८. ‘विरामचिन्हे’ आणि त्यांचे भाषेतील कार्य !

१. ‘विरामचिन्हे’ म्हणजे काय ? : ‘मनुष्य बोलतांना निरनिराळ्या पद्धतींनी बोलतो, उदा. तो कधी प्रश्न विचारतो, कधी माहिती देतो, कधी आश्चर्य व्यक्त करतो, तर कधी एखादे साधे विधान करतो. या गोष्टी जेव्हा आपण ऐकत असतो, तेव्हा बोलणार्‍याच्या आवाजातील चढ-उतार, त्याने मध्येच घेतलेला छोटासा विराम (थांबणे), त्याचा एखादा हुंकार इत्यादींद्वारे ‘त्याला काय म्हणायचे आहे ?’, हे आपल्याला लगेच समजते; परंतु त्याच्या बोलण्यातील केवळ शब्द घेऊन एकापुढे एक लिहीत गेल्यास ते वाचून त्याचे नेमके म्हणणे समजून घेणे कुणालाही अवघड जाईल. त्याही पुढे एकाऐवजी दोन माणसांच्या बोलण्याविषयी या प्रकारे केवळ शब्दापुढे शब्द लिहिलेले असल्यास तो परिच्छेद कळणे आणखी अवघड होईल. याचे उदाहरण म्हणून पुढे केवळ शब्दापुढे शब्द असलेला एक उतारा दिला आहे.

        कसा होता चित्रपट बाबांनी संकेतला विचारले फारच सुंदर संकेत उत्तेजित होऊन म्हणाला देशासाठी भगतसिंग यांनी एवढ्या लहान वयात केवढा त्याग केला संकेत भारावून सांगत होता भगतसिंगांचा इतिहास राजकारण आणि इंग्रजी या विषयांचा अभ्यास फार दांडगा होता बरं बाबा म्हणाले त्यांना अनुमोदन देत संकेत बोलला होय बाबा देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी फार परिश्रम घेतले त्या सर्वांनी फार वेदनाही सोसल्या

        वरील उतार्‍यामध्ये बाबा आणि संकेत यांच्यातील संवाद दिला आहे; परंतु तो वाचतांना ‘कोण काय बोलत आहे ? कुणाचे बोलणे कुठून चालू होऊन कुठे संपत आहे ?’, हे झटकन समजत नाही. कोणतेही लिखाण वाचत असतांना ‘त्यातील शब्दांचा, तसेच वाक्यांचा परस्परसंबंध; संवाद असल्यास त्यांतील प्रश्न, विराम, उद्गार इत्यादी वाचकाला लगेच कळावेत’, यासाठी भाषेमध्ये काही खुणा ठरवून दिल्या आहेत. या खुणांना ‘विरामचिन्हे’ असे म्हणतात. आता वरील उतारा विरामचिन्हे घालून पुढे दिला आहे.

        ‘‘कसा होता चित्रपट ?’’ बाबांनी संकेतला विचारले. ‘‘फारच सुंदर !’’ संकेत उत्तेजित होऊन म्हणाला. ‘‘देशासाठी भगतसिंग यांनी एवढ्या लहान वयात केवढा त्याग केला !’’ संकेत भारावून सांगत होता. ‘‘भगतसिंगांचा इतिहास, राजकारण आणि इंग्रजी या विषयांचा अभ्यास फार दांडगा होता बरं’’, बाबा म्हणाले. त्यांना अनुमोदन देत संकेत बोलला, ‘‘होय बाबा. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी फार परिश्रम घेतले त्या सर्वांनी. फार वेदनाही सोसल्या.’’

        आता हा उतारा आपल्याला सहजपणे कळतो. हे विरामचिन्हांचे महत्त्व आहे.

२. विरामचिन्हांचे प्रकार 

२ अ. पूर्णविराम : हा ‘.’ या चिन्हाने दर्शवतात. भाषेत पूर्णविराम पुढील ठिकाणी वापरण्यात येतो.

२ अ १. ‘वाक्य पूर्ण झाले आहे’, हे दाखवणे : एखादे वाक्य पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या शब्दाच्या पुढे पूर्णविराम दिला जातो, उदा. ‘तात्यांनी पूजा केली.’ या वाक्यात ‘केली’ या शब्दानंतर पूर्णविराम देण्यात आला आहे. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. मनीषा उत्तीर्ण झाली.

आ. तो वापीला गेला आहे.

इ. काकू संतांची सेवा फार चांगली करतात.

ई. तिने पाणी भरून ठेवले.

उ. मी प्रयत्न करून पाहिला.

२ अ २. शब्दांचे संक्षिप्त रूप लिहिणे : लिखित भाषेत काही वेळा काही शब्द पूर्ण न लिहिता संक्षिप्त स्वरूपात लिहिले जातात. एखाद्या सूत्राच्या स्पष्टीकरणासाठी उदाहरण द्यावयाचे असल्यास ‘उदाहरणार्थ’ असा पूर्ण शब्द न लिहिता केवळ ‘उदा.’ असे लिहिले जाते. या प्रकारे शब्दांचे संक्षेप करतांना संक्षिप्त रूपानंतर पूर्णविराम दिला जातो. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

 

शब्द

संक्षिप्त रूपे

१.

इत्यादी

इ.

२.

श्रीयुत

श्री.

३.

सौभाग्यवती

सौ.

४.

चिरंजीव

चि.

५.

