वर आणि त्यांचे संधी

जोडशब्द

१.

इति + आदी

इ + आ = य् + आ = या

इत्यादी

२.

अधि + आत्म

इ + आ = य् + आ = या

अध्यात्म

३.

प्रती + एक

ई + ए = य् + ए = ये

प्रत्येक

४.

अभी + उदय

ई + उ = य् + उ = यु

अभ्युदय (उत्कर्ष)

५.

अती + उच्च

ई + उ = य् + उ = यु

अत्युच्च

४ अ २ ऐ. ‘उ’ किंवा ‘ऊ’ या स्वरांपुढे हे दोन्ही स्वर वगळून अन्य कोणतेही स्वर येणे : ‘उ’ किंवा ‘ऊ’ या स्वरांपुढे हे दोन्ही स्वर वगळून अन्य कोणतेही स्वर आल्यास त्यांचा संधी होतांना ‘उ’ किंवा ‘ऊ’ हे स्वर लोप पावतात आणि त्यांच्याबद्दल ‘व्’ हे अक्षर येते.हा संधी होण्याची प्रक्रियाही वरील सूत्र क्र. ‘४ अ २ ए’ याप्रमाणेच आहे. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अनु.

जवळ आलेले सुटे शब्द

जवळ येणारे स्वर आणि त्यांचे संधी

जोडशब्द

१.

मनु + अंतर

उ + अ (टीप १) = व् + अ = व 

मन्वंतर

२.

सु + आगत

उ + आ = व् + आ = वा

स्वागत

३.

सु + अल्प

उ + अ = व् + अ = व

स्वल्प

टीप १ - या ठिकाणी संधी करतांना आपण ‘अंतर’ या शब्दातील ‘अं’ हे अक्षर घेण्याऐवजी ‘अ’ हे अक्षर घेतले आहे; कारण ‘अं’चा उच्चार केल्यास आधी ‘अ’ हा स्वर उच्चारला जातो आणि नंतर अनुस्वाराचा उच्चार होतो.

 ४ आ १. भाषेतील ‘व्यंजने’ म्हणजे अपूर्ण उच्चारली जाणारी मुळाक्षरे, म्हणजेच ‘वर्ण’ ! : मराठी भाषेत ‘अ, आ, इ...’पासून ‘...स्, ह्, ळ्’पर्यंत ४८ मुळाक्षरे आहेत. या मुळाक्षरांना ‘वर्ण’ असेही म्हणतात. मुळाक्षरांमधील ‘क्, ख्, ग्....’पासून ‘....स्, ह्, ळ्’पर्यंतच्या ३४ मुळाक्षरांना ‘व्यंजने’ असे म्हणतात. व्यंजने ही नेहमीच ‘क्’, ‘ख्’, ‘ग्’ अशी अपूर्ण उच्चारांची असतात. त्यामुळे ती लिहितांना त्यांचा पाय मोडून लिहिण्याची पद्धत आहे. व्यंजनांचा उच्चार पूर्ण होण्यासाठी त्यांच्यामध्ये ‘अ’ हा स्वर मिसळावा लागतो, उदा. ‘क् + अ = क’. विविध शब्द सिद्ध होतांना ‘अ’च्या ऐवजी ‘आ’, ‘इ’, ‘ई’ इत्यादी स्वरसुद्धा व्यंजनांमध्ये मिसळतात. 

४ आ २. व्यंजनांचे पाच गट : ३४ व्यंजनांपैकी पहिल्या २५ व्यंजनांचे पाच गट पडतात. ‘क्’, ‘च्’, ‘ट्’, ‘त्’ आणि ‘प्’ हे ते पाच गट आहेत. ‘क’ या गटामध्ये ‘ख्, ग्, घ्, ङ्’ ही व्यंजने येतात. याप्रमाणे अन्य चार गट आणि त्यांच्यामध्ये येणारी व्यंजने पुढीलप्रमाणे आहेत.

        ‘च्’, छ्, ज्, झ्, ञ्

        ‘ट्’, ठ्, ड्, ढ्, ण्

        ‘त्’, थ्, द्, ध्, न्

        ‘प्’, फ्, ब्, भ्, म्

४ आ ३. अनुनासिके : व्यंजनांच्या पाच गटांमधील प्रत्येक गटातील शेवटच्या ‘ङ्’, ‘ञ्’, ‘ण्’, ‘न्’ आणि ‘म्’ या व्यंजनांचा उच्चार करतांना तो तोंडासह नाकातूनही होतो. त्यामुळे त्यांना ‘अनुनासिके’ असे म्हणतात.

४ आ ४. कठोर वर्ण : जे वर्ण उच्चारावयास कठीण असतात, त्यांना ‘कठोर वर्ण’ असे म्हणतात. व्यंजनांच्या पाच गटांपैकी प्रत्येक गटातील पहिली दोन व्यंजने, म्हणजे ‘क्, ख्’ ‘च्, छ्’ ‘ट्, ठ्’ ‘त्, थ्’ आणि ‘प्, फ्’ ही अन्य व्यंजनांच्या तुलनेत उच्चारावयास कठीण आहेत. यांच्यासह ‘श्, ष् आणि स्’ या व्यंजनांचाही उच्चार करणे तुलनेने कठीण आहे. या सर्व व्यंजनांना ‘कठोर वर्ण’ असे म्हटले जाते.