कु. लता वीरेंद्र मालशे

कु. ल.वी. मालशे

 

२ अ ३. सूत्रांना क्रमांक देणे : लिखाणात एखाद्या विषयाशी संबंधित विविध सूत्रे मांडण्यात येतात. या सूत्रांना ‘१, २, ३’ किंवा ‘अ, आ, इ’ असे क्रमांक देण्यात येतात. या क्रमांकांच्या पुढे पूर्णविराम देण्याची पद्धत आहे. याची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

१. ------

२. ------

३. ------

अ. ------

आ. ------

२ अ ४. दिनांक लिहिणे : दिनांक लिहितांना दिवस, मास आणि वर्ष यांचे आकडे परस्परांमध्ये मिसळू नयेत अन् त्यांचे वेगवेगळे तीन गट वाचकांच्या लक्षात यावेत, यासाठी प्रत्येक गटातील आकडा लिहून पूर्ण झाला की, पूर्णविराम देतात, उदा. १०.३.२०२२’

२ आ. अर्धविराम : ‘हा ‘;’ या चिन्हाने दर्शवतात. ‘लिखित भाषेत अर्धविराम कुठे द्यावा ?’, हे जाणून घेण्यासाठी प्रथम ‘अव्यय’ आणि ‘उभयान्वयी अव्यय’ म्हणजे काय ?’, हे थोडक्यात समजून घेणे आवश्यक आहे.

२ आ १. ‘अव्यय’ म्हणजे वाक्यातील ‘विभक्तीचे प्रत्यय न लागणारा आणि वाक्यरचना कितीही पालटली, तरी कधीही न पालटणारा विशिष्ट शब्द असणे’ : वाक्यातील एखाद्या विशिष्ट शब्दाला ‘स’, ‘ला’, ‘ने’, ‘चा’, ‘ची’, ‘चे’ इत्यादी विभक्तीचे प्रत्यय लागत नाहीत. त्याचसह संबंधित वाक्य कसेही पालटले, म्हणजे वाक्यातील व्यक्ती, वस्तू यांची नावे, तसेच त्यांचे लिंग यांत कसाही पालट केला, तरी तो विशिष्ट शब्द मात्र जसाच्या तसा रहातो. त्याच्यात कोणताही पालट होत नाही. अशा शब्दाला ‘अव्यय’ असे म्हणतात. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.

        ‘तो हळू बोलतो’, या वाक्यातील ‘हळू’ या शब्दाला विभक्तीचा कोणताही प्रत्यय लागू शकत नाही. त्याचसह हे वाक्य पालटून ‘ती हळू बोलते’, ‘ते हळू बोलतात’ किंवा ‘त्या हळू बोलतात’, असे कसेही लिहिले, तरी त्यातील ‘हळू’ या शब्दात कोणताही पालट होत नाही. त्यामुळे ‘हळू’ या शब्दाला ‘अव्यय’ असे म्हणतात. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत. या सर्व वाक्यांच्या पुढे कंसात त्या वाक्यांतील अव्यये दिली आहेत.

अ. त्यांची वारंवार भेट होई. (वारंवार)

आ. ती झटकन उभी राहिली. (झटकन)

इ. अशोक भरभर चालतो. (भरभर)

ई. पैसे वाया गेले. (वाया)

उ. आईने आतून लाडू आणला. (आतून)

२ आ २. दोन वाक्यांना जोडणार्‍या अव्ययांस ‘उभयान्वयी अव्यये’ असे म्हणत असणे : अव्यये विविध प्रकारची असतात; मात्र आपण या लेखात केवळ ‘उभयान्वयी अव्ययां’चाच विचार करणार आहोत. ‘सागर देवळात गेला आणि त्याने देवाला प्रार्थना केली’, हे एक वाक्य आहे; परंतु खरेतर ही ‘आणि’ या शब्दाने जोडली गेलेली दोन स्वतंत्र वाक्ये आहेत. ‘आणि’ हा शब्द वरील सूत्र क्र. ‘२ आ १’मध्ये दिल्याप्रमाणे ‘अव्यय’ आहे. अशा दोन वाक्यांना जोडणार्‍या अव्ययास ‘उभयान्वयी अव्यय’ असे म्हणतात. उभयान्वयी अव्यये ज्याप्रमाणे दोन वाक्यांना जोडतात, त्याचप्रमाणे दोन शब्दांनाही जोडतात. ‘अन्’, ‘अथवा’, ‘वा’, ‘परी’, ‘की’ अशी विविध प्रकारची उभयान्वयी अव्यये मराठी भाषेत आहेत. त्यांपैकी ‘दोन वाक्ये जोडतांना पहिल्या वाक्यानंतर ‘अर्धविराम’ द्यावा’, असा नियम असणार्‍या पुढील अव्ययांविषयीच आपण जाणून घेणार आहोत.

२ आ ३. दोन वाक्ये जोडतांना पहिल्या वाक्यानंतर अर्धविराम दिला जातो, अशी उभयान्वयी अव्यये : जेव्हा दोन वाक्ये ‘पण’, ‘परंतु’, ‘म्हणून’, ‘कारण’ आणि ‘मात्र’ या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात, तेव्हा त्या वाक्यांतील पहिल्या वाक्यानंतर अर्धविराम लिहिला जातो. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ. अमित पुस्तक पालटायला गेला होता; पण ग्रंथालय बंद होते.

आ. त्यांनी मुकुलला पुष्कळ चिडवले; परंतु तो शांत राहिला.

इ. पुंडलिकाने आई-वडिलांची अथक सेवा केली; म्हणून साक्षात् विठ्ठलाने त्याला दर्शन दिले.

ई. पांडव विजयी झाले; कारण श्रीकृष्ण त्यांच्या बरोबर होता. 

उ. जाई सर्व स्पर्धांमध्ये भाग घेते; मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष करते.