४ आ ५. मृदू वर्ण : जे वर्ण उच्चारावयास कोमल, तसेच सोपे असतात, त्यांना ‘मृदू वर्ण’ असे म्हणतात. ‘अ’पासून ‘औ’पर्यंतचे बारा स्वर हे उच्चारावयास कोमल असतात. त्याचबरोबर व्यंजनांच्या पाच गटांपैकी प्रत्येक गटातील शेवटची तीन व्यंजने, म्हणजे ‘ग्, घ्, ङ्’ ‘ज्, झ्, ञ्’ ‘ड्, ढ्, ण्’ ‘द्, ध्, न्’ आणि ‘ब्, भ्, म्’ ही तुलनेने उच्चारावयास सोपी असतात. अन्य व्यंजनांपैकी ‘य्, र्, ल्, व्, ह्, ळ्’ ही व्यंजनेही कोमल आहेत. या सर्व वर्णांना ‘मृदू वर्ण’ असे म्हटले जाते.

४ आ ६. ‘व्यंजनसंधी’चे प्रकार  

४ आ ६ अ. व्यंजनांच्या पाच गटांतील अनुनासिके वगळून अन्य कोणत्याही व्यंजनापुढे ‘कठोर व्यंजन’ येणे : ‘आपद् + काळ’ या दोन शब्दांमधील पहिल्या शब्दाचे शेवटचे अक्षर व्यंजनांच्या पाच गटांपैकी ‘त्’ या गटातील आहे. दुसर्‍या शब्दातील पहिले अक्षर ‘क्’ हे ‘कठोर व्यंजन’ आहे. या दोहोंचा संधी होतांना ‘द्’ या अक्षराच्या जागी त्याच्या गटाचा प्रमुख असलेला ‘त्’ हा पहिला ‘कठोर वर्ण’ येतो. अशा प्रकारे हा संधी ‘आपद् + काळ = द् + क् = त् + क् = त्क्’ असा होतो आणि ‘आपत्काळ’ हा शब्द सिद्ध होतो. या संधीची एकच अट आहे, ती म्हणजे, ‘पहिल्या शब्दातील शेवटचे अक्षर अनुनासिक असता कामा नये.’ अशा प्रकारचे संधी अधिकतर संस्कृत भाषेमध्ये होतात. मराठी भाषेत प्रचलित असलेल्या अशा संधींची फोड केली असता एकत्र येणार्‍या व्यंजनांच्या दोन्ही फोडी ‘आपत्काळ’प्रमाणे वेगवेगळ्या न होता एकसारख्याच होतात. या संधीची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनु.

जवळ येणारे सुटे शब्द

एकत्र येणारी व्यंजने आणि संधी

जोडशब्द

१.

उत् + क्रांती

त् + क् = त् + क् = त्क्

उत्क्रांती

२.

दिक् + पाल

क् + प् = क् + प् = क्प्

दिक्पाल (दिशांचे पालक/रक्षक असलेले)

३.

पश्चात् + ताप

त् + त् = त् + त् = त्त्

पश्चात्ताप

४.

वाक् + चातुर्य

क् + च् = क् + च् = क्च्

वाक्चातुर्य (बोलण्यातील चातुर्य)

५.

षट् + कोन

ट् + क् = ट् + क् = ट्क्

षट्कोन

४ आ ६ आ. व्यंजनांच्या पाच गटांतील ‘कठोर व्यंजनां’पुढे अनुनासिके वगळून ‘स्वर’ किंवा ‘मृदू व्यंजने’ येणे : या संधीविषयी एका उदाहरणाच्या साहाय्याने जाणून घेऊ. व्यंजनांच्या ‘क्’, ‘च्’, ‘ट्’, ‘त्’ आणि ‘प्’ या पाच गटांतील व्यंजनांपैकी ‘ट्’ हे एक ‘कठोर व्यंजन’ आहे. त्याच्या पुढे ‘स्वर’ किंवा ‘मृदू व्यंजन’ आल्यास त्यांचा संधी पुढीलप्रमाणे सिद्ध होतो.

        ‘षट् + रिपू = ट् + र् = ड् + र् = ड्र्’ यामध्ये पहिल्या शब्दातील शेवटच्या ‘ट्’ या कठोर व्यंजनात दुसर्‍या शब्दातील पहिले ‘र्’ हे मृदू व्यंजन मिसळते. त्या वेळी ‘ट्’चा लोप होतो आणि त्याच्या जागी त्याच्याच गटातील ‘ड्’ हे तिसरे व्यंजन येते. अशा प्रकारे संधी होऊन ‘षड्रिपू’ हा जोडशब्द सिद्ध होतो. या प्रकारच्या संधीमध्ये नेहमीच पहिल्या कठोर व्यंजनाच्या जागी त्याच्याच गटातील तिसरे व्यंजन येत असल्यामुळे याला ‘तृतीय-व्यंजन-संधी’ असे म्हणतात. या संधीची अट केवळ एवढीच आहे की, ‘कठोर व्यंजनांच्या पुढे अनुनासिके येता कामा नयेत.’ याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.   

अनु.

जवळ येणारे सुटे शब्द

एकत्र येणारे वर्ण आणि त्यांचे संधी

जोडशब्द

१.

षट् + आनन

ट् + आ = ड् + आ = डा

षडानन (कार्तिकेय)

२.

उत् + बोधक

त् + ब् = द् + ब् = द्ब्

उद्बोधक

३.

जगत् + गुरु

त् + ग् = द् + ग् = द्ग्

जगद्गुरु

४.

दृक् + गोचर

क् + ग् = ग् + ग् = ग्ग्

दृग्गोचर (दिसणारे)

५.

वाक् + देवी

क् + द् = ग् + द् = ग्द्

वाग्देवी

 ४ आ ६ इ. व्यंजनांच्या पाच गटांतील कोणत्याही व्यंजनापुढे ‘अनुनासिक’ येणे : व्यंजनांच्या पाच गटांतील कोणत्याही व्यंजनापुढे ‘ङ्’, ‘ञ्’, ‘ण्’, ‘न्’ आणि ‘म्’ ही ‘अनुनासिके’ आल्यास त्यांचा संधी पुढीलप्रमाणे होतो.

        ‘वाङ्मय’ या जोडशब्दाचा संधी ‘वाक् + मय = क् + म् = ङ् + म्’ अशा प्रकारे होतो. ‘वाङ्मय’ या जोडशब्दातील पहिल्या शब्दाचे (‘वाक्’चे) शेवटचे व्यंजन ‘क्’ हे व्यंजनांच्या पाच गटांतील एक आहे. दुसर्‍या शब्दातील पहिले व्यंजन ‘म्’ हे अनुनासिक आहे. ही दोन व्यंजने एकत्र येतांना ‘क्’ या व्यंजनाचा लोप होतो आणि त्याच्या जागी त्याच्याच गटातील शेवटचे ‘ङ्’ हे अनुनासिक येते. याला ‘अनुनासिक संधी’ असे म्हणतात. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनु.

जवळ येणारे सुटे शब्द

एकत्र येणारी व्यंजने आणि त्यांचे संधी

जोडशब्द

१.

उत् + मत्त

त् + म् = न् + म्

उन्मत्त

२.

जगत् + नायक

त् + न् = न् + न्

जगन्नायक

३.

दिक् + मूढ

क् + म् = ङ् + म्

दिङ्मूढ (भ्रमित)

४.

षट् + मुख

ट् + म् = ण् + म्

षण्मुख (कार्तिकेय)

५.

सत् + मार्ग

त् + म् = न् + म्

सन्मार्ग

४ आ ६ ई. ‘त्’ या व्यंजनापुढे ‘च्’ अथवा ‘छ्’ येणे : असे झाल्यास ‘त्’चा लोप होतो आणि त्याच्या जागी ‘च्’ हे व्यंजन येते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनु.

जवळ येणारे सुटे शब्द

एकत्र येणारी व्यंजने आणि संधी

जोडशब्द

१.

उत् + च

त् + च् = च् + च्

उच्च 

२.

सत् + चरित्र

त् + च् = च् + च्

सच्चरित्र

३.

सत् + चिदानंद

त् + च् = च् + च्

सच्चिदानंद

४.

उत् + छेद 

त् + छ् = च् + छ्

उच्छेद (समूळ नाश)

५.

वित् + छेद

त् + छ् = च् + छ्

विच्छेद (लोपणे)

४ आ ६ उ. ‘त्’ या व्यंजनापुढे ‘ज्’ हे व्यंजन येणे : असे झाल्यास त्यांचा संधी होतांना ‘त्’ हे व्यंजन लोप पावते आणि त्याच्या जागी ‘ज्’ हे व्यंजन येते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनु.

जवळ येणारे सुटे शब्द

एकत्र येणारी व्यंजने आणि संधी

जोडशब्द

१.

उत् + ज्वल

त् + ज् = ज् + ज्

उज्ज्वल

२.

जगत् + जेता

त् + ज् = ज् + ज्

जगज्जेता

३.

पुनरुत् + जीवन

त् + ज् = ज् + ज्

पुनरुज्जीवन

४.

सत् + जन

त् + ज् = ज् + ज्

सज्जन

 ४ आ ६ ऊ. ‘त्’ या व्यंजनापुढे ‘ल्’ हे व्यंजन येणे : असे झाल्यास त्यांचा संधी होतांना ‘त्’ हे व्यंजन लोप पावते आणि त्याच्या जागी ‘ल्’ हे व्यंजन येते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनु.

जवळ येणारे सुटे शब्द

एकत्र येणारी व्यंजने आणि संधी

जोडशब्द

१.

उत् + लंघन

त् + ल् = ल् + ल्

उल्लंघन

२.

उत् + लेख

त् + ल् = ल् + ल्

उल्लेख

३.

तत् + लीन

त् + ल् = ल् + ल्

तल्लीन

४.