२ आ ४. अपूर्ण वाक्ये परस्परांना जोडून त्यांचे एक वाक्य बनवतांना प्रत्येक वाक्यानंतर अर्धविराम दिला जात असणे : ‘घोर अरण्यांमध्ये तपश्चर्या करणारे ऋषिमुनी; वाघ, सिंह, विषारी सर्प ज्यांना सहज वश होतात, असे सिद्धपुरुष; बाह्य साधने नसतांना तारे, नक्षत्र आणि ग्रह यांविषयी अचूक विवेचन करणारे आचार्य अन् संत, हे भारताचे वैभव आहे’, या वाक्यामधील पहिली दोन वाक्ये अपूर्ण आहेत. त्यांच्या शेवटी त्यांचे अर्थ पूर्ण करणारे शब्द नाहीत. अशी वाक्ये परस्परांना आणि उरलेल्या पुढील वाक्याला जोडतांना त्यांच्या शेवटी अर्धविराम द्यावा. याचे आणखी एक उदाहरण पुढे दिले आहे.

        उद्या नाना-नानी चिपळूणला; मामा, मामी आणि प्रवीण कुडाळला; राजा आणि संजय खेडला अन् आमचा संजयदादा मुंबईला जायला निघणार आहेत.’

२ इ. स्वल्पविराम : ‘हा ‘,’ या चिन्हाने दर्शवतात. लिखित भाषेमध्ये ‘स्वल्पविराम’ पुढील ठिकाणी वापरण्यात येतो.

२ इ १. एकाच जातीचे बरेच शब्द लागोपाठ येणे : कित्येकदा वाक्यात एकाच जातीचे (परस्परांशी काही ना काही संबंध असलेले) बरेच शब्द लागोपाठ येतात. अशा दोन शब्दांच्या मध्ये स्वल्पविराम दिला जातो, उदा. ‘गणित, इतिहास, भूगोल आणि संस्कृत हे पूनमचे आवडते विषय आहेत.’ या वाक्यातील ‘गणित, इतिहास, भूगोल आणि संस्कृत’ हे शब्द एकाच जातीचे आहेत, म्हणजे हे सर्व ‘अभ्यासाचे विषय’ आहेत. अशा प्रकारचे शब्द जेव्हा एकमेकांच्या पुढे सलग लिहिले जातात, तेव्हा त्यांच्यामध्ये स्वल्पविराम दिला जातो. स्वल्पविराम देतांना नेहमीच तो दोन शब्दांपैकी पहिल्या शब्दाला जोडून लिहिला जातो. या वाक्यात ‘संस्कृत’ या शब्दाच्या आधी स्वल्पविराम दिलेला नाही; कारण येथे स्वल्पविरामाचे कार्य ‘आणि’ या शब्दाने केले आहे. आता या संपूर्ण नियमाची आणखी काही उदाहरणे पाहू.

अ. खिरीमध्ये काजू, बदाम, पिस्ते, बेदाणे इत्यादी सुकामेवा घातला होता.

आ. कांचनला कथा, कविता आणि विनोद वाचायला फार आवडतात.

इ. आज आमच्याकडे ताई, भावोजी, प्रभा, चिंटू आणि काकू येणार आहेत.

ई. किरण लहानपणापासून आरत्या, भजने आणि स्तोत्रे आवडीने म्हणतो.

उ. कलेकडे पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा इत्यादी मिळवण्याचे साधन म्हणून पहाणे योग्य नव्हे.    

२ इ २. एखाद्यास हाक मारणे : जेव्हा एखाद्याला हाक मारली असल्याचे  आपल्याला शब्दांत लिहावयाचे असते, तेव्हा ज्याला हाक मारली आहे, त्याच्या नावानंतर/उल्लेखानंतर स्वल्पविराम दिला जातो, उदा. ‘सुबोध, आधी घरी ये.’ या वाक्यात ‘सुबोध’ला कुणीतरी हाक मारून घरी येण्यास सांगितले आहे. येथे त्याच्या नावानंतर स्वल्पविराम द्यावा. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. जय, जरा पाणी आणून दे पाहू.

आ. आजोबा, आज रात्री मला नक्की गोष्ट सांगा हं.

इ. रूपाली, जेवलीस का ?

ई. केतन, आजच सगळा अभ्यास पूर्ण कर.

उ. आजी, मला उद्या सकाळी लवकर उठव. 

२ इ ३. कोणतेही वाक्य ‘जेव्हा-तेव्हा’, ‘जर-तर’, ‘जो-तो’ इत्यादी शब्दरचना वापरून बनलेले असणे : वाक्याची रचना ‘जेव्हा-तेव्हा’, ‘जर-तर’, ‘जो-तो’ इत्यादी शब्दरचना वापरून करण्यात आली असल्यास त्यांतील ‘तेव्हा’, ‘तर’, ‘तो’ इत्यादी शब्दांच्या आधी स्वल्पविराम द्यावा. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.

        ‘जेव्हा पाऊस पडला, तेव्हा शेतकर्‍यांना हायसे वाटले’, या वाक्याची रचना ‘जेव्हा-तेव्हा’ हे शब्द वापरून करण्यात आली आहे. या वाक्यरचनेत ‘तेव्हा’ या शब्दाच्या आधीच्या ‘पडला’ या शब्दाला जोडून स्वल्पविराम देण्यात आला आहे. अशा प्रकारची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. जो निष्ठेने साधना करत रहातो, तो अध्यात्मात प्रगती करतो.

आ. जसा तो पुढे शिकत गेला, तशा त्याच्या स्वतःकडून अपेक्षा वाढत गेल्या.

इ. जितके पद मोठे असते, तितके दायित्वही मोठे असते.

ई. जिथे रामसंकीर्तन चालू असते, तिथे हनुमंत येतोच.

उ. जर गुरूंची कृपा झाली, तर जगात काहीही अशक्य नाही.