विद्युत् + लता

त् + ल् = ल् + ल्

विद्युल्लता

 ४ आ ६ ए. ‘त्’ या व्यंजनापुढे ‘श्’ हे व्यंजन येणे : असे झाल्यास ‘त्’ या व्यंजनाचा लोप होतो आणि त्याच्या जागी ‘च्’ हे व्यंजन येते. त्याचबरोबर ‘श्’ या व्यंजनाचाही लोप होतो आणि त्याच्या जागी ‘छ्’ हे व्यंजन येते. याचे उदाहरण पुढे दिले आहे.

        ‘उत् + शृंखल’ हा संधी होतांना ‘त्’ या व्यंजनाच्या ऐवजी ‘च्’ हे व्यंजन येते आणि ‘श्’ या व्यंजनाच्या ऐवजी ‘छ्’ हे व्यंजन येते. अशा प्रकारे हा संधी ‘उत् + शृंखल = त् + श् = च् + छ्’ असा होतो आणि ‘उच्छृंखल’ हा शब्द सिद्ध होतो. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनु.

जवळ येणारे सुटे शब्द

एकत्र येणारी व्यंजने आणि संधी

जोडशब्द

१.

सत् + शिष्य

त् + श् = च् + छ्

सच्छिष्य

२.

सत् + शील

त् + श् = च् + छ्

सच्छील

३.

उत् + श्वास

त् + श् = च् + छ्

उच्छ्वास

४ आ ६ ऐ. ‘म्’ या व्यंजनापुढे कोणतेही व्यंजन येणे : ‘म्’ या अनुनासिक व्यंजनापुढे कोणतेही व्यंजन आल्यास ‘म्’चा लोप होतो आणि त्याच्या आधीच्या अक्षरावर अनुस्वार येतो. ‘सम् + गती’ याचा संधी होतांना ‘म्’ लोप पावतो आणि त्याच्या आधीच्या ‘स’ या अक्षरावर अनुस्वार येतो. अशा प्रकारे ‘संगती’ हा शब्द सिद्ध होतो.

अनु.

जवळ येणारे सुटे शब्द

जोडशब्द

१.

अहम् + कार

अहंकार

२.

किम् + वा

किंवा

३.

सम् + गीत

संगीत

४.

सम् + चालक

संचालक

५.

स्वयम् + पूर्ण

स्वयंपूर्ण

४ इ. विसर्गसंधी 

४ इ १. ‘विसर्ग’ म्हणजे काय ? : ‘विसर्ग’ हा मराठी भाषेतील एकूण ४८ वर्णांपैकी एक वर्ण आहे. मुळाक्षरांमध्ये लिहितांना तो ‘अः’ असा लिहिला जातो. या ‘अः’मधील एकाखाली एक असलेली दोन टिंबे (:) म्हणजे विसर्ग होय. भाषेमध्ये विसर्गाच्या आधी नेहमीच कोणता ना कोणता स्वर येतो, उदा. ‘काः’ या अक्षरात विसर्गाच्या आधी ‘क् + आ’ याप्रमाणे ‘आ’ हा स्वर आला आहे; म्हणून विसर्गाला ‘स्वरादी (स्वर आहे ज्याच्या आदी, म्हणजे आधी असा तो)’, असे म्हणतात. विसर्गाचा उच्चार करतांना ‘ह्’ या वर्णाला थोडा हिसडा दिल्याप्रमाणे उच्चार केला जातो. 

४ इ २. विसर्गसंधीचे प्रकार

४ इ २ अ. विसर्गाच्या आधी ‘अ’ हा स्वर असणे आणि विसर्गानंतर ‘मृदू वर्ण’ असणे : आपण जाणतोच की, मराठी भाषेतील ३४ व्यंजनांपैकी पहिल्या २५ व्यंजनांचे पुढील पाच गट पडतात. पुढे दिलेल्या या गटांची अवतरणचिन्हांत दिलेली पहिली अक्षरे हे एक प्रकारे त्या गटांचे नायक असून त्या अक्षरांवरून ते गट ओळखले जातात.

        ‘क्’, ख्, ग्, घ्, ङ्

        ‘च्’, छ्, ज्, झ्, ञ्

        ‘ट्’, ठ्, ड्, ढ्, ण्

        ‘त्’, थ्, द्, ध्, न्

        ‘प्’, फ्, ब्, भ्, म्

        ‘अ’पासून ‘औ’पर्यंतचे बारा स्वर आणि व्यंजनांच्या ‘क्’, ‘च्’, ‘ट्’, ‘त्’ अन् ‘प्’ या पाच गटांपैकी प्रत्येक गटातील शेवटची तीन व्यंजने हे ‘मृदू वर्ण’ मानले जातात. त्यांच्यासह अन्य व्यंजनांपैकी ‘य्, र्, ल्, व्, ह्, आणि ळ्’ हीदेखील ‘मृदू व्यंजने’ आहेत. आता ‘विसर्गसंधी’च्या पहिल्या प्रकाराविषयी एका उदाहरणाद्वारे जाणून घेऊ.

        ‘शिरोभाग’ या शब्दाची प्राथमिक फोड ‘शिरः + भाग = शिरोभाग’ अशी होते. आता प्रश्न असा पडतो की, ‘शिरः’चा ‘शिरो’ कसा झाला ?’ याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

        ‘शिरः’ या शब्दामधील विसर्गाच्या आधी ‘र’ हे ‘अ’युक्त अक्षर आले आहे आणि विसर्गाच्या पुढे ‘भ’ हे मृदू व्यंजन आहे. यांचा संधी होतांना विसर्गाचा लोप होतो आणि त्याचे रूपांतर ‘उ’ या स्वरामध्ये होते. म्हणजे ‘शिरः + भाग = शिर + उ + भाग’ याप्रमाणे त्या शब्दाची फोड होते. ही फोड झाल्यानंतर ‘शिर’ यातील शेवटचा ‘अ’ आणि त्याच्या पुढील ‘उ’ हे परस्परांमध्ये मिसळून ‘ओ’ हा स्वर सिद्ध होतो. त्यामुळे ‘शिर’मधील ‘र’चा ‘रो’ होतो. अशा प्रकारे ‘शिरोभाग’ हा शब्द सिद्ध होतो. थोडक्यात समजून घ्यावयाचे, तर ही प्रक्रिया पुढीलप्रमाणे घडते.

        शिरः + भाग = शिर + उ + भाग = शिरोभाग

        याची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अनु.

जवळ येणारे दोन शब्द

संधी होतांना विसर्गामध्ये होणारा पालट

जोडशब्द

१.

अधः + मुख 

अध + उ + मुख

अधोमुख

२.

अधः + गती  

अध + उ + गती

अधोगती

३.

तेजः + मय 

तेज + उ + मय

तेजोमय

४.

मनः + हर 

मन + उ + हर

मनोहर

५.

यशः + दा  

यश + उ + दा

यशोदा

४ इ २ आ. विसर्गाच्या आधी ‘अ’ किंवा ‘आ’ हे दोन स्वर वगळून अन्य कोणताही स्वर असणे आणि विसर्गापुढे मृदू वर्ण असणे : ‘निरपराध’ या शब्दाची प्राथमिक फोड ‘निः + अपराध = निरपराध’ अशी होते. आता पुन्हा असे प्रश्न पडतात की, ‘निः’ आणि ‘अपराध’ या दोन्ही शब्दांमध्ये ‘र’ हे अक्षर नसतांना ‘निरपराध’मध्ये ‘र’ कुठून आला आणि ‘अपराध’मधील ‘अ’ कुठे गेला ?’ याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

        ‘निः’ या अक्षरामध्ये विसर्गाच्या आधी ‘इ’कार आलेला आहे, तसेच विसर्गाच्या पुढे ‘अपराध’ या शब्दातील ‘अ’ हा मृदू वर्ण आला आहे. अशा स्थितीत संधी होतांना विसर्गाचा लोप होतो आणि त्याच्या जागी ‘र्’ हे मुळाक्षर येते. यानंतर ‘र्’ या मुळाक्षरात ‘अपराध’मधील ‘अ’ मिसळतो आणि ‘निरपराध’मधील ‘र’ हे अक्षर सिद्ध होते. म्हणजे ‘निरपराध’ या शब्दाची व्याकरणदृष्ट्या फोड पुढीलप्रमाणे होते.

        निः + अपराध = नि + र् + अपराध = निरपराध

        हा संधी होतांना अट एवढीच आहे की, ‘विसर्गाच्या आधी ‘अ’ किंवा ‘आ’ यांपैकी कोणताही स्वर असता कामा नये.’ या संधीची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अनु.

जवळ येणारे दोन शब्द

संधी होतांना विसर्गामध्ये होणारा पालट

जोडशब्द

१.

दुः + अवस्था

दु + र् + अवस्था

दुरवस्था

२.

आयुः + आरोग्य 

आयु + र् + आरोग्य

आयुरारोग्य

३.

निः + विचार

नि + र् + विचार

निर्विचार

४.

बहिः + मुख

बहि + र् + मुख

बहिर्मुख

५.

दुः + दशा

दु + र् + दशा

दुर्दशा

४ इ २ आ १. विसर्गाच्या आधी ‘अ’ किंवा ‘आ’ हे दोन स्वर वगळून अन्य कोणताही स्वर असणे आणि विसर्गापुढे ‘र’ हे अक्षर असणे : ‘नीरव’ या शब्दाची फोड वर ‘सूत्र क्र. ४ इ २ आ’मध्येदिलेल्या नियमानुसार ‘निः + रव = नि + र् + रव = नीरव’, अशी होते. यामध्ये ‘र् + रव’ असे दोन ‘र’ परस्परांजवळ येतात आणि त्यांचा संधी होतो. हा संधी होतांना पहिल्या (विसर्गामध्ये पालट होऊन आलेल्या) ‘र्’चा लोप होतो आणि त्याच्या आधी असलेले ‘नि’ हे र्‍हस्व अक्षर ‘नी’ असे दीर्घ होते. या प्रकारच्या संधीचे आणखी एक उदाहरण पुढे दिले आहे.