२ इ ४. वाक्यात ‘तर’ आणि ‘तरी’ हे शब्द असणे : वाक्यात ‘तर’ आणि ‘तरी’ यांपैकी कोणताही शब्द आल्यास नेहमीच त्याच्या आधी स्वल्पविराम द्यावा. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. मी गावी गेलो नाही, तर तुमच्याकडे नक्की येईन.

आ. आणखी थोडा वेळ थांबलो, तर आजच हे काम पूर्ण होईल.

इ. मी समजावले, तरी त्याने त्याच्या मनानेच सर्व केले.

ई. शिष्य चुका करतो, तरी गुरु त्याच्याकडे सदाची पाठ फिरवत नाहीत.

उ. बाळू वरवर दाखवत नव्हता, तरी मनातून चांगलाच घाबरला होता.’

२ इ ५. वाक्यात ‘म्हणजे’ हा शब्द येणे : वाक्यातील एखादा शब्द किंवा शब्दसमूह वाचकाला व्यवस्थित समजावा, यासाठी आपण त्या शब्दाच्या किंवा शब्दसमुहाच्या पुढे म्हणजे’ हा शब्द लिहितो आणि त्यापुढे त्या शब्दाचा किंवा शब्दसमुहाचा अर्थ लिहितो. अशा वेळी म्हणजे’ या शब्दाच्या आधी स्वल्पविराम द्यावा. त्याचबरोबर जेव्हा दोन वाक्ये म्हणजे’ या शब्दाने जोडलेली असतात, तेव्हाही म्हणजे’च्या आधी स्वल्पविराम दिला जातो. याची नियमाची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. ‘दोहोंचे चार हात होणे’, म्हणजे ‘विवाह होणे’ बरं का !

आ.हे श्रीकृष्णाचे, म्हणजे साक्षात् श्रीविष्णूच्या पूर्णावताराचे चरित्र आहे.

इ. तो आत्मविश्वासाने सांगत आहे, म्हणजे त्याने नक्कीच घटनेची पूर्ण चौकशी केली आहे.

ई. संतांनी आशीर्वाद दिला, म्हणजे तुला यशप्राप्ती होणारच !

२ इ ६. वाक्यात ‘उदाहरणार्थ’ हा शब्द येणे : वाक्यामध्ये एखाद्या सूत्राला पुष्टी (बळकटी) मिळावी, तसेच ते अधिक सुस्पष्ट व्हावे, यासाठी काही उदाहरणे दिली जातात. ही उदाहरणे देण्याच्या आधी ‘उदाहरणार्थ’ किंवा ‘उदा.’ हे शब्द लिहिले जातात. या शब्दांपूर्वी नेहमीच स्वल्पविराम द्यावा. सहसा लिखित भाषेत ‘उदाहरणार्थ’ असा पूर्ण शब्द अल्प प्रमाणात वापरला जातो. त्याऐवजी ‘उदा.’ हे त्या शब्दाचे लघुरूप लिहिणे अधिक प्रचलित आहे. या नियमाची दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. भारतात अतिशय पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष हिंदु राजे होऊन गेले, उदा. सम्राट विक्रमादित्य, सम्राट भोज, सम्राट कृष्णदेवराय, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी. 

आ. सुजय कुठलेही काम, उदा. घराची स्वच्छता, आजोबांचे औषधपाणी, बाजारहाट इत्यादी अगदी मनापासून करतो.

२ इ ७. दोन वाक्ये ‘यासाठी’ या शब्दाने जोडली जाणे : ‘चांगली साधिका होता यावे, यासाठी प्रज्ञा सतत धडपडत असते’, या एका वाक्यामध्ये खरेतर ‘चांगली साधिका होता यावे’, हे आणि ‘प्रज्ञा सतत धडपडत असते’, हे अशी दोन वाक्ये अंतर्भूत आहेत. यांतील ‘चांगली साधिका होता यावे’, या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसला, तरी त्याच्या पुढील ‘यासाठी’ या शब्दाने जोडलेले ‘प्रज्ञा सतत धडपडत असते’, हे वाक्य वाचले की, पहिल्या वाक्याचा अर्थ लक्षात येतो. अशा प्रकारे जेव्हा दोन वाक्ये ‘यासाठी’ या शब्दाने जोडली जातात, तेव्हा ‘यासाठी’ या शब्दाच्या आधी स्वल्पविराम द्यावा. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. मंदिरात सेवा करता यावी, यासाठी सौरभ धावतपळत शाळेतून येतो.

आ. आईला त्रास होऊ नये, यासाठी कौस्तुभ स्वतःचे कपडे स्वतः धुवायला शिकला.  

इ. आईस्क्रीम खायला मिळावे, यासाठी तो प्रतिदिन रात्री बाबांबरोबर चालायला जातो.

२ इ ८. दोन वाक्ये ‘की’ या शब्दाने जोडणे : कोणतीही दोन वाक्ये जेव्हा ‘की’ या शब्दाने परस्परांशी जोडली जातात, तेव्हा ‘की’ या शब्दानंतर स्वल्पविराम येतो. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. बाबा म्हणाले होते की, या माणसावर विश्वास ठेवू नकोस.

आ. दादा आले की, आपण नवीन कपडे आणावयास जाऊ.

इ. ताईचे जेवण झाले की, ती मला चित्र काढायला शिकवणार आहे.’

२ इ ९. वाक्यात ‘अन्यथा’ हा शब्द येणे : कोणत्याही वाक्यात जेव्हा ‘अन्यथा’ हा शब्द येतो, तेव्हा या शब्दाच्या आधी स्वल्पविराम द्यावा, उदा. व्यवस्थित अभ्यास कर, अन्यथा परीक्षेत अल्प गुण मिळतील.