        निः + रस = नि + र् + रस = नीरस

४ इ २ इ. जोडशब्दातील पहिल्या शब्दाच्या शेवटी ‘स्’ असणे आणि दुसर्‍या शब्दाचे पहिले अक्षर एखादे व्यंजन असणे : आपण जाणतोच की, ‘मराठीतील ‘क’पासून ‘ळ’पर्यंतच्या अक्षरांना ‘व्यंजने’ असे म्हणतात.’ दोन शब्दांचा संधी होऊन सिद्ध झालेल्या जोडशब्दातील पहिल्या शब्दाच्या शेवटी ‘स्’ असेल आणि दुसर्‍या शब्दाचे पहिले अक्षर एखादे व्यंजन असेल, तर पहिल्या शब्दातील ‘स्’ लोप पावतो अन् त्याच्या जागी विसर्ग (:) येतो. याचे उदाहरण पुढीलप्रमाणे आहे.

        ‘अधस् + पतन = अधःपतन’ या उदाहरणात ‘अधस्’ या शब्दाच्या शेवटी ‘स्’ आहे आणि ‘पतन’ या शब्दातील पहिले अक्षर ‘प’ हे व्यंजन आहे. त्यामुळे संधी होतांना ‘अधस्’मधील ‘स्’ लोप पावला आणि त्याच्या जागी विसर्ग (:) येऊन ‘अधःपतन’ हा जोडशब्द सिद्ध झाला. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनु.

जवळ येणारे दोन शब्द

पहिल्या शब्दातील ‘स्’चा लोप होऊन बनणारा जोडशब्द

१.

उषस् + काल

उषःकाल

२.

तपस् + सामर्थ्य

तपःसामर्थ्य

३.

तेजस् + कण

तेजःकण

४.

मनस् + स्वास्थ्य

मनःस्वास्थ्य

५.

मनस् + पूर्वक

मनःपूर्वक

४ इ २ ई. जोडशब्दातील पहिल्या शब्दाच्या शेवटी ‘र्’ असणे आणि दुसर्‍या शब्दाचे पहिले अक्षर कठोर व्यंजन असणे : मराठीत ‘क्’, ‘ख्’, ‘च्’, ‘छ्’, ‘ट्’, ‘ठ्’, ‘त्’, ‘थ्’, ‘प्’, ‘फ्’, ‘श्’, ‘ष्’ आणि ‘स्’ ही तेरा कठोर व्यंजने आहेत. दोन शब्दांचा संधी होतांना पहिल्या शब्दाच्या शेवटी ‘र्’ असेल आणि दुसर्‍या शब्दातील पहिले अक्षर तेरा कठोर व्यंजनांपैकी एक असेल, तर पहिल्या शब्दातील शेवटचा ‘र्’ लोप पावतो अन् त्याच्या जागी विसर्ग (:) येतो. याचे उदाहरण पुढे दिले आहे.

        ‘अंतर् + करण = अंतःकरण’ या उदाहरणात पहिल्या ‘अंतर्’ या शब्दाच्या शेवटी ‘र्’ आहे आणि दुसर्‍या ‘करण’ या शब्दातील पहिले अक्षर ‘क’ हे कठोर व्यंजन आहे. त्यामुळे या शब्दांचा संधी होतांना पहिल्या शब्दातील शेवटचा ‘र्’ लोप पावला आणि त्याच्या जागी विसर्ग (:) येऊन ‘अंतःकरण’ हा शब्द सिद्ध झाला. याची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अनु.

जवळ येणारे दोन शब्द

पहिल्या शब्दातील ‘र्’चा लोप होऊन बनणारा जोडशब्द

१.

अंतर् + प्रेरणा

अंतःप्रेरणा

२.

अंतर् + स्फूर्ती

अंतःस्फूर्ती

३.

अंतर् + पूर

अंतःपूर (आतील खोली)

४.

प्रातर् + स्मरणीय

प्रातःस्मरणीय

५.

चतुर् + सूत्री

चतुःसूत्री (चार सूत्रे एकत्र असणे)

४ इ २ उ. जोडशब्दातील पहिल्या शब्दाच्या शेवटी असलेल्या ‘र्’च्या आधीचे अक्षर ‘अ’युक्त असणे आणि दुसर्‍या शब्दाच्या प्रथम स्थानी मृदू अक्षर असणे : ‘पुनर् + जन्म’ या दोन शब्दांपैकी ‘पुनर्’ या पहिल्या शब्दातील शेवटच्या ‘र्’च्या आधी ‘न’ हे अक्षर आले आहे. हे अक्षर ‘अ’युक्त आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ‘अ’ हा स्वर मिसळलेला आहे. दुसर्‍या ‘जन्म’ या शब्दातील पहिले अक्षर ‘ज’ हे मृदू अक्षर आहे. (मृदू अक्षरांविषयीची सविस्तर माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रविवार, १३.२.२०२२ या दिवशीच्या अंकातप्रसिद्ध करण्यात आली आहे.) या दोन शब्दांचा संधी होतांना ‘र्’ हे अक्षर ‘ज’ या मृदू अक्षरात मिसळून जाते आणि हा संधी ‘पुनर् + जन्म = पुनर्जन्म’ याप्रमाणे होतो. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनु.

जवळ येणारे दोन शब्द

पहिल्या शब्दातील शेवटच्या ‘र्’सह बनणारा जोडशब्द

१.

अंतर् + अंग

अंतरंग

२.

अंतर् + आत्मा

अंतरात्मा

३.

पुनर् + आगमन

पुनरागमन

४.

अंतर् + मुख

अंतर्मुख

५.

पुनर् + रचना

पुनर्रचना

४ इ २ ऊ. जोडशब्दातील पहिल्या शब्दाच्या शेवटी असलेल्या विसर्गाच्या (: च्या) आधी ‘अ’ स्वरयुक्त अक्षर असणे आणि दुसर्‍या शब्दाचा पहिला वर्ण ‘क्’, ‘ख्’, ‘प्’ किंवा ‘फ्’ यांपैकी एखादा असणे : ‘तेजः + पुंज = तेजःपुंज’ या संधीमध्ये पहिल्या ‘तेजः’ या शब्दामधील विसर्गाच्या (: च्या)आधी ‘ज’ हे ‘अ’स्वरयुक्त अक्षर आहे आणि दुसर्‍या शब्दाचा पहिला वर्ण ‘प्’ आहे. अशा दोन शब्दांचा संधी होतांना विसर्ग (:) तसाच रहातो आणि ‘तेजःपुंज’ असा जोडशब्द सिद्ध होतो. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनु.

जवळ येणारे दोन शब्द

पहिल्या शब्दातील विसर्ग (:) कायम राहून बनणारा जोडशब्द

१.

कः + पदार्थ

कःपदार्थ (तुच्छ)

२.

प्रातः + काल

प्रातःकाल

३.

पुनः + प्रत्यय

पुनःप्रत्यय (पुन्हा एकदा अनुभव येणे)

४.

पुनः + प्रवेश

पुनःप्रवेश

४ इ २ ए. जोडशब्दातील पहिल्या शब्दाच्या शेवटी असलेल्या विसर्गाच्या आधी ‘इ’युक्त किंवा ‘उ’युक्त अक्षर असणे आणि दुसर्‍या शब्दाचा पहिला वर्ण ‘क्’, ‘ख्’, ‘प्’ किंवा ‘फ्’ यांपैकी एखादा असणे : ‘चतुः + कोन = चतुष्कोन (चौकोन)’ या संधीमध्ये पहिल्या शब्दातील विसर्गाच्या आधी ‘तु’ हे ‘उ’युक्त अक्षर आले आहे आणि दुसर्‍या शब्दातील पहिला वर्ण ‘क्’ आहे. अशा शब्दांचे संधी होतांना पहिल्या शब्दातील शेवटचा विसर्ग लोप पावतो आणि त्याच्या जागी ‘ष्’ येतो. अशा प्रकारे ‘चतुष्कोन’ हा शब्द सिद्ध झाला आहे. याची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अनु.

जवळ येणारे दोन शब्द

पहिल्या शब्दातील विसर्गाचा ‘ष्’ होऊन बनणारा जोडशब्द

१.

दुः + काळ 

दुष्काळ

२.

दुः + प्रवृत्ती

दुष्प्रवृत्ती

३.

निः + काळजी

निष्काळजी

४.

निः + फळ

निष्फळ

५.

बहिः + कार

बहिष्कार

४ इ २ ए १. ‘दुःख’ आणि ‘निःपक्ष’ हे दोन शब्द वरील ‘४ इ २ ए’ या नियमाला अपवाद असणे : ‘दुः + ख = दुःख’ यामध्ये पहिल्या पदाच्या शेवटी असलेल्या विसर्गाच्या आधी ‘दु’ हे ‘उ’युक्त अक्षर आले आहे आणि दुसर्‍या पदातील पहिला वर्ण ‘ख्’ हा आहे. असे असले, तरी या पदांचा संधी होतांना तो ‘दुःख’ असा होतो; ‘दुष्ख’ असा होत नाही. अशा प्रकारे हा शब्द वरील ‘४ इ २ ए’ या नियमाला अपवाद आहे. असाच आणखी एक अपवादात्मक शब्द म्हणजे ‘निः + पक्ष = निःपक्ष.

४ इ २ ऐ. जोडशब्दातील पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्ग (:) असणे आणि दुसर्‍या शब्दाचा पहिला वर्ण ‘च्’ किंवा ‘छ्’ असणे : ‘मनः + चक्षू = मनश्चक्षू’ या संधीमध्ये पहिल्या ‘मनः’ या शब्दाच्या शेवटी विसर्ग (:) आहे आणि दुसर्‍या ‘चक्षू’ या शब्दातील पहिला वर्ण ‘च्’ हा आहे. अशा दोन शब्दांचा जेव्हा संधी होतो, तेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा विसर्ग लोप पावतो आणि त्याच्या जागी ‘श्’ हा वर्ण येतो. अशा प्रकारे ‘मनश्चक्षू’ हा शब्द सिद्ध होतो. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनु.

जवळ येणारे दोन शब्द

पहिल्या शब्दातील विसर्गाच्या जागी ‘श्’ येऊन बनणारा जोडशब्द

१.

तपः + चर्या (सतत आचरण करणे)

तपश्चर्या

२.

निः + चल

निश्चल (स्थिर)

३.

पुनः + च 

पुनश्च

४.

पुरः + चरण 

पुरश्चरण (विशिष्ट मंत्राचा विशिष्ट काळ अथवा संख्येने जप करणे)

५.