२ इ १०. वाक्यात अवतरणचिन्हे येणे

२ इ १० अ. वाक्यात दुहेरी अवतरणचिन्ह येणे : वाक्यात जेव्हा ‘एखादी व्यक्ती स्थुलातून काय बोलली ?’, हे आपल्याला लिहावयाचे असते, तेव्हा ते बोलणे आपण दुहेरी अवतरणचिन्हात लिहितो, उदा. दीपिका म्हणाली, ‘‘हे काम आपण उद्यापर्यंत पूर्ण करू.’’ या वाक्यात दीपिका जे म्हणाली, ते आपण दुहेरी अवतरणचिन्हात लिहिले आहे. असे कोणतेही लिखाण दुहेरी अवतरणचिन्हात लिहितांना अवतरणचिन्हाच्या आधी स्वल्पविराम द्यावा. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. स्वप्नीलने सांगितले, ‘‘या मैदानात आठ दिवसांनी आमच्या संस्थेची सभा आहे.’’

२. शिल्पाने हसून विचारले, ‘‘यात एवढे ताण घेण्यासारखे काय आहे ?’’

३. स्मिता उद्गारली, ‘‘किती सुंदर फुले आहेत येथे !’’

२ इ १० आ. वाक्यात एकेरी अवतरणचिन्ह येणे : ज्याप्रमाणे व्यक्तीचे प्रत्यक्ष बोलणे आपण दुहेरी अवतरणचिन्हात लिहितो, त्याप्रमाणे तिच्या मनातील विचार, मनातील एखादा प्रश्न, कल्पना किंवा डोळ्यांसमोर दिसलेले दृश्य लिहितांना आपण ते एकेरी अवतरणचिन्हात लिहितो. या एकेरी अवतरणचिन्हाच्या आधी स्वल्पविराम द्यावा. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. माझ्या मनात आले, ‘यांची मैत्री किती घनिष्ठ आहे नाही !’

२. मीनलला प्रश्न पडला, ‘आता पुढे काय करायचे ?’

३. भजन म्हणतांना अण्णांना वाटले, ‘प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्याकडे पाहून प्रेमाने हसत आहे.’

२ इ १० इ. वाक्यात अवतरणचिन्हातील लिखाण आधी आणि ते लिखाण ज्याने प्रत्यक्ष उच्चारले आहे किंवा ज्याने त्या लिखाणात दिलेला विचार केला आहे, त्याचा उल्लेख नंतर येणे : काही वेळा अवतरणचिन्हातील लिखाण अगोदर येते आणि जी व्यक्ती ते लिखाण बोलली आहे किंवा जिच्या मनातील तो विचार आहे, तिचे नाव नंतर येते. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.

        ‘‘आई, मी मैत्रिणीकडे जाऊन येते’’, असे म्हणत सोनाली घराबाहेर पडली.

         वरील वाक्यामध्ये सोनाली जे बोलली, ते आधी आले आहे आणि सोनालीचे नाव नंतर आले आहे. अशा वेळी अवतरणचिन्ह पूर्ण झाल्यावर स्वल्पविराम द्यावा. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. ‘‘अंगणात चांदण्या पहात झोपायला मला फार आवडते’’, पिंटू म्हणाला.

२. ‘‘यंदा देवाच्या पालखीच्या वेळी दोन्ही मुले घरी येणार आहेत’’, अप्पांनी आजींना सांगितले.

३. ‘गावी गेल्यावर मी आधी मनीला आणि तिच्या पिल्लांना भेटणार’, मधूने ठरवले.

४. ‘एकदा हिमालय पहायलाच हवा’, अनूपच्या मनात आले.

२ इ ११. ‘यांसारख्या’ या शब्दापूर्वी स्वल्पविराम कधी द्यावा आणि कधी देऊ नये ?

२ इ ११ अ. ‘यांसारख्या’ या शब्दाच्या आधी स्वल्पविराम देण्याशी संबंधित नियम : ‘यांसारख्या’ या शब्दाच्या आधी ‘घेणे’, ‘जाणे’, ‘फिरणे’, ‘करणे’, असे ‘णे’ हे अक्षर शेवटी असलेले शब्द असल्यास ‘यांसारख्या’ या शब्दापूर्वी स्वल्पविराम द्यावा. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. लोकांच्या घरी दूध पोचवणे, वर्तमानपत्रे टाकणे, गाड्या धुणे, यांसारखी कामे करून त्याने शिक्षण पूर्ण केले.

२. खरे बोलणे, वेळेचे पालन करणे, नियम पाळणे, यांसारखे गुण प्रत्येकाने स्वतःच्या अंगी बाणवणे आवश्यक आहे.

३. नामजप करणे, प्रार्थना करणे, देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, यांसारख्या प्रयत्नांमुळे आपण देवाच्या अनुसंधानात रहातो.

२ इ ११ आ. ‘यांसारख्या’ या शब्दाच्या आधी स्वल्पविराम न देण्याविषयीचा नियम : ‘यांसारख्या’ या शब्दाच्या आधी वरील सूत्र क्र. ‘२ इ ११ अ’मध्ये दिल्याप्रमाणे शेवटी ‘णे’ हे अक्षर असलेला शब्द न येता अन्य शब्द आल्यास ‘यांसारख्या’ या शब्दापूर्वी स्वल्पविराम देऊ नये. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. डोकेदुखी, पोटदुखी, मळमळ यांसारख्या विकारांवर हे औषध चांगले आहे.

२. कबड्डी, मलखांब, कुस्ती यांसारख्या खेळांत तो प्रवीण आहे.

३. आई-वडील, शिक्षक यांच्यासारख्या वडीलधार्‍यांसमोर तो नेहमीच नम्रपणे वागतो.