निः + चिंत 

निश्चिंत

४ इ २ ओ. जोडशब्दातील पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्ग असणे आणि दुसर्‍या शब्दाचा पहिला वर्ण ‘त्’ किंवा ‘थ्’ असणे : ‘मनः + ताप = मनस्ताप’ या संधीमध्ये पहिल्या ‘मनः’ या शब्दाच्या शेवटी विसर्ग आहे आणि दुसर्‍या ‘ताप’ या शब्दाचा पहिला वर्ण ‘त्’ हा आहे. अशा शब्दांचा संधी होतांना पहिल्या शब्दातील शेवटचा विसर्ग लोप पावतो आणि त्याच्या जागी ‘स्’ येतो. अशा प्रकारे ‘मनस्ताप’ हा शब्द सिद्ध होतो. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनु.

जवळ येणारे दोन शब्द

पहिल्या शब्दातील विसर्गाच्या जागी ‘स्’ येऊन बनणारा जोडशब्द

१.

निः + तेज

निस्तेज

२.

शिरः + त्राण (कवच) 

शिरस्त्राण

३.

दुः + तर (मार्ग किंवा उतार)

दुस्तर (पार करण्यास अवघड असलेला)

४.

नमः + ते (तुला)

नमस्ते

४ इ २ औ. जोडशब्दातील पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्ग असणे आणि दुसर्‍या शब्दाचा पहिला वर्ण ‘श्’ किंवा ‘स्’ असणे : ‘उः + शाप = उःशाप’ या संधीमध्ये ‘उः’ या पहिल्या पदाच्या अखेरीस विसर्ग आहे आणि ‘शाप’ या दुसर्‍या पदाचा पहिला वर्ण ‘श्’ हा आहे. अशा पदांचा संधी होतांना पहिल्या पदातील विसर्ग कायम रहातो आणि पुढील पद विसर्गाला जसेच्या तसे जोडले जाते. अशा प्रकारे ‘उःशाप’ हा शब्द सिद्ध होतो. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनु.

जवळ येणारे दोन शब्द

पहिल्या शब्दातील विसर्गाला दुसरा शब्द जसाच्या तसा जोडला जाऊन बनणारा जोडशब्द

१.

मनः + शक्ती

मनःशक्ती

२.

निः + शुल्क

निःशुल्क

३.

निः + संकोच

निःसंकोच

४.

दुः + साहस

दुःसाहस

५.

चतुः + सीमा

चतुःसीमा

४ इ २ औ १. ‘पुरस्सर’ हा शब्द वरील ‘४ इ २ औ’ या नियमाला अपवाद असणे : ‘पुरः + सर = पुरस्सर (पूर्वक, उदा. हेतूपूर्वक)’ या संधीमध्ये पहिल्या ‘पुरः’ या शब्दाच्या शेवटी विसर्ग आहे आणि दुसर्‍या ‘सर’ या शब्दातील पहिला वर्ण ‘स्’ आहे. असे असले, तरी हा शब्द ‘पुरःसर’ असा न लिहिता प्रचलित मराठीनुसार ‘पुरस्सर’ असा लिहावा.

४ इ २ औ २. प्रचलित मराठी व्याकरणामध्ये वरील ‘४ इ २ औ’ या नियमात लेखकाला विसर्ग कायम ठेवण्यासह तो काढण्याचेही स्वातंत्र्य असणे; मात्र आपण विसर्ग कायम ठेवण्याचा एकच पर्याय स्वीकारला असणे : सध्या प्रचलित असलेल्या मराठी व्याकरणामध्ये वरील ‘४ इ २ औ’ या नियमानुसार संधी करतांना लेखकाला त्याच्या इच्छेनुरूप विसर्ग कायम ठेवण्याचे किंवा काढण्याचेही स्वातंत्र्य आहे. त्यामुळे लेखक विसर्ग कायम ठेवून ‘उःशाप’ असे लिहू शकतो किंवा विसर्ग काढून ‘उश्शाप’ असेही लिहू शकतो. यांतील दुसर्‍या प्रकारे विसर्ग काढून लिहितांना अट एवढीच आहे की, ‘जोडशब्दातील दुसर्‍या शब्दामधील पहिले अक्षर त्याच अक्षराला जोडून त्याचे जोडाक्षर करावे.’ यानुसार वरील ‘४ इ २ औ’मधील सारणीतील शब्द ‘मनश्शक्ती’, ‘निश्शुल्क’, ‘निस्संकोच’, ‘दुस्साहस’ आणि ‘चतुस्सीमा’ असेही लिहिता येतात; मात्र असे दोन्ही प्रकारे लिहिण्याचे स्वातंत्र्य ठेवल्यास प्रत्येक जण स्वतःला हवे त्याप्रमाणे लिखाण करील. काही प्रसंगी एकाच पृष्ठावर एकाच प्रकारचे शब्द वेगवेगळ्या पद्धतींनी लिहिले जातील. त्यामुळे सर्वसामान्य अभ्यासकाच्या दृष्टीने त्यांत एकसूत्रीपणा रहाणार नाही आणि त्याचा गोंधळ होण्याची शक्यता निर्माण होईल. हे टाळण्यासाठी आपण विसर्ग कायम ठेवून लिहिण्याचा एकच पर्याय स्वीकारला आहे.’

- सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.३.२०२२)