२ इ १२. ‘इत्यादी’ या शब्दाच्या आधी स्वल्पविराम न देणे : ‘इत्यादी’ या शब्दाच्या आधी कधीही स्वल्पविराम देऊ नये, उदा. आमच्या अंगणात चिमण्या, साळुंख्या, खारी इत्यादींचा मुक्त वावर असतो.

२ ई. अपूर्णविराम : हा (:) या चिन्हाने दाखवतात. लिखित भाषेत ‘अपूर्णविरामा’चा उपयोग पुढील ठिकाणी केला जातो.

२ ई १. उपमथळ्याच्या पुढे त्याचे स्पष्टीकरण लिहावयाचे असणे : लेखनामध्ये कोणत्याही उपमथळ्याच्या पुढे त्या उपमथळ्याविषयी अधिक माहिती द्यावयाची असेल, तर उपमथळ्यानंतर ‘अपूर्णविराम’ दिला जातो. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.

२ ई १ अ. भगवंताचे भक्तावरील प्रेम : भगवंत त्याची अनन्य भक्ती करणार्‍या भक्तावर अतिशय प्रेम करतो. भीष्माचार्य हे भगवान श्रीकृष्णाचे परम भक्त होते. श्रीकृष्णाने, ‘कुरुक्षेत्रावरील युद्धात मी शस्त्र हाती घेणार नाही’, अशी प्रतिज्ञा केली होती, तर भीष्माचार्यांनी एका प्रसंगी श्रीकृष्णावर रुष्ट होऊन, ‘मी श्रीकृष्णाला युद्धात शस्त्र हाती घ्यावयास लावीन’, अशी प्रतिज्ञा केली. केवळ भीष्माचार्यांची प्रतिज्ञा सत्य व्हावी, यासाठी भक्तवत्सल श्रीकृष्णाने स्वतःची प्रतिज्ञा मोडून युद्धात शस्त्र हाती घेतले.

२ ई २. ‘नाटक’ हा वाङ्मयप्रकार लिहितांना त्यातील पात्रांच्या तोंडी असलेले संवाद लिहिण्यापूर्वी पात्रांच्या नावांसमोर अपूर्णविराम लिहिणे : साहित्यविश्वात कथा, कादंबर्‍या, कविता, नाटके असे विविध वाङ्मयप्रकार असतात. त्यांपैकी ‘नाटक’ या प्रकारामध्ये त्यातील विविध पात्रे परस्परांशी बोलत असतात. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून नाटकाचे कथानक उलगडत जाते. हा वाङ्मयप्रकार लिहितांना पात्रांची नावे लिहिल्यावर त्यांच्यासमोर अपूर्णविराम लिहिला जातो आणि त्यापुढे त्या पात्रांचे संवाद लिहिले जातात. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.

गोविंद : या वर्षी गणेशोत्सवात मनोरंजन करणारा चित्रपट दाखवायचा नाही.

ज्ञानेश : का बुवा ?

गोविंद : चित्रपटांमध्ये मारामार्‍या, वाईट दृश्ये, ढणढणाटी संगीत असं सर्व असतं. एका बाजूला भक्तीभावाने पूजा केलेली श्री गणेशाची मूर्ती ठेवायची आणि दुसरीकडे हे असलं काहीतरी दाखवायचं ! बरं नाही वाटत रे ! देव राहील तरी का अशा ठिकाणी ?

ज्ञानेश : खरंच रे ! मी कधी असा विचारच केला नव्हता.

गोविंद : माझ्याही हे मागील वर्षी लक्षात आलं. लोकांनी काय धुडगूस घातला होता !

२ ई ३. उपमथळ्याच्या शेवटी क्रियापद असल्यास आणि त्याच्या पुढे अपूर्णविराम लिहावयाचा असल्यास उपमथळ्याच्या शेवटी उद्गारवाचकचिन्ह देणे : काही वेळा उपमथळ्याच्या शेवटी क्रियापद येते, उदा. ‘जेवतांना एकमेकांना स्पर्श करू नये’, या उपमथळ्यात ‘नये’ हे क्रियापद आहे. क्रियापद म्हणजे, ‘वाक्यातील क्रिया दर्शवणारा आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द होय.’ एरव्ही एक साधे वाक्य म्हणून वरील वाक्य लिहिल्यास ‘नये’ या शब्दानंतर आपण पूर्णविराम लिहितो; मात्र हे वाक्य उपमथळा म्हणून लिहावयाचे असेल आणि उपमथळ्याच्या पुढे अपूर्णविराम लिहावयाचा असेल, तर ‘नये’नंतर पूर्णविराम देऊ नये. त्याऐवजी उद्गारवाचकचिन्ह द्यावे. याचे आणखी एक उदाहरण पुढे दिले आहे.

२ ई ३ अ. सकाळी उठल्यावर श्लोक म्हणावा ! : सकाळी उठल्यावर श्लोक म्हटल्याने आपल्याला ईश्वराचे स्मरण होते आणि त्याच्या आशीर्वादाने आपला दिवस चालू होतो.

२ ई ४. उपमथळा प्रश्नार्थक असेल, तर त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह देऊन मग अपूर्णविराम देणे : उपमथळ्यामध्ये प्रश्न विचारलेला असेल, तर त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे आणि प्रश्नचिन्हाच्या पुढे अपूर्णविराम द्यावा. याचे उदाहरण पुढे दिले आहे.

२ ई ४ अ. साधकाने सिद्धींमध्ये का अडकू नये ? : ‘सिद्धींची प्राप्ती होणे’, हा साधनामार्गावरील एक टप्पा आहे. ते साधनेचे अंतिम ध्येय नाही. ‘मोक्षप्राप्ती’ हे साधनेचे अंतिम ध्येय आहे. सिद्धींमध्ये अडकल्यास साधकाची पुढील प्रगती खुंटते.

२ उ. प्रश्नचिन्ह : हे ‘?’ या खुणेने दाखवले जाते. लिखित भाषेत ‘प्रश्नचिन्हा’चा उपयोग पुढीलप्रमाणे केला जातो.

२ उ १. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लिहिणे : एखादे वाक्य प्रश्नार्थक असेल, म्हणजे त्या वाक्याद्वारे एखादा प्रश्न विचारण्यात आला असेल, तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लिहावे. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. रामाने वालीचा वध का केला ?

आ. लालबहादूर शास्त्री यांनी राष्ट्राच्या उत्कर्षासाठी कोणती घोषणा दिली ?

इ. हुतात्मा भगतसिंग यांचे संपूर्ण नाव काय ?

२ उ २. प्रश्नार्थक वाक्य अवतरणचिन्हात येणे : प्रश्नार्थक वाक्य एकेरी अथवा दुहेरी अशा कोणत्याही अवतरणचिन्हात येत असेल, तर वाक्याच्या शेवटी प्रथम प्रश्नचिन्ह द्यावे आणि नंतर अवतरणचिन्ह पूर्ण करावे. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. ‘सत्यवचनी रहाण्या’चा संकल्प केलेल्या सिद्ध पुरुषाला क्षणभर प्रश्न पडला, ‘शिकार्‍याला सत्य सांगावे कि असत्य बोलून हरणाचे प्राण वाचवावेत ?’

आ. त्याने उत्सुकतेने समीरला विचारले, ‘‘तुझी अभ्यासातील एकाग्रता नामजपामुळे वाढली का ?’’

इ. महाराज दुष्यंत यांनी कोळ्याला (मासेमारी करणार्‍याला) विचारले, ‘‘ही अंगठी तुला कुठे मिळाली ?’’

२ ऊ. संयोगचिन्ह : हे ‘-’ या खुणेने दाखवले जाते. लिखित भाषेत ‘संयोगचिन्ह’ पुढील ठिकाणी वापरतात.

२ ऊ १. दोन शब्द जोडणे : अर्थाच्या दृष्टीने परस्परांशी संबंधित असलेले दोन शब्द जोडतांना त्यांच्यामध्ये संयोगचिन्ह लिहिले जाते. एरव्ही अशा दोन शब्दांमध्ये ‘आणि’, ‘अथवा’, ‘किंवा’ इत्यादी शब्द लिहिले जातात. हे शब्द लिहिणे टाळावयाचे असल्यास त्यांच्याऐवजी संयोगचिन्हाचा उपयोग केला जातो. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

        आई-वडील, मामा-भाचे, देव-दानव, लक्ष्मी-सरस्वती, तीन-चार  इत्यादी.  

२ ऊ २. ओळीतील शेवटच्या शब्दातील काही अक्षरे त्या ओळीत आणि काही अक्षरे खालच्या ओळीत जाणे : एखाद्या ओळीतील शेवटचा शब्द मोठा असल्यास तो त्या ओळीत पूर्णपणे मावत नाही. त्यामुळे त्या शब्दातील काही अक्षरे त्या ओळीच्या खालच्या ओळीत लिहावी लागतात. अशा वेळी वरच्या ओळीतील शेवटची अक्षरे आणि खालच्या ओळीतील पहिली अक्षरे एकाच शब्दातील आहेत, हे कळण्यासाठी वरच्या ओळीतील अक्षरांच्या शेवटी संयोगचिन्ह दिले जाते. याचे उदाहरण पुढे दिले आहे. 

अ. समाजात प्रसिद्धी मिळालेले काही लोक अभ्यास नसलेल्या विषयां-

वरही अधिकारवाणीने बोलतात.

२ ऊ ३. सनातनच्या वाङ्मयात नेहमी वापरल्या जाणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण शब्दांत संयोगचिन्ह वापरण्याची पद्धत !

२ ऊ ३ अ. ‘सूक्ष्म-चित्र’ या शब्दांमध्ये संयोगचिन्ह देणे : मराठी भाषेत ‘सूक्ष्म’ या शब्दाचा अर्थ ‘अती लहान’ असा आहे. त्यामुळे ‘सूक्ष्म चित्र’ असे दोन शब्दांमध्ये संयोगचिन्ह न देता लिहिले, तर त्याचा अर्थ ‘अती लहान चित्र’, असा होऊ शकतो; परंतु सनातनच्या वाङ्मयात हा अर्थ अभिप्रेत नाही. सनातननुसार ‘सूक्ष्म-चित्र’ म्हणजे ‘मनुष्याला साध्या डोळ्यांनी न दिसणार्‍या अशा सूक्ष्मातून घडलेल्या घडामोडी दाखवणारे चित्र होय.’ संयोगचिन्ह दिल्यामुळे ‘सूक्ष्म’ आणि ‘चित्र’ हे दोन्ही शब्द परस्परांशी जोडले जातात आणि त्याद्वारे अपेक्षित असा अर्थ प्राप्त होण्यास साहाय्य होते. यासाठी ‘सूक्ष्म-चित्र’ या शब्दांमध्ये संयोगचिन्ह लिहावे. असाच आणखी एक शब्द म्हणजे ‘सूक्ष्म-चित्रकर्त्या’.

२ ऊ ३ आ. ‘सूक्ष्म दृष्टी’ या शब्दांमध्ये संयोगचिन्ह न लिहिणे : सनातनच्या वाङ्मयात ‘सूक्ष्म दृष्टी’ असे जेव्हा लिहिले जाते, तेव्हा त्याचा अर्थ, ‘साध्या डोळ्यांनी न दिसणार्‍या अती लहान अशा सूक्ष्मातील घडामोडी पाहू शकणारी दृष्टी’, असा असतो. येथे दृष्टीच सूक्ष्म आहे. व्याकरणाच्या भाषेत सांगावयाचे तर, ‘सूक्ष्म’ हे ‘दृष्टी’ या शब्दाचे विशेषण आहे. ‘विशेषण म्हणजे संबंधित शब्दाविषयी विशेष माहिती देणारा शब्द होय.’ या ठिकाणी ‘सूक्ष्म’ हा शब्द ‘दृष्टी’ या शब्दाविषयी विशेष माहिती देतो. व्याकरणात विशेषण आणि संबंधित शब्द यांमध्ये कधीही संयोगचिन्ह नसते. त्यामुळे ‘सूक्ष्म दृष्टी’ या दोन शब्दांमध्येही संयोगचिन्ह लिहू नये. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

        सूक्ष्म ज्ञान, सूक्ष्म लहरी, सूक्ष्म परीक्षण, सूक्ष्म जगत इत्यादी.’  

२ ए. उद्गारवाचकचिन्ह : हे ‘!’ या खुणेने दाखवले जाते. लिखित भाषेत ‘उद्गारवाचकचिन्हा’चा उपयोग पुढीलप्रमाणे केला जातो.

२ ए १. एखाद्या प्रसंगी उत्स्फूर्तपणे किंवा उत्कटपणे बोलल्या जाणार्‍या शब्दापुढे ‘उद्गारवाचकचिन्ह’ लिहिणे : दैनंदिन जीवनात एखादी आश्चर्यचकित करणारी घटना घडली, एखादी सुखद अथवा दुःखद वार्ता आपल्या कानांवर आली किंवा नेहमीपेक्षा एकदम वेगळे दृश्य आपण पाहिले, तर उत्स्फूर्तपणे किंवा उत्कटपणे आपल्या तोंडून ‘अरेच्च्या’, ‘अबब’, ‘बापरे’ अथवा ‘अगंबाई’ यांसारखे उद्गार बाहेर पडतात. या उद्गारांच्या पुढे ‘उद्गारवाचकचिन्ह’ लिहिले जाते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. अरेरे ! श्रीमंत माधवराव पेशवे फारच तरुण वयात मृत्यू पावले.

आ. अप्रतिम ! एवढा भव्य राजवाडा मी पहिल्यांदाच पहात आहे.  

इ. अरे वा ! हे चित्र अगदी सजीव वाटत आहे.

ई. शाबास ! रामरक्षा छान पाठ केली आहेस.

२ ए २. उत्स्फूर्तपणे किंवा उत्कटपणे बोलल्या जाणार्‍या वाक्यापुढे उद्गारवाचकचिन्ह लिहिणे : ज्याप्रमाणे आपण उत्स्फूर्तपणे किंवा उत्कटपणे काही शब्द उच्चारतो, त्याचप्रमाणे काही वाक्येही उच्चारतो. या वाक्यांत काही वेळा ‘किती’, ‘केवढे’ इत्यादी प्रश्नार्थक शब्द असतात; परंतु त्यांत कोणतेही प्रश्न विचारलेले नसतात. बोलणार्‍याला कोणत्याही उत्तराची अपेक्षा नसते. अशी वाक्ये ही खरेतर विधाने असतात. या वाक्यांना काही वेळा क्रियापदेही नसतात. अशा प्रकारच्या वाक्यांनंतर उद्गारवाचकचिन्ह लिहिले जाते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. किल्ल्याची या बाजूची तटबंदी अजूनही किती बळकट आहे !

आ. संत रामदासस्वामी यांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी केवढे महान कार्य केले !

इ. वाघिणीला मारणारे किंवा पकडणारे अनेक जण असतील; पण तिचे दूध काढणारे छत्रपती शिवराय जगात एकमेवच !

ई. मनुष्याला मृत्यूनंतर उपयोगी पडते, ती केवळ साधनाच !

२ ए ३. सनातनच्या वाङ्मयात वैशिष्ट्यपूर्ण मथळे आणि अन्य वैशिष्ट्यपूर्ण वाक्ये यांच्यापुढे उद्गारवाचकचिन्ह लिहिले जात असणे : प्रचलित मराठी वाङ्मयात प्रश्नार्थक मथळा वगळता अन्य कोणत्याही मथळ्यापुढे कोणतेही विरामचिन्ह लिहिले जात नाही. सनातनच्या वाङ्मयात मात्र राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण घटनांची वृत्ते, लेख, संतांचे अमूल्य विचारधन इत्यादींचे मथळे; दैनिक ‘सनातन प्रभात’मधील जनजागरण करणार्‍या आकाशओळी; सनातनच्या अन्य प्रसारसाहित्यांमधील महत्त्वाची वाक्ये यांच्यापुढे उद्गारवाचकचिन्ह देण्यात येते. उद्गारवाचकचिन्ह दिल्यामुळे वाचकांचे त्या लिखाणाकडे लगेच लक्ष वेधले जाते, त्याचबरोबर त्या लिखाणातील विचार त्यांच्या मनावर कोरले जाण्यास साहाय्य होते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. मंदिरांच्या आर्थिक व्यवहारांत भ्रष्टाचार करणार्‍यांविरुद्ध राज्यभरातील हिंदू संघटित !

आ. कमलनगर येथे अवैध भोंग्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल !

इ. प्रदूषण टाळण्यासाठी फटाके न वाजवण्याचा टिळकनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा निर्धार !    

ई. हिंदूंनो, राष्ट्र-धर्मावरील आघातांविरुद्ध न्यायालयीन लढा द्या !

उ. नामस्मरणाने प्रारब्ध जळते ! - प.पू. भक्तराज महाराज

- सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.६.२०२२)